नवी मुंबईतील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ हा एक क्रियाशील संघ म्हणून ओळखला जातो. या संघाच्या सभागृहाला काल मात्र एखाद्या लग्न सोहळ्याचेच स्वरूप प्राप्त झाले होते. याला कारण घडले ते म्हणजे संघाचे सदस्य श्री कारभारी जाधव यांच्या लग्नाला ५० वर्षे झाली म्हणून त्यांचा सपत्नीक, केवळ औपचारिक सत्कार न करता, दोघांनी एकमेकांच्या गळ्यात घालण्यासाठी भारदस्त वरमाला आणण्यात आल्या होत्या. दोघेही एकमेकांना वरमाला घालणार, तितक्यात संघाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ कलाकार राम काजरोळकर यांच्यातील कलाकार जागा झाला आणि त्यांनी सर्वांना थांबवून, मी मंगलाष्टके म्हणतो, मग त्यांना वरमाला घालू द्या, असे सांगितले आणि लगेच स्वतःच्या सुरेल आवाजात मंगलाष्टके सुरू केली. क्षणात सर्व वातावरण लग्नमय झाले. मंगलाष्टके संपताच कारभारी जाधव आणि त्यांच्या पत्नीने एकमेकांना वरमाला घालताच टाळ्यांच्या कडकडाटात होऊन एकच जल्लोष झाला.
उपस्थित सर्वांनाच जणू आपण खरोखरच्या लग्नाला आल्याचा आनंद मिळाला.

या लग्न सोहळ्यापूर्वी, जून महिन्यात वाढदिवस असलेल्या ३०९ जणांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. काही सदस्य येऊ न शकल्याने त्यांची नावे घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

सत्कार : फेस्कॉम तर्फे आयोजित स्पर्धे मध्ये,
बुद्धिबळ मध्ये राष्ट्रीय, पातळीवर विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल श्री रमेश मोहिते,
नाट्य अभिवाचन स्पर्धेत पारितोषिक मिळाल्याबद्दल श्री व सौ रत्नप्रभा चंद्रकांत पारपिल्लेवार,
एकपात्री नाट्य प्रयोगासाठी पारितोषिक मिळाल्याबद्दल श्री चंद्रकांत शिंदे यांना गौरविण्यात आले.

या संघाच्या आणि संघाच्या सदस्यांच्या लौकिकात भर घालण्याचे काम सातत्याने करीत असल्याबद्दल संघाचे सदस्य सर्वश्री देवेंद्र भुजबळ आणि मारुती विश्वासराव यांचाही या वेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष श्री मारुती कदम यांनी सर्व सत्कार मूर्तींचे कौतुक केले. विशेषतः सर्वश्री देवेंद्र भुजबळ आणि मारुती विश्वासराव या दोन्ही व्यक्ती कुणी काही सांगितले नाही, तरी संघाच्या आणि संघाच्या सदस्यांच्या चांगल्या उपक्रमांची स्वतःहून दखल घेतात आणि त्यांची चांगली प्रसिद्धी करतात. त्यामुळे सानपाडा जेष्ठ नागरिक संघाची ओळख केवळ सानपाडा किंवा नवी मुंबई पुरतीच मर्यादित राहिली नसून तरीही ती संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव श्री राजाराम खैरनार यांनी केले. उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे यांनी सत्कार मूर्तींच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन संघाचे सहसचिव श्री शरद पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन सदस्य श्री बाळाराम पाटील यांनी केले.

प्रारंभी काही सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. तर काही सदस्यांनी विनोद सांगून सर्वाँना चांगलेच हसवले.

पावसाळी वातावरण असूनही ज्येष्ठ पुरुष व महिला नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800