Friday, December 27, 2024
Homeकलाचित्र सफर : ४१

चित्र सफर : ४१

“मुळशी पॅटर्न”

“मुळशी पॅटर्न” हा चित्रपट २३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रर्दशीत झाला. हा चित्रपट या अंतहीन आणि रक्तरंजीत पळापळीचा मागोवा घेत राहतो.

या चित्रपटाची कथा ही पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याची असली, तरी ती ‘प्रगत’ शहरांच्या बाजूला असलेल्या कोणत्याही भागाला लागू होईल. या कथेत आपली जमीन विकलेले एक शेतकरी कुटुंब आहे. गावचा पाटील असलेल्या सखाराम (मोहन जोशी) या कर्त्या पुरुषाने जमीन विकून आलेले पैसे संपल्यानंतर त्याच बिल्डरकडे वॉचमनची नोकरी स्वीकारलेली आहे. त्याचा मुलगा राहुल (ओम भूतकर) हे सारे पाहतो आहे आणि वडिलांना सतत टोचतो आहे. हातातील सारे काही संपल्यानंतर हे कुटुंब पुणे शहरात येते. वडील मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करू लागतात. एका झटापटीत मुलगा तुरुंगात जातो आणि तेथेच त्याला नान्या भाई (प्रवीण तरडे) हेरतो. त्याला आपल्या टोळीत सामील करून घेतो.

या मुलाच्या एकंदर वागण्यामुळे त्याचे नाव बकासूर पडते आणि हा बकासूर एक दिवस आपल्या भाईचाच घास घेतो. आता तो सार्वभौम होतो. नियमाला बांधलेले असल्यामुळे पोलिस खाते फार काही करू शकत नसते. इन्स्पेक्टर कडू (उपेंद्र लिमये) त्यावर एक क्लृप्ती काढतात. राहुल भाई डोके लढवून एक एक शिडी चढतो आणि बरोबरीने वैरीही निर्माण करतो. घरचे मुलाच्या गुन्हेगारीतून आलेल्या पैशांवर जगणे नाकारतात. पुढे चित्रपटाचा शेवट अपेक्षित वळणाने जातो.

ही कथा साधी, सरळ असली, तरी त्याची मांडणी, संवाद आणि पटकथा या बाबतीत लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चांगले काम केले आहे. एखाद्याच्या डोक्यात खून चढतो म्हणजे किती, साऱ्याच गोष्टींचे टोक गाठतो म्हणजे किती, आपल्याकडे पैशाने विकत घेण्यासारखी नसणारी गोष्ट दुसऱ्याकडे असणे किती बोचते, हे दर्शविणारे हॉटेलमधील दृश्य अंगावर काटा उभा करते.

चित्रपट ज्या गोष्टीमुळे संपतो, ती या अव्याहत चाललेल्या चक्राचे प्रतिनिधित्व करते. ओम भूतकर हा अभिनेता त्याची भूमिका जगला आहे. डोक्यात राग असलेला, साऱ्याचा दोष आपल्या वडिलांच्या निर्णयावरच मारू पाहणारा आणि वडिलांच्या ओठांवरचे हास्य हरपले आहे, याचा साक्षात्कार झाल्यानंतर खचलेला भाई तो ताकदीने रंगवतो. मोहन जोशी तो बाप उत्तम उभा करतात. जमीन विकल्याचे ओझे त्याच्या खांद्यावरून कधीच उतरत नाही आणि खाली झुकलेली नजर अधिक बोलकी होते.

महेश मांजरेकरांचे पात्रही परिस्थितीमुळे ओझी वाहणारे. त्यांच्या संवादांतून अनेक गोष्टी उमजत जातात आणि त्यांचे असणे अधिक गहिरे करतात. बकासुराचा घट्ट मित्र असलेला गणेश (क्षितिश दाते) उत्तम. बकासुराचे विरोधक असणारे आणि खरेतर त्याच्या कुवतीशी बरोबरी करू न शकणारे भाई रमेश परदेशी आणि देवेंद्र गायकवाड यांनी चांगले उभे केले आहेत. वकिलाची भूमिका सुनील अभ्यंकर छान साकारतात.

अभिनय, चित्रीकरण, संवाद या पातळ्यांवर जमून आलेल्या या चित्रपटावरील पकड मध्यंतरानंतर थोडी सैलावते. ‘आरारा’ हे गाणे जमले आहे, त्याहीपेक्षा त्यातील वळण अधिक अंगावर येणारे. संकलन आणि थोड्या रेंगाळणाऱ्या जागा अधिक काटेकोरपणे सांभाळल्या असत्या, तर चित्रपट अधिक उत्तम झाला असता.

हा चित्रपट पाहताना आपल्याला वारंवार जंगलाच्या कायद्याची आठवण येत राहते. खरेतर असे म्हणणे थोडे चूक; कारण जंगलामध्ये भूक लागल्याशिवाय कोणी कोणाची शिकार करत नाही. माणसाने उभारलेल्या या काँक्रीटच्या जंगलात वखवख थांबतच नाही. या वखवखीचा शेवट या साऱ्याच भाईंसारखा अपरिहार्य असला, तरी त्याची तो पर्यंतची चमक अनेकांना आकर्षित करून घेते आणि खरा धोका तोच आहे. काही वेळा जमीन विकली जाणे अपरिहार्य होते. त्यानंतर आलेल्या पैशांचे नियोजन करणे जमायला हवे. त्यासाठीची जी उपजत शहाणिव असते, ती पैशांचा चकमकाट आणि त्यातून मिळणाऱ्या पोकळ डामडौलापुढे खुजी ठरते. ‘माझे वडील अर्धा एकरच जमीन कसतात; पण अभिमानाने’ हे उदय भाऊंचे वाक्य त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे. ते समजेल, तेव्हा हा पॅटर्न पुन्हा एकदा माणसाच्या पातळीवर येण्याची शक्यता निर्माण होईल.

संजीव वेलणकर

— संकलन : संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९