एक प्रपोजल असंही…😍 Sr. Citizens च्या जीवनमानातील ही एक कथुली- कल्पनेची जोड दिलेय आजचा ८ फेब्रुवारी -प्रपोज दिन गोड व्हायला !!😊
प्रपोज डे
मन लावून सेलफोनमध्ये काहीतरी लिहिण्यात निलांबरी मग्न होती.
‘आताशा हे व्यसन लागल्यागतच झालंय हिला. दिवस सुरू होतो तोच मुळी, “कराग्रे वसते की-पॅड, कर मध्ये भ्रमणध्वनी“ स्टाईलमध्ये.
आत्ता तर काय दुपारचे ४ वाजलेत म्हणजे सोशल ॲकॅटिव्हीटीज् चा ऐन बहर !😏
हर्षवर्धन मनातल्या मनात करवादले तरी कपाळावर आठी उमटलीच🤨 नि डायनिंग टेबलजवळची खूर्ची देखिल अंमळ *खरखरत* खेचली गेली त्यांच्या हातनं !!
“अहोs, ऐका नं ! कालपासून सुरू झालेला व्हॅलेन्टाईन week साजरा करण्याचं पक्कं ठरलंय हं माझं ! *अपने ढंगसे* नि *ज्येष्ठतासे* बर्रका !
मी जरा मार्केटात जाऊन येतेय चहा घेऊन झालाकी !! चहा तयारचै, मी थांबलीये तुमच्यासाठी ! आत्ता आणते.”
खूर्चीची *त्रस्त खरखर* 😉चाणाक्षपणे ओळखून, हातातला फोन ठेवून सुहास्य मुद्रेनं निलांबरीने तातडीने कीचनकडे मोर्चा वळवला.
“कायै हा खुळचटपणा ? आपली *संत-महात्म्य* वाचण्याच्या ह्या वयात हे काय प्रवाहपतितासारखं ‘सेंट व्हॅलेंटाईन वगैरे , अं ??”
गर्रम चहाचे घोट पोटात गेल्यावर खरंतर जर्रा मूड बरा झाला होता तरीही … प्रश्न गेलेच हर्षवर्धनच्या तोंडून !
चालायचंच ! अनायसे लेक्चर द्यायची चालून आलेली संधी कोणता नवरा सोडतोय हो ?🤓
हे लक्षात घेऊन निलांबरी, जर्राही ‘न रागावता’ नि ‘संयमाने’ (V-week के असरके मारे😛) मोबाईल पर्समध्ये टाकून घराबाहेर पडली देखिल.
‘हे इतकं नैराश्य का भरून राह्यलंय मनात आताशा ? ये दोस्तोंके बिना की जिंदगी भी क्या जिन्दगी होती है ? रिटायरमेंट नंतरच्या धम्माल गाठीभेटींची किती चर्चा व्हायची पूर्वी सगळे मित्र एकत्र जमत असू तेव्हा नि बघता बघता सगळे विखूरले—लेकीसुनांच्या अडचणी निभावायला कोणी परदेशवारीवर तर कोणी ह्या वयात मुलांजवळ असलेलं बरं, म्हणून देशातच अन्य ठिकाणी स्थलांतरीत झालेले. कस्सल्या पार्ट्या नि कसलं बसणं– सगळे बेत मनातच बसले 😔 शिवाय, शरीरही शत्रू पक्षासारखं वागत राहिल्याने, आपलं नुस्तं *काढदिवस* चालंलंय नि हिचा उत्साह मात्र दिवसेंदिवस वाढतच चाललाय.‘
निलांबरीच्या गैरहजेरीत एकटेपणा जाणवून हर्षवर्धनांची चिडचिड अधिकच तीव्र झाली. ते मोबाईल चेक करण्याचं दुपारचं ‘आन्हिक’ (?) एकदा उरकावं म्हणून त्यांनी मोबाईल हाती घेतला.
