Wednesday, March 12, 2025
Homeबातम्या'घुंगुरकाठी' : एक पाऊल पुढे

‘घुंगुरकाठी’ : एक पाऊल पुढे

नमस्कार मंडळी,
‘घुंगुरकाठी’ म्हणजे काय ? हे आपल्याला माहिती आहे का ? निदान मला तरी माहिती नव्हते. या शब्दावरून मी असा अर्थ घेतला होता की, गुराखी जनावरांना चरण्यासाठी रानात नेताना, जी काठी वापरतात, त्या काठीला घुंगरु लावत असतील आणि म्हणून त्या काठीला ‘घुंगुरकाठी’ असे म्हणत असतील. पण ते तसे नाहीय. मी घेतलेला अर्थ चुकीचा निघाला, असे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘घुंगुरकाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक, माझे सहकारी, मित्र, निवृत्त माहिती उप संचालक श्री सतीश लळीत यांच्याकडे विचारणा केली असता कळाले.

तर घुंगुरकाठी म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ‘संरक्षक देवता ’ही संकल्पना आहे. या संरक्षक देवता रात्रीच्या वेळी संचार करुन गावाचे रक्षण करतात, वाईट हेतुने फिरणाऱ्यांना पिटाळून लावतात, चुकल्यामाकल्यांना मदत करतात, अशी जनतेची श्रद्धा असते. या देवतांच्या हातात एक काठी असते, तिला घुंगुर लावलेले लावलेले असतात. तिला ‘घुंगुरकाठी’ असे म्हणतात. रात्रीच्यावेळी या काठीचा आणि घुंगुरांचा आवाज येतो पण काठी किंवा देवता दिसत नाही, अशी ही श्रद्धा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यप्राणीसंपदा, पर्यावरण, सह्याद्री (पश्चिम घाट) मधील विपुल जैवविविधता, सांस्कृतिक व सामाजिक पर्यावरण धोक्यात आले आहे. या सर्वांचे रक्षण ही आज तातडीची गरज झाली आहे. म्हणून यासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे नाव ‘घुंगुरकाठी’ असे ठेवण्यात आले आहे.

आता नियमित उपक्रमांबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यरसिकांना एकत्र आणून ओरोस परिसरात साहित्यिक चळवळ सुरु करण्याच्या आणि लोकांना पुस्तकांकडे वळविण्याच्या उद्देशाने ‘घुंगुरकाठी’ संस्थेने पुढाकार घेऊन ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाची स्थापना केली आहे.

या व्यासपीठाची पहिली बैठक नुकतीच ओरोस येथे झाली. यावेळी हे व्यासपीठ सुरु करण्यामागची भूमिका स्पष्ट
करताना श्री लळीत यांनी सांगितले की, ओरोस, येथे साहित्यिक कार्यक्रम फारच अपवादाने होतात. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या साहित्यप्रेमी, वाचनप्रेमी, काव्यप्रेमी रसिकांची याबाबत उपासमार होते. ओरोसची ही उणीव भरुन काढण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून या व्यासपीठाची स्थापना करण्यात येत आहे. सध्या आपापसात वाढलेला द्वेष, मोबाईल आणि सोशल मिडियाचा अतिरेकी वापर, स्वस्त मनोरंजन यामुळे सामाजिक मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे. नवी पिढी याच्या पूर्ण आहारी गेली आहे. वाचनसंस्कृती वाढविणे, साहित्यविषयक छोटे छोटे उपक्रम राबवून एकत्र येणे, हा यावरचा उपाय आहे. यासाठी ‘घुंगुरकाठी’ स्वयंसेवी संस्थेतर्फे असे कार्यक्रम करण्यासाठी ‘आम्ही साहित्यप्रेमी’ हे अनौपचारिक व्यासपीठ सुरु करीत आहोत.

या व्यासपीठाच्या माध्यमातून व्याख्याने, छोटे साहित्य मेळावे, कविसंमेलने, छोट्यांसाठी वाचनाचे कार्यक्रम, कथाकथन, नाट्यप्रवेश वाचन, वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, लेखक, कवींच्या मुलाखती याबरोबरच संगीताचे कार्यक्रम, लोककलाकारांचे सादरीकरण असे कार्यक्रम करण्याचा विचार आहे. व्यासपीठातर्फे महिन्याला किमान एक कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी माहिती डॉ. सई लळीत यांनी दिली.

या व्यासपीठाचा पहिला कार्यक्रम कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारीला अनंत शिवाजी देसाई वाचनालयाच्या सहकार्याने घेण्याचे निश्चित झाले. रवळनाथ मंदिराच्या मागे असलेल्या देसाई वाचनालयात हा कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता होईल. यावेळी लेखक प्रा. प्रवीण बांदेकर ‘वाचनसंस्कृतीवरील आक्रमणे’ या विषयावर बोलतील. नंतर कवी दादा मडकईकर सुश्राव्य मालवणी कविता सादर करतील. हा कार्यक्रम सर्व साहित्यरसिकांना खुला आहे.

देसाई वाचनालयात झालेल्या या बैठकीला वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, सर्वश्री उदयकुमार जांभवडेकर, रामचंद्र घोगळे, सुरेश पवार, श्रीराम चव्हाण, सतीश चव्हाण, सुधीर गोठणकर, शंकर कोकितकर, डॉ. अनिल ठोसरे, श्रीमती सुप्रिया वालावलकर, ग्रंथपाल नेहा कशाळीकर, नम्रता रासम, आर्या बागवे, सुस्मिता राणे, वैष्णवी परब उपस्थित होते. या सर्वांनी चर्चेत सहभाग घेत उपक्रमाचे स्वागत करुन सहकार्याचे आश्वासन दिले.

— टीम एन एम टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित