द्रष्टे विं दा
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने १९९७ साली दूरदर्शन वर “माय मराठी” कार्यक्रम कसा सुरू केला, याच्या काही आठवणी मी मागच्या भागात लिहिल्या आहेत. माय मराठी आणि आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्या विं दा करंदीकर यांच्याशी संबंधित काही आठवणी आज लिहित आहे.
माय मराठी कार्यक्रम, दूरदर्शनवर प्रत्यक्ष दाखविण्याआधी यथायोग्य वातावरण निर्मिती व्हावी म्हणून, आम्ही काही मान्यवर व्यक्तींची मनोगते दूरदर्शनवर प्रसृत करण्याचे ठरवले होते. त्याच दरम्यान परळी येथे साहित्य संमेलन होणार होते. एकाच ठिकाणी खूप साहित्यिक भेटतील म्हणून आम्ही आमचे टिव्ही कॅमेरा युनिट घेऊन तिथे तीन दिवस राहिलो. काही साहित्यिकांच्या मनोगतांचे चित्रीकरण केले. तरी काही नामवंत साहित्यिक मात्र त्या संमेलनाला आले नव्हते, त्यापैकी एक म्हणजे विं दा करंदीकर होते.
विं दा करंदीकर यांचे साहित्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे मनोगत प्रसारित करणे आवश्यक होते. म्हणून त्यांच्या मनोगताचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांना फोन करून, त्यांची वेळ घेऊन आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. ते मुंबईतील वांद्रे भागातील साहित्यिकांची सहकारी गृहनिर्माण संस्था असलेल्या “साहित्य सहवास” सोसायटीत रहात होते. काय मनोगत हवे, कसे हवे असे सर्व सांगून झाल्यावर त्यांच्या मनोगताचे एका टेक मध्ये छान चित्रीकरण झाले. त्या नंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला आम्हा सर्वांसाठी भजी, चहा करण्यास सांगितले.
आता आपल्याला विं दा यांच्याशी बोलण्यासाठी छान वेळ आहे, हे पाहून मी त्यांना नेहमीचाच प्रश्न विचारला, तो म्हणजे “सर, मराठी चे भवितव्य काय आहे ?” या वर विं दा यांनी दिलेले उत्तर म्हणजे, जणू ती त्यांची भविष्यवाणीच होती, जी आज दुर्दैवाने खरी ठरताना दिसत आहे.
विं दा म्हणाले, जो पर्यंत या महाराष्ट्रात दारिद्र्य राहील, तो पर्यंत मराठी भाषा टिकून राहील. हे न समजून मी विचारले, म्हणजे काय, सर ? तर ते अधिक स्पष्ट करीत म्हणाले, आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याची, ज्या पालकांची ऐपत नाही, असेच गरीब पालक आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमांच्या म्हणजेच पर्यायाने जिल्हा परिषदेच्या, नगर पालिकेच्या शाळेत घालत राहतील. त्यामुळे जो पर्यंत महाराष्ट्रात दारिद्र्य राहील,तो पर्यंत मराठी भाषा जिवंत राहील. जसजशी पालकांची ऐपत वाढत जाईल तसतसे ते आपल्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालत राहतील आणि मराठी अस्तंगत होत राहील. आज पालकांची ऐपत वाढत चालली असल्याने ते आपल्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकत आहेत. त्यामुळे साहजिकच मराठी शाळा बंद पडत आहेत.मराठी दिन, पंधरवाडे साजरे करण्याची वेळ आली आहे,अशा प्रकारे विं दां चे भाकीत खरे ठरत चालले आहे.
