(वृत्त-अनलज्वाला.मात्रा ८+८+८)
कडकड कडकड वीज चमकली क्षणात दडली
अवचित झाडे सळसळ सळसळ हलू लागली
नभी गतीने गडद ढगांची गर्दी जमली
सर वळवाची तप्त धरेवर झरू लागली
भिरभिर भिरभिर धांदल त्यांच्या उरात उठली
सानपाखरे घरट्यामध्ये दडू लागली
खळखळ झरणी जाऊन मिळण्या नदीस वळली
रानवासरे लगबग मागे फिरू लागली
तडतड तडतड गार बरसता भिऊन दडली
सोबत आई असून बाळे रडू लागली
गरम चहाची वाफ तरळली मनास भिडली
सोप्यावरची मैफल आता खुलू लागली
फिरून पडले ऊन सोनसर जादू घडली
अंबरातुनी सर बगळ्यांची फिरू लागली…
— रचना : डाॅ. आनंद महाजन. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800