दैनंदिन कृतीतून
क्षण सुखाचे शोधता
तुझे तुलाच कळेल
किती त्यांची सहजता – १.
डोळे उघडून पाही
तूच जरा आसपास
कवडसे ते सुखाचे
हाती येती असे खास – २.
हास्य बाळाचे पाहता
उर्मी आनंदाची येते
गोड बोबड्या बोलांनी
दूर उदासी पळते – ३.
स्वर भक्तीचे प्रभाती
पडताच कानांवर
जळमटे नैराश्याची
उडतात वाऱ्यावर – ४.
फुललेल्या सुमनांनी
फिटे डोळ्यांचे पारणे
रंध्र रंध्र शरीराचे
सुगंधाने ते भारणे – ५.
कलरव विहंगांचा
रवी आला ग्वाही देतो
रानीवनीं परिसर
स्वागतास सज्ज होतो – ६.
असे शोधता शोधता
घेई मनात भरून
क्षण सुखाचे अमाप
दूर दुःखास ठेवून – ७.
— रचना : श्रध्दा जोशी. डोंबिवली
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वाहवा, खूप छान. कवितेतून एक सोज्वळ पण सकारात्मक भाव स्पष्ट जाणवला. धन्यवाद.