“वाया गेलेले पोर”
लेखक डॉ. विजय शिरीषकर, वसई – यांचे ‘वाया गेलेले पोर’ हे पुस्तक म्हणजे गरिबीने गांजलेल्या मुलांसाठी एक वाचनीय अनमोल ठेवा आहे. कितीही पराकोटीची गरिबी असेल अन आयुष्य घडविणेसाठी जिद्द जर दांडगी असेल तर स्वतःच्या पायावर उत्तमरित्या आदर्शवत उभं रहाता येतं याचा उत्कृष्ठ नमुना म्हणजे हे पुस्तक. हा आदर्श इतरेजनांनी अंगिकारला तर त्यांची स्वप्नें पुर्ण होतील यात काही शंकाच नाही, इतक प्रभावी हे आत्मकथन आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अळसुरे या दुर्गम गावी अत्यंत गरीब परिस्थितीत जन्म झालेला जणूं अठरा विश्व
दारिद्र्य घरात असलेला लेखक त्याच्या बालपणात गुरंढोरं चारल्यावरच अन्नाचे दोन घास खायला मिळायचे असा अन दोन तास शाळेत जायला मिळायचे तेवढा वेळ म्हणजेच शाळा, अशी शिक्षणाची अवस्था. स्वप्नपुर्ती करायला डोळ्यात आशेचा किरण शिल्लक राहिलेला नसताना लेखकाचं जगणं गुरे चारणे, रस्त्यावरच वाढणे असंच आहे का ? हा प्रश्न छळत असायचा.

आयुष्यात सोनेरी सकाळ कधी तरी नक्कीच सोनपावलांनी उगवेल या आशावादाने आयुष्याची वेचलेली अनेक वर्ष अन त्या कालावधीत सतत संघर्षाशी केलेला संघर्ष, धडपड अन त्यातूनच कष्टाने, परिश्रमाने, अथक मेहनतीने, वेळप्रसंगी अवहेलना उपासमार सोसून जिद्दीने एम. डी., डी. जी. ओ. ही पदवी प्राप्त करून मिळवलेल्या यशाची यशोगाथा म्हणजे ‘वाया गेलेले पोर’ हे पुस्तक होय.

लेखक यशस्वी कसा झाला हे वाचताना आपल्या डोळ्यातून अश्रु पाझरतात आणि मन हेलावून जाते. पुर्वी अशी अनेक उदाहरणे पुस्तकातून वाचली आहेत परंतु या लेखकाचे पुस्तक त्याहूनही कितीतरी वेगळे, त्याच्या दुःखाचा, हाल अपेष्टांचा स्पर्श आपल्या मनाला करून जाणारे असेच हे. वाचताना त्याच्या आयुष्यातील अशा अनेक प्रसंगांची शृंखला चलत चित्रपटासारखी डोळ्यासमोर तरळून जाते अन हे वास्तव वाचताना असे आयुष्य कुणाच्याच वाट्याला येऊ नये इतकं हृदयद्रावक हे आत्मकथन आहे.

आर्थिक तीव्र चणचण, घरी दारू विक्रीचा धंदा पोलिस आले की ऊर फुटस्तोवर धाऊन घरी वर्दी देण्याचं काम आठ नऊ वर्षाचा असताना करावा लागणे, फावल्या वेळात बुट पॉलिशचा धंदा अंगिकारावा लागणे, त्यातून मिळणाऱ्या पैशाने जुगार खेळणे, मवालेगिरी करणे, कुठे मिठाई वाटत असतील तर त्या चेंगराचेंगरीत घुसून ती मिळवणे, हो तेवढेच तर गोड खाणे खायला मिळायचे ना! पण आपण शिकायचंच ही जिद्द कायम होती. हा काळ साठ वर्षांपूर्वीचा त्यातूनही लेखकाने मार्ग कसे काढले, काय काय सोसले, झेलले डॉक्टरकीचे शिक्षण कसे पुर्ण केले, स्वतःचे हॉस्पिटल कसे उभारले हे त्याचे आत्मकथन वाचकांनी मुळात वाचण्यासारखेच. एकूण तेवीस प्रकरणात याचा हळूहळू उलगडा होत जातो, प्रत्येक प्रकरण पुढे काय? पुढे काय?……. आपली उत्कंठा वाढवित जाते अन पुस्तक हातातून खाली ठेवावे असे वाटतच नाही इतकं प्रभावी हे पुस्तक आहे.

