मुंबईकरांना लाॕकडाउनच्या या दिड-दोन वर्षाच्या काळात कितीतरी गोष्टींची उणीव भासली. पण सर्वांत त्यांनी कोणाला मिस केलं असेल तर ती म्हणजे गर्दी !
गर्दी…गर्दी…गर्दी या मुंबई शहरात जेथे पाहावे तेथे गर्दीच गर्दी. रस्त्यावर वाहनांची गर्दी, फुटपाथवर फेरीवाल्यांची गर्दी, हॉटेलात गर्दी, दुकानात गर्दी, रेल्वे फलाटावर गर्दी, बस थाब्यांवर गर्दी, शाळा, हॉस्पिटल जेथे पाहावे तेथे माणसांची गर्दीच गर्दी. कोणत्याही, कशाही स्थितीत बांधलेल्या सिमेंटच्या इमारतींची गर्दी. मोर्चा, भांडण, मारामारी, भाषण या ठिकाणी होणारी गर्दी. खरंच ! ही गर्दी कोठून येते ? याच मोठं नवल वाटतं. या शहरात गर्दी मात्र कोणालाही चुकली नाही.
ही गर्दी कमी म्हणूनच की काय येथील माणसांच्या डोक्यात विचारांची गर्दीच-गर्दी चालू असते. म्हणजे अजून आपण घरातच असतो परंतु साडेआठची गाडी मिळेल का ? बसायला जागा मिळेल का ? आॕफिसला वेळेवर पोहचू का ? कालचं राहिलेले काम आज तरी पूर्ण होईल का ? तर अशा या गर्दीत हरवली आहे ती म्हणजे शांतता.

मला वाटतं या शहरातील प्रत्येक व्यक्तीने आपली शांतता आपल्या जवळच ठेवली आहे. म्हणूनच इतक्या गर्दीत प्रत्येकजण आपलं एकटेपण अनुभवत असतो. त्या एकटेपणाच्या वेळी त्या व्यक्तीवर कोणत्याही, कसल्याही गर्दीचा काहीही प्रभाव पडत नाही हे विशेष. उदा. रेल्वेत भजनी मंडळाचे जोरात भजन चालू आहे पण तेथेच बसलेला एकजण छानपैकी घोरत आहे.महिलांच्या डब्यात चौथ्या सीटवरुन बायका मोठ्यानं भांडत आहेत, पण तेथेच बसलेली एखादी महिला महालक्ष्मीची पोथी वाचण्यात गुंग आहे. एका कोपऱ्यात गाण्यांच्या भेड्यांना जोर आला आहे, पण तेथे मध्येच बसलेली एखादी माझ्यासारखी हातात कागद आणि पेन घेऊन कविता नाहीतर एखादा लेख लिहीण्यात दंग झाली आहे. यावरून असं दिसतं की इतक्या भयंकर गर्दीमध्ये प्रत्येक व्यक्तीने आपली शांतता स्वतः जवळ शाबूत ठेवली आहे. त्यामुळेच या गर्दीचा आणि या गर्दीतील गोंगाट, गोंधळ यांचा त्या व्यक्तीवर काहीही परिणाम होते नाही.
या धावपळीच्या जीवनात गर्दी हा एक प्रत्येकाचा अविभाज्य घटक बनला आहे. या गर्दीमध्ये मनुष्य इतका गुरफटून गेला आहे की त्याला गर्दी नसेल तर चैन पडत नाही. एखाद्या हॉटेलात गर्दी नसेल तर तेथील पदार्था विषयी त्याच्या मनात शंका उत्पन्न होते ! कपड्याच्या दुकानात गर्दी नसेल तर तेथील कपडे विकत घेण्यास त्याच मन कचरतं. भले कितीही गर्दी असो, तो मुंबईकर रांगेत उभा राहील पण त्याच हॉटेलात आणि त्याच दुकानात जाईल आणि तेथून विजयी मुद्रेने बाहेर पडेल.
अहो इतकंच नव्हे जर गाडीत गर्दी नसेल तर आरामात बसूनही त्याला मरगळल्या सारखं वाटतं. त्याच गाडीत जेव्हा गर्दीमध्ये उडी मारून, जीव धोक्यात घालून तो जागा पकडतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो.
सुट्टीच्या दिवशी तर मुंबईतील रस्ते सुद्धा भकास, उदास वाटतात. जणू दुसऱ्या दिवशीची वाट पाहत एकाकी असल्यासारखे भासतात. गर्दी नसेल तर अशा या भकास, एकाकी रस्त्यावर चालताना सुद्धा मनात भिती, दडपण वाटत राहतं.थोडक्यात या मुंबई शहरात गर्दी शिवाय पर्याय नाही असंच म्हणावं लागेल.
गर्दी म्हणजे जणू आपलं एक घर बनलं आहे. मला तर वाटतं ही गर्दीच आपल्या मनात कुठेतरी घर करून बसली आहे. आपल्या घरात जसे आपल्याला सुख-दुःखाचे अनुभव मिळतात, चांगली-वाईट माणसांची ओळख पटते तसंच रोजच्या या गर्दीमध्ये आपल्याला चांगल्या-वाईट माणसांचा अनुभव अनुभवास मिळतो.सुखाचे क्षण, दुःखाच्या गोष्टी ऐकावयास, पाहण्यास मिळतात. म्हणूनच मला वाटतं …
शहरात शहर मुंबई शहर
येथे गर्दीचा नित्य कहर
सारे मुंबईकर
यांचं जणू गर्दी एक घर
कारण गर्दीविना
मुंबई शहराला नाही बहर
– लेखिका : सुरेखा गावंडे.
– संपादन : अलका भुजबळ 9869484800.
Khoop sundar.vastav paristhiti khoop sundar shbdat mandlyes.
गर्दी आपल्या नित्य धावपळीच्या जीवनाचाच एक भाग झालेली आहे. गर्दीबाबत ललित लेख अप्रतिम आहे.
गर्दी शिवाय मुंबई जगत नाही. इस्पितळात जा , बँकेत जा , नाटक सिनेमा पाहण्यास जा. किंवा पोस्टात जा. गेल्या गेल्या काम झाले रांगेत उभे राहावे लागले नाही असे कधी होतच नाही. सगळीकडे गर्दीशी सामना करावाच लागतो. रात्रंदिवस आम्हा गर्दीचा प्रसंग. लेख खूप छान आहे. आवडला.
गर्दीशवाय मुंबई किती भकास दिसते याचे प्रत्यंतर या दोन वर्षात आले ..गर्दीशिवायही जीव गुदमरू शकतो याचा दाखला या लेखावरून मिळतो..अप्रतिम केख !!!
गर्दीत गर्दी शहरातील विविध भागातील, विविध क्षेत्रातील, विविध माणसांची…गर्दी शिवाय मुबंई….जगत नाही.
मस्त लेख आहे