पहिलाच मेसेज निलांबरीचा-😲
‘काय विसरलीय कोण जाणे, मी मुळीच काही शोधाशोध करून उल्टा मेसेज करणार नाहिये’ असं स्वत:शीच पुटपुटत त्यांनी वाचायला सुरूवात केली.
“ हर्षवर्धन,
(चक्क नावाने सुरूवात ?🤔 अंमळ सुखावले निलांबरीचे ‘अहो’ 😀)
तुम्ही मित्रांना, त्यांच्याबरोबरच्या interactions ना खूप जास्त मिस करता हे जाणते मी. तुम्ही सातासमुद्रापार असलेल्या लेकीलाही खूप जास्त मिस करता, हेही मी समजूच शकते.
पण….
लेक सांगते तसं ‘ मूव्ह-ॲान’ करायला शिकून बघूयात की ! नि *आत्ताच्या जनरेशनची सगळी फॅडं* म्हणून बोल लावण्यापेक्षा, नविन गोष्टी आपल्या वयाला साजेलशा रितीने आपल्याशा करून बघूयात की ! आज ‘ प्रपोज डे ‘ च्या निमित्ताने मी तुम्हाला प्रपोज करतीये.
हां हां, ‘आता लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर काय वेडेपणा लावलाय हा ? ..पासून सुरू होणारी तुमची सगळी प्रश्नावली दिसतेय मला हे लिहीताना’!
परंतु , ॲालरेडी बायकोच्या भूमिकेतच असल्यामुळे, नॅार्मली प्रपोज करतांना हिच्या (किंवा ह्याच्या) मनात फक्त मित्रत्वाची भावना असेल तर ????
ही जी धडधड असते ती नाहिचै माझ्या मनात ! 😊
माझं प्रपोजल आहे मित्र होण्याचं ! लग्नानंतरच्या ह्या प्रवासात प्रसंगानुरूप-कर्तव्यानुरूप, कधी प्रेमात तर कधी रागात,
कधी भांडत तर कधी मिळतं-जुळतं घेत अनेक नाती निभावली आपण. आता आस आहे ती निखळ मैत्रीची. किती दूर वा जवळ आहे हे माहित नसलं तरी अटळ असा पैलतीर दिसू लागलेल्या ह्या टप्प्यावर *मित्र * व्हाल माझे ? मैत्रीचा हात स्वीकारला की पुढची वाटचाल सहजच *मोकळी – ढाकळी* होऊन जाईल. 👍 हळुहळु पटतंय नं ?
पटणारच ! म्हणून तर मार्केटमध्ये आले खरेदीला. SO ‘आज की शाम संत व्हॅलेन्टाईन के नाम’ !😃
हां हां, ‘ नो मोअर वर्डस् लाईक खुळचटपणा n all you know !’ 😎”
हर्षवर्धनांचं वाचून पूर्ण होतंय तोवर बेल वाजलीच. लाल गुलाबाचा गुच्छ, नव्हे ‘रेड रोझेस बोके’ हातात जपून धरलेली निलांबरी घरात शिरून खुर्चीत बसकण मारण्याच्या आधीच हर्षवर्धनांनी किंचित लवून सेंट व्हॅलेन्टाईनी अविर्भावात गुच्छ स्वीकारला की हो !!😍
आता, मार्केटपर्यंत न जाता जवळच्या बस स्टॅापवर मेसेजच्या *निळ्या लाईन्स* दिसेपर्यंत, अनेक ग्रुप्समध्ये शुभेच्छांची फॅारवर्डा-फॅारवर्डी करत वेळ काढला कसाबसा नि नंतर नेहेमीच्या फुलवाल्याला आधीच ॲार्डर देऊन ठेवलेला पुष्पगुच्छ कलेक्ट करून निलांबरी दमूनभागून (?) घरी आल्याचं कशाला सांगायचंय हर्षवर्धनाना ??😛😛
मैत्री बिगिन्स हे महत्त्वाचं, काssय ??

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— फोटो : नेट सौजन्य !!🙏
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800