डॉक्टर झाल्यावर सुरवातीची काही वर्ष नोकरी केली त्यानंतर स्वतःचा छोटेखानी दवाखाना सुरू केला अन हे करत असताना पुढील शिक्षण घेणे सुरूच ठेवले. आज टेस्ट ट्युब बेबी सेंटर, (आय. व्ही. एफ.) लेप्रोस्कोपी सेंटर, अगदी जोमाने सुरू आहेत. मुंबईतील फितवाला बिल्डिंगच्या बाजूला असणाऱ्या बकाल झोपडपट्टी वस्तीत चाळीस चौरस फूटात कुटुंबासमवेत रहाणाऱ्या या लेखकाने धन्वंतरी टॉवर्स हा अकरा मजली इमारतीचा चाळीस हजार चौरस फूटाचा टॉवर उभारून ‘नवजीवन हॉस्पिटल’ सुरू केले जणूं स्वप्नांचा एक मिनार बांधून पुर्ण केला. त्यातच दोन मजले स्वतःच्या कुटुंबाला रहाण्यासाठी ठेवले. स्वतःच्या मुलाला डॉक्टर केले याच यशोगाथेचे आत्मकथन ‘वाया गेलेले पोर’ या पुस्तकात वाचायला मिळते. लेखकाचे अजून एका गोष्टीसाठी कौतुक की हे पुस्तक त्यांनी “माझ्या त्या वेळच्या परिस्थितीतून जात असलेल्या सर्वांना” अर्पित केले आहे.
यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा ‘विजय’ असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा ‘विजय’ असतो तसा लेखक त्याच्या जीवनात समाधानी आहे हे जाणवते. शाळेच्या पुस्तकातून जे धडे शिकायला मिळाले नाहीत ते धडे आयुष्याच्या पुस्तकानी शिकवले अन त्यातूनच लेखकाचे आयुष्य घडले, असं मला वाटतं.
गरिबी, हाल अपेष्टा, काटेकुटे असणाऱ्या जीवनाच्या वाटेवरून चालता चालता गुलाब पाकळ्यांच्या गालिच्याचा समर्थ, यथार्थ पथ स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने स्वतः निर्माण करावा हे अप्रुपच. अन असा हा आदर्श त्या परिस्थितीतून जाणाऱ्या विद्यार्थ्यानी घ्यावा अशी प्रेरणा देणारे हे पुस्तक निश्चितच आहे यात तिळभरही शंका नाही.

डॉक्टरी पेशात स्थिरस्थावर झाल्यावर मला पाठबळ देणाऱ्या समाजाचे अनेक ऋण आहेत अन त्यातून उतराई होणेसाठीचे सजग जागृत भान याची जाणिव मनात ठेऊन सदभावनेने गरजू मुलांना अर्थार्जन करणे, मदत करणे हे सुरूच आहे. इतकेच करून न थांबता “डॉ. विजय शिरीषकर वृद्धाश्रम” सुरू करून पंच्याहात्तर पेक्षा जास्त आजी आजोबांची उत्तम सोय करून दिली आहे. गरिबालाच गरिबाची व्यथा कळते या उक्ती प्रमाणे सढळ हाताने काही सेवाभावी संस्थांना मदतीचा हातभार लावण्यात लेखक धन्यता मानतो. ‘वाया गेलेले पोर’ या पुस्तकावर भविष्यात एखादा चित्रपट निर्माण झाला तर मुळीच आश्चर्य वाटायला नको असेच हे हृदयस्पर्शी कथानक आहे, हे निर्विवाद सत्यच.

डॉ. विजय शिरीषकर यांचं आत्मकथन प्रत्येक वाचकाला खिळवून ठेवेल असेच. डॉ. मधुमती जोगळेकर – पवार यांनी या पुस्तकाचे शब्दांकन अगदी ओधवत्या प्रवाही भाषेत अत्यंत सुंदर केले आहे. खरं तर ते आत्मचरित्रच आहे परंतु लेखक मात्र मी कुठे इतका महान उत्तुंग आहे असं म्हणत हे आत्मकथन आहे असे सांगतो हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. अत्यंत सुंदर बांधणी, उत्कृष्ठ दर्जाचा पेपर असलेले हे आत्मकथन प्रत्येक रसिक वाचकांनी आवर्जुन वाचावे इतके वाचनीय आहेच मुळी.

— परीक्षण : सुनिल चिटणीस. पनवेल, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
पुस्तक तर छान आहेच परंतु पुस्तक परिचय सुद्धा वाचकाला हे पुस्तक विकत घेऊन वाचन्याण्यास प्रवृत्त करेल इतके सुंदर झाले आहे. लेखक व श्री सुनील चिटणीस यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.