Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यराजमाता

राजमाता

राजमाता जिजामाता भोसले यांच्या आज स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने इतिहास संशोधक, साहित्यिक श्री कृष्णकुमार निकोडे यांचा विशेष लेख….

आदिलशाहीचा सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे उजाड केले होते. त्याने पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवल्या. त्यावर तुटलेली चप्पल बांधून ‘जो ही जमीन नांगरेल, तो निर्वंश होईल !’ असा शाप दिला.

राजमातेने अशी ही शापित भूमी अवघ्या पाच वर्षे वयाचा पुत्र-शिवबांच्या हाताने सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने नांगरली. सोबत रायनाक दलित, रामोशी, मातंग आणि लोहार यांचा एकेक मुलगा असे पाच बालक होते. ‘आता शिवबा नक्कीच मरेल’, अशी भिती कलंत्री-कर्मठ भटांनी पेरली. राष्ट्रमाता अश्या धमक्यांना पुरुन उरणाऱ्या होत्या. त्यांनी शिवबाला, “नांगर तसाच सुरू ठेवा !” असे फर्मावले. “महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल. परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. समतेचे‌, न्यायाचे, ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी आहे.” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

धार्मिक दहशत पसरविणाऱ्या पुण्यातील त्या रोवलेल्या सर्व पहारी उखडून त्यापासून स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडणाऱ्या तलवारी तयार करविल्या. संपूर्ण पुण्याची शापित पांढरी जमिन कसण्यास सुरुवात केली. जादूटोणा पावटणी करून अंधश्रद्धेला लाथाडणाऱ्या त्या प्रचंड हिंमतीच्या मातोश्री होत्या राष्ट्रमाता जिजाऊ भोसले !

त्या भारताला जिजाबाई, जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मांसाहेब, राष्ट्रमाता अशा अनेक नावांनी परिचित आहेत. त्यांचा जन्म दि.१२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रात झाला. राष्ट्रमाता जिजाऊ या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. त्यांचा इ.स.१६०५ मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे विवाह झाला.

पुढे काही दिवसांनी लखुजी व शहाजीराजे यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला. एकदा एका पिसाळलेल्या हत्तीस पकडण्याच्या कारणावरून भाऊ दत्ताजीराव व भासरे संभाजी या दोघांचे भांडण झाले. त्यात भाऊ ठार झाला. हे लखुजींना समजताच त्यांनी रागाने संभाजीस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना कळताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर धावून गेले. यात त्यांच्या दंडावर वार लागला. या प्रसंगानंतर जिजाऊंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहात आपल्या माहेरचे संबंध तोडले.

नात्यांना व भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न ठेवता धैर्याने आणि त्या खंबीरपणे वागल्या. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा त्यांचा हा गुण छ.शिवरायांत पुरेपूर उतरला होता.

शहाजीराजे बंगळूरात वास्तव्यास असतांना छ.शिवरायांसाठी आई व वडिल ही दुहेरी जबाबदारी राजमातेंनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली होती. सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. या धर्म राजकारणात त्या राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर कन्या सखुबाईस बजाजींच्या मुलाला दिले. त्यांच्याशी राज-सोयरीक साधून त्यांना धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

शहाजी राजांच्या सर्व स्वार्‍यांचा वा लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. त्यांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. छ.शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतार वयातही मातोश्रींनी कौशल्याने निभावून नेली होती.

छ.शिवरायांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून त्यानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. वयाच्या ८० व्या वर्षी जिजामातेचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी वृद्धापकाळाने निधन झाले.

जगतजननी जिजाऊंच्या मनात बऱ्याच वर्षांपासून एक संकल्पना घोळत होती. ती हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यास त्या आजीवन मराठ्यांना प्रोत्साहित करीत होत्या. त्यांनी स्वतः गुरुसमान छ.शिवरायांना घोड्यावर स्वार होणे, घोडदौड करणे, दांडपट्टा फिरविणे, तलवार चालविणे, ढालीचा वापर करणे, नेमबाजी गनिमीकावा खेळणे आदी युद्धकौशल्यांचे धडे दिले. सोबतच ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा तत्व व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या व त्यांच्यावर सुसंस्कार झोकणाऱ्या त्या राजमाता होत.

!! पावन स्मृती दिनी त्यांना व त्यांच्या कार्यकुशलतेला मानाचा लवून मुजरा !!

– लेखन : कृष्णकुमार निकोडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं