Wednesday, March 12, 2025
Homeसाहित्यमावळती

मावळती

मावळतीला बरेचदा निराशेची, भयाची किनार असते. कशी कातरवेळ असल्यासारखी भासते. ऊगवता नविन आशा ,ऊमेद घेऊन येतो मग ऊगवती मावळतीनंतरच येत असेल तर मावळती नविन ऊष:कालाची चाहुल कां दाखवत नाही.
सुर्य बिंब जस जसं पश्चिमेला कलायला लागतं तसं ते थकलेलं वाटतं. हळूहळू ते आभाळभर अबोली भगव्या रंगात रंगतं….. जवळपास जलाशय असतील तर तेही त्याच रंगात बुडून जातात. मग ते सूर्य बिंब संध्या आपल्या मिठीत कधी घेते समजतसुद्धा नाही. कधीच ते सागराच्या पोटात किंवा डोंगराआड गुडूप होतं.
मग होते कातर सांजवेळ. ही मनाला फार घाबरवते. वेशीवर देवळात, घरोघरी आभाळात सगळीकडे ती काळ्या सावलीसारखी झपाट्याने पसरत जाते. काही दिसेनासं होतं. काळकभिन्न राक्षसासारखा हा अंधारराक्षस जणू अंगावरच येतो. कसला आवाज येत नाही आणि त्या अंधारातली निशब्दता अधिकच घाबरवते. बहुदा म्हणुनच सांवेळेपासुनच मन मावळतीला भयभीत, निराश करते.

पण हीच काजळ रात्र पशुपक्षी, कष्टकरी, यांना हक्काची विश्रांती देते. पक्षी निवार्याकडे येतात. मावळतीचा सूर्य मावळतानाच ऊष:कालाची वर्दी देऊन जातो. नविन पहाटेची नविन ऊमेद देऊन जातो. स्वता: परत सुवर्णरथावर बसुन चराचरावर सोने ऊधळत येतो. नव्या दिवसाची नव्या जल्लोषाची सुरवात करतो. सृष्टीत नवे चैतन्य भरतो. म्हणुन मावळतीतच ऊद्याच्या आशा अपेक्षा चाचपडायच्या. शोधायच्या आणि नवा मार्ग आखायचा. निराश, ऊदास न होता मावळतीतुन ऊद्याचे स्वप्न बघायचे.
जिवनातही बालपण हे आनंदी ऊत्साही, कौतुकाचे असे खेळकर बागडणारे असते. जाण, समज येई स्तोपर्यंत आपण तारूण्यात पोंचतो. नवी स्वप्न पहातो. अपेक्षा ठेवतो. नवे डाव मांडतो. स्वप्नांचा सूर्य तळपत ठेवतो. त्याला आशेचं खत पाणी घालुन स्वप्न पुरी करत बसतो आणि आयुष्याची संध्या अचानक दिसू लागते. पैलतीरावर ची तळपत्या सूर्याला कवेत घेणारी संध्येची छाया आयुष्याचे आकाश व्यापुन टाकते. घाबरवुन सोडते. तो पैलतीरावरचा मावळता सूर्य कधी त्या भयावह संध्येच्या काळमिठीत विसावेल ही भिती दाटू लागते.
आपण आपल्या कमावलेल्या कर्तृत्वावर खुश असतानाच मनाला ही कृष्णसंध्या औदासिन्याची जादूची फुंकर घालते. आणि क्षणात समजतं…. ऊमगतं.. “झाली आयुष्याची मावळतीची सुरवात.. समोर पैलतीर.. त्यावर कृष्णछायेची संध्या.. आणि मावळतीचा सूर्य…”.

मन निष्क्रिय ऊदास होते. क्षणात समजते .. “आता ऊगवतीचा सूर्य कधीच प्रकाशणार नसतो”. गात्र शिथील होतात. एकंदर शरीरच साथ संगत सोडायला लागते. ऊगवतीच्या वेळची मित्रमंडळी, नातलग, आसपासची यांची गर्दी हटायला लागते. सोबत, सहवास, अशी सुटायला लागल्यावर मनाचा ताबा तो एकटेपणा घेतो. थकलेली गात्र पण साथ सोडायला लागतात व एकेक संवाद साधणार्या क्रिया बंद पडतात. तो एकटेपणा नकोसा होतो.
मग मनुष्य आपल्या श्रद्धास्थानाला शरण जातो. त्याच्या हातात हात देऊन समोरचा पैलतीर गाठायचा प्रयत्न करतो. दुसरा मार्गच ऊरत नाही.
मावळती डोक्यावर येते तेव्हा तो मनाने शांत होतो. त्याला कसलीच हांव, लोभ, आसक्ती ऊरत नाही.अगदी जवळच्या नातलगांपासुनही विरक्त होतो.
आणि यश, कर्तृत्व समाधान यांनी शृंगारलेला तो जीव मावळतीच्या शेवटाला पोचतो. पैलतीर सोबत प्रभुचीच आहे मग काय घाबरायचे ? अशी समजुत घालत आपण जगलेल्या आयुष्य सूर्याला शेवटचे वंदन करत शांत तृप्त अशा अवस्थेत त्या काळनिद्रेच्या मिठीत हळुवार सामावला जातो.
घाबरवणारी मावळती, ती कृष्णसंध्या, एकटेपण, ती निराशा, औदासिन्य, सोबतीची निश्क्रियता, माया ममता लोभ आसक्ती .. अशा किती किती भावनांपासुन दूर दूर निघुन जातो.
त्याचा त्या वेळचा मावळतीचा देखावा असा असावा की, इतरांना तो एक निर्भय करणारा मौल्यवान संदेश असावा.

— लेखन : अनुराधा जोशी. अंधेरी, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित