सुरकुतल्या गालांवर जेव्हा
मऊ कोवळे ओठ टेकती
दुखऱ्या खुपऱ्या साऱ्या जखमा
त्या स्पर्शाने भरून येती
तोल जाऊनी पडता पडता
आधाराला होते काठी
जगावयाला सूर सापडे
शुद्ध निरागस बाल्यासाठी
वास्तवातल्या सुखदुःखाच्या
चवीत अंतर जेव्हा नसते
वार्धक्याच्या निद्रेमध्ये
साखर पेरीत बाल्य बिलगते
डोळ्यावरची झापड जाऊन
इंद्रियात दाटते तरतरी
बाळा संगे खेळ खेळण्या
शरीर थकले धरी उभारी
कितीक सण आले नी गेले
कधीच नव्हती त्यात नव्हाळी
कृष्णासम सांगाती भेटे
आनंदाची खरी दिवाळी
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान रचना 👌👌👌
अतिशय सुंदर! वैद्य सरांची कविता आणि समर्पक चित्र योजना.आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे मनोगत खरी दिवाळी कोणती हे सुरेख स्पष्ट करते.
भन्नाट कविता. आपल्यात अफलातून काव्यगुण आहेत. अजून काही कविता वाचायला आवडतील. धन्यवाद.
खूप सुंदर कविता