बोलण्याच्या ओघात विं दा यांनी ते रहात असलेल्या साहित्य सहवास सोसायटीचे उदाहरण देताना सांगितले, या साहित्य सहवास सोसायटी मधील ७८ कुटुंबांपैकी ७६ जणांची मुलेमुली अमेरिकेत राहतात. अपवाद फक्त दोन घरांचा, त्यापैकी एक स्वतः त्यांचे घर आणि दुसरे म्हणजे हिंदी साहित्यिक डॉ चंद्रकांत बांदिवडेकर यांचे घर. या दोन्ही घरची मुले आपापल्या मातृभाषेतून शिकली. त्यांनी आय आय टी मधून उच्च शिक्षण घेतले. अमेरिकेत जाऊन पी एचडी घेतली. त्यानंतर काही अनुभव घेऊन ते आपापल्या घरी परतले. बाकीचे मात्र सर्व जण तिकडेच राहिले, असे सांगून विं दा म्हणाले, सिलिकॉन व्हॅलीचा जेव्हा पन्नास वर्षांनी इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात एक वाक्य असे असेल, ते म्हणजे, “या सिलिकॉन व्हॅलीतील ब्राह्मण जात कोणे एकेकाळी महाराष्ट्र राज्यात रहात असे”!
खरोखरच आज दिवसागणिक विं दा यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला येत आहे. असो. या निमित्ताने विं दा यांचा जीवन परिचय करून घेऊ या…
विं दा करंदीकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील घालवली गावी २३ ऑगस्ट १९१८ रोजी झाला. त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर रत्नागिरीतील बसवेश्वर कॉलेज आणि पुढे मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेज, एस.आय.ई. एस कॉलेजमध्ये ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामातही त्यांचा सहभाग होता .
विदांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद, लघुनिबंध, गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे साहित्य प्रकार सहजपणे हाताळले. ते समीक्षक, लघुनिबंधकार म्हणूनही प्रसिद्ध होते.
विं दां नी ‘स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी ग परी, सर्कसवाला’ या सारखे बालकविता संग्रह लिहिले.
त्यांनी त्यांच्या काही कवितांचा इंग्रजीतही अनुवाद केला होता. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेश्वराच्या अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता.

पुण्यात १९४९ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने विं दा यांची मराठी साहित्यात ओळख निर्माण झाली. पुढे त्या काळी जाहीर काव्य वाचन फारसे रूढ नसतानाही वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा या तिघांनी काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम करून अशा कार्यक्रमांना प्रतिष्ठा मिळवून दिली.
विं दा यांना त्यांच्या ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार, ‘राष्ट्रीय कवी कबीर पुरस्कार’ , ‘कालिदास पुरस्कार’, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार या सारखे अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले. या पुरस्कारांपोटी मिळालेले लाखो रुपये सामाजिक संस्थांना देत ते ‘देणार्याने देत जावे’ ही उक्ती प्रत्यक्ष कृतीत उतरवत राहिले.
विं दा यांचे वैयक्तिक जीवन अतिशय जीवन साधे, स्वावलंबी होते. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधनही स्वीकारले नाही. अशा या दृष्ट्या, थोर विभूतीचे १४ मार्च २०१० रोजी निधन झाले. ते गेले पण जगावे कसे, हे मात्र आपल्याला शिकवून गेले.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर ह्यांच्या स्मृती जागवणारा लेख वाचून मन भारावले. ह्या थोर व्यक्तीला जवळून पाहिले आहे, काही प्रमाणात अनुभवले आहे, ह्याचा आनंद मनात दाटून आला. तुमच्या लेखाचे हे श्रेय! त्यासाठीच तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद आणि करंदीकर सरांना विनम्र अभिवादन 🙏🌹
आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.
संपादक महाशय भुजबळ सर अविस्मरणीय आठवणी विं.दा.च्या आपण आम्हा वाचकांना उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
गोविंद पाटील जळगाव.
देवेनदा खूप ह्रदयस्पर्शी लेख लिहिला आहे आपण .विंदा जी मराठी भाषेबाबत विदारक सत्य सागून गेले.
विंदा करंदीकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन…
आदरणीय देवेंद्रजी आपला लेख वाचून
नयनी अश्रू ओघळले
कारण थोर सारस्वत विंदांचे म्हणणे खरे ठरले
जे आज आपण सर्वांनी अनुभवले
विदांवरचा आपला लेख खूपच छान सर
ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विंदा यांना
विनम्र अभिवादन 🙏