Friday, March 14, 2025
Homeलेखमहाशिवरात्री…

महाशिवरात्री…

आज महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊ या महाशिवरात्री चे महत्व.
महाशिवरात्री च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दु:ख नष्ट करण्या ची शक्ती आहे.

‘शिव’ म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा ‘नमः’ हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे. उमा-महेश्वर हा देवादी देव महादेव आहे. ‘नम: शिवाय’ या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठी सार्थ ठरला आहे.

शिवशंकराला देवांचा देव महादेव असे म्हणतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. ‘हर हर महादेव…’, अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. शिव नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिव शंकराचा धावा करीत असतात.

शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे. शिव भोळा सांभ आहे. तो फार लवकर पावतो अशीही श्रद्धा असते.

अशा आपल्या लाडक्या शिवाचे व्रत – शिवरात्र व्रत.
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते.

शिवलीलामृत मध्ये एक कथा आहे….
दिवस महाशिवरात्रीचा. एक पारधी शिकारीसाठी जंगलात जातो. एका जलाशयाजवळ झाडावर बसतो. पण दिवसभर वाट पाहून ही त्याला शिकार मिळत नाही. कंटाळतो. तेवढयात त्या जलाशयाजवळ हरिणाचा एक कळप पाणी पिण्यासाठी येतो.. पारधी खुश होऊन धनुष्याची दोरी खेचतो. तेवढ्यात त्या कळपातील मुख्य हरीण समोर येते विनवणी करू लागते. हे राजन शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तसेच माझीही काही जबाब दारी आहे. मी माझ्या जबाब दारी पूर्ण करून सकाळी येतो. मला मार. पारध्याला दया येते तो परवानगी देतो.

रात्री पारधी झाडावरच थांबतो. दूरवर एका शिव मंदिरात भजन कीर्तन चालू असते. ते त्याच्या कानावर पडते. ‘ॐ नमः शिवाय’ जप चालू असतो. तो ही नकळत जप करू लागतो. सहज झाडाची पाने खाली टाकू लागतो. ती पाने नेमकी बेलाची असतात. खाली महादेवाची पिंड असते त्यावर बेलपत्र पडतात. त्याला उपवास घडतो तो ही नकळत.

सकाळी हरीणाचा कळप पुन्हा हजर. मुख्य हरीण म्हणते मला मार. तेवढ्यात त्या हरीणची पत्नी म्हणते मला मार. मला पत्नी व्रत करू दे. मुले मानतात नाही आम्हांला मार. त्यांच्यात चढाओढ चालू होते.. पारध्याला दया येते. तो सर्वाना सोडतो.

नकळत शिवव्रत व पूजा झाली म्हणून शिवशंकर प्रसन्ना होतात. सर्वांचा उध्दार करतात.
हरीणांना मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्रनक्षत्र हे आढळ स्थान आकाशात मिळते.

महाशिवरात्र म्हणजे काय ? : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळालामहाशिवरात्री’ असे म्हणतात.

शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिवध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.
अशा पद्धतीने पुराण कथेसहित शत्रोक्त आधारही आहे.

शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे म्हणजे एकदाच काही उपवासाचे खावे. काही लोक अनेक पदार्थ करून खात राहतात. असो….

शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगाला लेपन केले जाते. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा केली जाते.

मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

.. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे.

शिवाला बेलपत्र प्रिय :
एका कथेनुसार..
एकदा विष्णुची पत्नी लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर प्रतिदिन 1001 पांढरे कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्यामचे ठरविले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहचल्यानंतर तीन कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आहे. त्याला त्रिदलासारखी पाने त्याला होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्मीेने तोडून शिवलिंगवर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तिमधील सामर्थ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले व तेव्हापासून ‍शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे. भक्तावर तत्काळ प्रसन्न होणारा शिवशंकर खरोखरच महादेव आहे.

शिवाचे ध्यान
ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारूचंद्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌ ।
पद्मासीनं समन्तात्‌ स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं
विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभय हरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌ ।
ॐ नमः शिवाय, ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ।
ॐ नमः शिवाय, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं स्नानं समर्पयामि।

जे जमेल ते करावे. बस जे कराल ते श्रद्धेने करावे ही विनंती,
श्री गुरुचरित्र ४४ व्या अध्यायात एक कथा आहे….

किरातदेशीं ‘विमर्षण’ राजा व कुमुद्वती राणी यांच्या पूर्वजन्माची कथा. विमर्षण राजा पूर्वजन्मी कुत्रा असतो.. एक दिवस त्याला खायला मिळत नाही उपवास घडतो. तो अन्नाच्या शोधात शिव मंदिरी जातो. त्याला सारे हाकलत राहतात. तो पुढे पळत राहतो त्या निमित्ताने मंदिराला तीन प्रदक्षिणा करतो. शिव पूजा पाहतो. तो त्या रात्री मरतो पण शिवरात्र व्रत नकळत होतो. तेवढ्याने त्याला नवा जन्म राजाचा मिळतो. त्याची पत्नी कुमुद्वती राणी पूर्वजन्मी कबुतर असते. तिच्या तोंडातला घास पाहून त्याच्या मागे घार लागते. कबुतर घाबरून जोरात उडू लागते. नकळत शिवमंदिराला प्रदक्षणा करते. घार तिला मारते. शिव पूजा पाहून ती उपवास करून मारते. तिला पुढील जन्म राणीचा मिळतो.

नकळत घडलेल्या पुण्यामुळे इतके काही मिळते. तर नीट श्रद्धेने शिवरात्र केली तर कसे होईल.

शास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको तीर्थासि जाऊं नको ।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ।
काळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडू नको ॥
॥ इति श्रीशिवस्तुति ॥
ओम नम : शिवाय ..

— लेखन : हेमंत मुसरीफ. निवृत उपमहाप्रबंक,
बॅंक ऑफ महाराष्ट्र, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित