Saturday, October 18, 2025
Homeलेखडॉक्टर म्हणजे देव

डॉक्टर म्हणजे देव

डॉक्टर म्हणजे देव या उपक्रमात प्राप्त झालेले काही अविस्मरणीय अनुभव येथे देत आहे….
संपादक.

डॉक्टर नव्हे तर , सखी

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखात सामील होतात यासाठी त्या व्यक्ती आपल्या नात्यातील असतात असेही नाही. कधीकधी परक्या व्यक्तीही आपल्याला खूप जवळच्या वाटू लागतात.

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना सध्याच्या काळात जवळ जवळ नाहीशी होताना दिसत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण सध्या सुपर स्पेशालिटी इस्पितळे आणि सुसज्ज अशी क्लिनिक्स आपल्याला सर्वत्र पहायला मिळतात. असे असले तरीही खूप कुटुंबांचे फॅमिली डॉक्टर असतात.

अशाच आमच्या कुटुंबातील जवळच्या फॅमिली डॉक्टरांबद्दल माझे अनुभव शेअर करावेसे वाटतात. या डॉक्टर म्हणजे डॉ प्रतिभा आंगणे. जवळ जवळ चाळीस वर्षे त्या आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत. माझ्या मुलांच्या जन्मा पूर्वीपासून आम्ही त्यांच्याकडे जातो. त्या अतिशय प्रेमळ असून आमच्या सर्व प्रश्नांना न कंटाळता उत्तरे देऊन आमचे शंका निरसन करतात. खूप कठीण अशा परिस्थितीत घाबरून न जाता समोरच्या व्यक्तीला धीर देण्याचे कर्तव्य त्या लीलया पार पाडतात.

डॉ प्रतिभा आंगणे

त्यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे. तरीही मला एक प्रसंग सांगितल्याशिवाय रहावत नाही. त्याचे असे झाले माझी सुकन्या ऋचा ही बी कॉम ला होती. तिचा पहिलाच पेपर होता. परीक्षेपूर्वी वर्गातल्या एका मुलीने तिला काही प्रश्न विचारले आणि मिस गाईड केले. त्यामुळे ती घाबरली. चांगला अभ्यास करून गेली असून सुद्धा आयत्यावेळी सर्व विसरली. पेपर सुटल्यावर ती घरी आली आणि तिने रूम मध्ये जाऊन दरवाजा बंद केला. मी ऑफिसमध्ये गेले होते. मुलाने सांगितले की ती आल्यापासून जेवली नाही आणि रडत आहे. मला हे ऐकल्यावर काही सुचेना.

मी ऑफिस मधून घरी आले. तिला बळेच जेवायला वाढले. पेपर कठीण गेला म्हणून ती घाबरली होती. त्यानंतर रात्रभर तिच्या पोटात दुखू लागले. मीही जागीच होते. सकाळी उठल्यावर डॉक्टरना फोन केला. माझ्या विनंतीनुसार त्या दवाखान्यात आल्या. मी त्यांना घेऊन घरी आले. त्यांनी तपासून काही औषधे दिली. त्या घरी गेल्या. पुन्हा स्वतःच्या घरून मला फोन करून विचारले की तुम्ही अजून परीक्षेला जायला का निघाला नाही ? तिला भीती वाटत आहे, तुम्हीसुद्धा घाबरत आहात की ती नापास होईल म्हणून. असे आहे ना मग तुम्ही तिला परीक्षेला घेऊन जा. आम्ही निघालो. तिचे सर्व पेपर्स चांगले गेले. रिझल्ट लागला. ज्या पेपरला ती घाबरली होती त्यात तिला चांगले गुण मिळाले. खरं सांगायचं तर आम्ही तिला परीक्षेला घेऊन जाणारच नव्हतो. तिचे वर्ष वाया गेले असते.

धन्य त्या आमच्या फॅमिली डॉक्टर प्रतिभा आंगणे. त्यांच्याबद्दल काय सांगावे ? त्यांच्याकडे गेल्यानंतर आणि त्यांचा प्रसन्न चेहरा पाहिल्यावर मनावरचा ताण हलका होतो. आमच्याकडे काम करणाऱ्या व्यक्ती सुद्धा आमच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्याकडे जातात आणि मनोमन आमचे आणि डॉक्टरांचे ही आभार मानतात.

फॅमिली डॉक्टर कुटुंबाचा एक आधार असतो. वेळ असेल त्यावेळी त्या घरातील सर्वांची चौकशी करतात. कोणाच्या अंगी कलागुण असतील त्याचे कौतुकही करतात. बिझी असूनही त्यांना वाचनाची आवड आहे ती जोपासतात. माझ्या परिवारातील समारंभात सहभागी होतात याचे माझ्या नातलगांना सुद्धा कौतुक वाटते. त्यांच्या सारखे फॅमिली डॉक्टर सर्वांना मिळावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.

– लेखन : सुरेखा पाटील. मुंबई

आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नमस्कार. सध्याच्या अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीतही “रुग्ण सेवा हीच ईश सेवा” मानून कार्यरत राहणा-या डाॅक्टरामध्ये डॉ. धर्मेंद्र गुणवंत उपाख्य डी.जी‌.परमार यांचं नाव आवर्जून घ्यावे लागेल.
डाॅ‌.परमार यांनी रुग्णांची अहिर्निश निरपेक्ष सेवा केल्याबद्दल जागतिक स्तरावरील कॅप्टन सर टाॅम मूर मेमोरियल मेडल फाॅर दी कोविड -१९ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.

या पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
आपला नम्र,

नंदकुमार रोपळेकर

– नंदकुमार रोपळेकर, मुंबई.

सामान्यांचा देव

हृदयरोग डॉ. मनोहर शिंदे हे नाशिक येथील श्री गुरुजी रुग्णालय येथे कार्यरत आहे. त्यांना कोरोना काळात धुळे जिल्ह्यातील मूळ गाव सामोड़े व आसपासच्या अनेक नागरिकांचे फोन येऊ लागले. परिस्थिती फार गंभीर होती.

अशा बिकट परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता एक महिन्याची रजा घेऊन ते आपल्या गावी आले आणि कोरोना रुग्णांच्या सेवेला लागले.
शिवदुर्ग प्रतिष्ठान व भारत माता रुग्ण सेवा समिती, पिंपळनेर यांच्या माध्यमातून भाडणे येथील शासकीय कोव्हिड सेंटर येथे तब्बल वीस दिवस त्यांनी निस्वार्थ सेवा दिली.

डॉक्टर शिंदे यांनी कोरोनाच्या काळात सेवा देतांना आलेल्या अनुभवावर आधारीत SOP तयार केली आणि ती SOP सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित केली जेणेकरून या माहितीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची सेवा करण्यास मदत होईल. त्या SOP चा नागरिकांना व डॉक्टरांना खूप फायदा झाला.

डॉक्टर मनोहर शिंदे यांनी आपल्या संकल्पनेतून स्वतः पुढाकार घेऊन पिंपळनेर येथे सहकाऱ्यांच्या मदतीने
स्थापन केलेल्या भारत माता रुग्ण सेवा समितीच्या माध्यमातून पिंपळनेर परिसरातील कोरोना रुग्णांची नुसती सेवाच नव्हे तर मृत पावलेल्या कोरोना रुग्णांचा अंत्यविधीही केले. डॉ शिंदे यांच्या त्यागमयी सेवा वृत्तीला मनापासून सलाम.

– लेखन : अक्षय कोठावदे, पिंपळनेर

समाजवैद्य डॉ. हरीश बाहेती

कोविड काळात वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग व्यवसायासाठी न करता सेवेसाठी करणारे डॉक्टर रुग्णांच्या लक्षात राहिले. त्यापैकी एक म्हणजे वाशिमचे डॉ. हरीश बाहेती. वाशिममध्ये एकाच छताखाली सर्व सुविधा असलेले त्यांचे माता बाल रुग्णालय आहे.

आज माँ गंगा मेमोरियल बाहेती हाॅस्पिटल केवळ सुपर स्पेशालिटी माता बाल रुग्णालयच नसून संपूर्ण आरोग्य हे ध्येय पूर्णत्वास नेत आहे. त्यामुळे या हाॅस्पिटलचे नाव वऱ्हाड प्रांतात आदराने घेतले जात आहे.

अनेकांचे आजार ते बरे करतातच; पण समाजाची दुखणी बरी करणारा एक सच्चा समाजवैद्यही डॉ. हरीश बाहेती यांच्या रुपाने वाशिमवासियांना लाभला आहे हे त्यांचे भाग्यच होय.

– लेखन : पांडुरंग चोपडे.

संस्मरणीय सेवा

वेदनापासून मुक्ती हे ब्रीद मानून, प्रसंगी जोखीम घेऊन,
रुग्णांचे आरोग्य निगुतीने संभाळण्यासाठी घेतलेले कष्ट नक्कीच स्पृहणीय असतात..🙏
या प्रवासात आलेले विदारक अनुभव, आलेले मोहाचे, लाभाचे क्षण झुगारून, पूर्णपणे समाजाभिमुख राहणाऱ्या, अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या सर्वच निपुण डॉक्टर आणि सहकाऱ्यांचे, सर्व रुग्ण आणि जनता नक्कीच ऋणी आहे.

नांदेड येथील मान्यवर डॉ.व्यंकटेश डूबे यांचे आरोग्य सेवावृत्ती म्हणून प्रचंड आणि समरसून केलेले कार्य प्रेरणादायी आहेच पण मनस्वीपणे केलेले समाजकार्य बहुपयोगी अन संस्मरणीयच ठरावे. कसलीही अपेक्षा न करता ते अत्यंत तळमळीने उदबोधक अन वास्तव उपचार संयत शैलीत करतात.

कोरोना काळात नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा, पुणे यासारख्या शहरातून आलेल्या रुग्णांना त्यांनी योग्य उपचार माफक दरात दिले. नातेवाईकांना आश्वासक दिलासा दिला. यामुळे सर्व समाज त्यांचा ऋणी आहेच पण कसलाही गवगवा न करता डॉ.डुबे साहेबानी केलेल्या कार्याचे सर्व स्तरात कौतुकच आहे त्यांना पुढील कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा.✨☘🔔

– लेखन : प्रा. विलास कोडगिरे.

मातृत्वाचा आनंद

जुनी सांगवी, पुणे येथील डॉक्टर विद्या डागा मॅडमचे मी मनःपूर्वक आभार मानते. खरं तर शब्दात त्यांचे आभार पूर्ण होणार नाही. कारण त्यांच्यामुळे आम्हाला अशक्य अशी गोष्ट सहज शक्य झाली.

आज आम्हाला खूप सुंदर अशी मुलगी आहे. आमचे लग्न 2013 ला झाले. चार वर्षे आम्हाला मूलबाळ नव्हते. दरम्यान आम्ही बऱ्याच डॉक्टरांची ट्रीटमेन्ट घेतली. त्यात आमचे बरेच पैसे खर्च झाले. नकारात्मकसुद्धा खूप वाढली.

आम्हाला मूल होणार की नाही असे विचार वारंवार डोक्यात असायचे. त्याच दरम्यान आम्हाला मुक्ताईनगर येथील प्राध्यापक बाविस्कर सर भेटले. त्यांनी त्यांचा मॅडम सोबतचा अनुभव आम्हाला सांगितला. त्यांना मॅडमच्या औषधामुळे 14 वर्षानंतर मुलगा झाला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मॅडम सोबत संपर्क केला. पहिल्या भेटीतच त्यांच्या बोलण्यातून आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आला. त्यांच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले. सहा महिन्यात आम्हाला रिझल्ट आला. खुप आनंदाचे दिवस आम्हाला मिळाले. नऊ महिने मॅडमची औषधे आम्ही घेतल्यामुळे सुंदर बाळ आम्हाला देवाने दिले आहे. देवदुत रुपी डॉ विद्या डागा मॅडमचे आभार मानावे तेवढे कमीच.

आमच्यानंतर आमच्या संपर्कातील चार जणांना आम्ही मॅडमचा पत्ता दिला. तेवढ्या सर्व जोडप्यांना सकारात्मक रिझल्ट मिळाले. डॉक्टर विद्या डागा मॅडम यांचे आम्ही खूप आभारी आहोत

डॉ डागा समवेत.

– लेखन : सौ सोनाली जितेंद्र सोनवणे, पुणे

कोरोनातील देव

आपण सारे आबालवृद्ध गेली अनेक महिने एका महाभयंकर विषाणूचा सामना करीत आहोत. संचारबंदी, घरकोंडी अशा वातावरणात जणू लपून बसलो आहोत. शासकीय नियमांचा सामना करताना अनेक बंधनांशी लढा देत आहोत. या निर्बंधनातून अगदी मंदिरे, मस्जिदी, गुरुद्वारा, चर्च इत्यादी प्रार्थना स्थळेही सुटली नाहीत.

सारी जनता घरकोंडीत असताना रस्त्यावर नागरिकांना न फिरू देणारे पोलीस असतील, सफाई कामगार असतील, राजकारणी असतील, समाजसेवक असतील, पत्रकार असतील ही कुणाची रुपे होती ? आजही समाजातील एक मोठा वर्ग ज्यांना देव मानतो ती डॉक्टर मंडळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी समोर आलेल्या कोरोनाबाधितांची जीवापाड काळजी घेऊन, त्यांना योग्य औषधोपचार देऊन कोरोनामुक्त करुनच घरी पाठवणारी वैद्यकीय मंडळी त्या आजारी मानवांसाठी देवस्वरूपच होते ना !

कोरोना झाला असे समजताच शेजारी पाजारी, आप्तस्वकीय, मित्र आणि काही कुटुंबीयही दुरावत होते तिथे ही वैद्यकीय क्षेत्रातील माणसे चोवीस तास त्या आजाऱ्यांची सेवा करीत होती हे देवत्वाचे लक्षण नाही ? कोण असायचे त्या दवाखान्यात आपले ? पंधरा- वीस दिवस कोरोनाबाधितांना दवाखान्याच्या हवाली करून राहायचे.

अर्थात हा आजारच असा भयंकर आहे की, कोरोनाग्रस्तांना कुणालाही भेटायची परवानगी नसते अशा काळात ही वैद्यकीय क्षेत्रातील माणसे स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, अनेकदा विलगीकरणात राहून डोळ्यात तेल घालून, आपल्या कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे येऊ पाहणारे अश्रू आतच दाबून अहोरात्र या रुग्णांची सेवा करीत होते त्यांचा जीव वाचवत होते हे कृत्य ईश्वरासम नाही का ?

जेवणाच्या वेळा ठरलेल्या नाहीत, कधीकधी जेवणही मिळायचे नाही, झोप तर यायचीच नाही. आली तरी क्षण-दोन क्षण टेबल-खुर्चीवर डोळे लावून बसायचे, रिकाम्या पलंगावर काही क्षणांसाठी पाठ टेकवायची, अनेकदा स्ट्रेचरलाच बिछाना बनवायचा आणि विश्रांती घ्यायची. असे करीत असतानाही मनात रोग्याचाच विचार ! कुणाचे सलाईन संपले, कुणाचा श्वास वर झाला, कुणाला औषधी किंवा इंजेक्शन द्यायचे अशा विचारात झपाटून गेल्याप्रमाणे काम करीत असताना आपण ज्यावर पाठ, मान, डोके टेकवतोय, ज्यांच्या संपर्कात आपण आहोत त्यांच्या शरीरातील विषाणूंनी आपल्याला बाधीत केले  तर ? झालेही तसेच.

कोरोनाबाधितांचा इलाज करताना अनेक डॉक्टर, त्यांचे सहकारी यांना कोरोनाने घेरलेच ना, अनेकांना मृत्यूच्या दाढेत ढकलेच ना ? अजूनही वेळ गेली नाही. या माणसांना ओळखा, त्यांच्यातील देवत्वाला जाणा कारण आता या लोकांना खरी गरज आहे ती विश्रांतीची ! अविश्रांत श्रम करुन ही मंडळी आजही सेवा देत आहेत तेव्हा घडलेल्या बऱ्यावाईट घटनांचा राग या मंडळीवर काढू नका. कदाचित एखादे वेळी नकळत यांच्याकडून एखादी चूक होऊ शकते त्यासाठी यापैकी कुणी दोषी आहे असे समजून त्यांच्यावर चालून जाऊ नका…. कारण तीही माणसेच आहेत… देव माणसे !

नागेश शेवाळकर.

– लेखन : नागेश सू. शेवाळकर, पुणे

आईचे प्राणदाता

समाजात डॉक्टरांना देव म्हणण्याची परंपरा आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. डॉक्टर हा समाजातील सुखदुःख प्रसंगी धावून येणारा. त्यामुळे वेळप्रसंगी डॉक्टरांचे महत्त्व देवासारखी होते. अर्थात मुळात देव ही संकल्पना डॉक्टरांना देखील कितीशी रुचते याचे मूल्यमापन आजपर्यंत कोणी केले नाही.

मात्र मानवी जीवन आरोग्यवर्धक सुखी व आनंदी होण्यासाठी डॉक्टर वर्ग प्रामाणिकपणे प्रयत्नांची परत काष्ठा करीत असतात आणि जेव्हा एखाद्या रुग्णाच्या बाबतीत त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त होते तेव्हा डॉक्टर तुम्ही देवासारखे धावून आलात, खरोखर तुम्ही देवता की हो अशा प्रकाराचे बोल आपोआप बोलले जातात .

असे अनुभव माझ्या आईच्या आजारपणात आल्याचे तिने मला सांगितले होते. मी लहान असताना तिला डॉक्टरांनी मरणाच्या दारातून कसे वाचविले ते सांगितले होते.

एकदा गावी आई आजारी असताना तिला सातारा रोडला डॉक्टर गडकर यांच्याकडे घेऊन जायचे ठरवून आमचे चुलत बंधू श्री शंकरराव यांनी बैलगाडीने आईला घेऊन जाण्याचा निश्चय केला. मामाने सांगितले की तुम्ही पैशाची काळजी करू नका. प्रथम माझ्या अक्काला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या सारे घर हवालदिल झालेले. ताप डोक्यात जाण्यापुर्वी तिला औषध उपचार मिळणे जरुरीचे होते. हिवताप हा कधी कमी तर कधी जास्त होतो. आईने अन्नपाणी टाकले होते.

बिना डॉक्टर उपाय तिने दहा ते बारा दिवस असेच घरी काढले होते. त्यामुळे तापाची तीव्रता थंडी व अशक्तपणा यामुळे आईची तब्येत फारच चालवत चाललेली होती. आई तापामध्ये पेड अंबिल लागली होती. त्यामुळे मामा, वडील व आम्ही भाऊ बहीण खूपच घाबरलो होतो. अशा अवस्थेत सायंकाळी पाच वाजता सातारा रोड येथे आईला घेऊन जाण्याचे ठरले.

बैलगाडीवर पावसाळा पासून बचाव करण्याकरिता उभारणे केले. आत मध्ये आई साठी दोन गोधड्या अंथरून आईला गाडीत घेऊन गेले. बरोबर मामा व थोरले बंधू व वडील असे डॉक्टर गडकर यांच्या दवाखान्यात आईला घेऊन गेले. मजल दरमजल करीत पावसापाण्याचा दिवसात भिजत बैलगाडी चालली होती.

आईचे अंग तापाने व थंडीने धाडधाड उडत होते. लवकरात लवकर दवाखान्यात दाखल होणे करिता चुलत बंधू दादा बिचाऱ्या बैलांना ताडताड चालविण्याकरिता त्याचे फटके पाठीवर देत होते. बैलांच्या गाडीतील घुंगरू माळा यांचा आवाज रस्त्यावरून जात असताना लोकांच्या कानावर पडताच ते विचारपूस करीत. काय झाले हो सुतार पाटील ? मात्र वडील काहीच न बोलता बैलगाडी बडवीत जिवाच्या आकांताने आईला दवाखान्यात दाखल करण्याच्या इराद्याने अंधाऱ्या रात्री 10 ते 12 मैंलाचे अंतर कापायला दोन ते दोन तास लागले.

सातारा रोड हे त्याकाळी कूपर कारखाना असलेले पंचक्रोशीतील उद्याम नगरीचे ठिकाण होते.कामगार, व्यापारी, डॉक्टर, वकील कारागीर अशा पेशाच्या लोकांचे ठिकाण. अशा औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी डॉक्टर गडकर हे पंचक्रोशीतील प्रसिद्ध डॉक्टर होते. डॉक्टर L.C.P.H. होते, परंतु त्यांच्या वैद्यकीय पेशातील दीर्घकालीन अनुभव यामुळे पेशंट लोकांना त्यांचा खूप गुण त्वरित मिळत असेल अशी त्यांची ख्याती होती.

आईला अखेर दवाखान्यात दाखल केले गेले. डॉक्टरांनी पेशंटची माहिती घेतली. काय होते आहे, पेशंट कुठून आला आहे हे कळताच त्यांनी प्रथम आईच्या तपासण्या केल्या. डॉक्टरांनी नाडी तपासत निदान केले की टाइफाइड आहे असे म्हणून ते एकदम भडकले. एवढा वेळ तुम्ही का पेशंटला घेऊन आले नाही ? जर तुम्ही आणखी उशीर केला असता तर पेशंटची गॅरंटी देता आली नसती असे काय काय बोलले.

यावेळी मामा व वडिलांना ऐकून घेतल्याशिवाय उपाय नव्हता. डॉक्टरांनी आईला ऍडमिट करून चार दिवस ठेवून घेतली. एवढेच नव्हे तर हेही बोलले की पहा तुम्ही मला पैसे नंतरही दिले तरी चालतील. अन पैसे द्यायला जमले नाही तरी काही हरकत नाही परंतु बाईंना मात्र औषधोपचार माझ्या देखरेखेखाली मिळाले पाहिजे. या वेळी पावसानं भिजलेल्या आणि जवळजवळ बेशुद्ध झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चार दिवस अन्न पाणी निवारा यांची सोय रेल्वेस्टेशन सातारा रोड वर अन शेवटी चार दिवसानंतर आईला शुद्ध आली. त्यावेळी आईने डोळे उघडले व समोर डॉक्टर साहेब दिसले. तेव्हा तिला डॉक्टर म्हणजे परमेश्वर असेच वाटले. डॉक्टर डॉक्टर साहेब आज तुम्ही जर नसता तर मी या जगात नसते माझे कुटुंब उघड्यावर पडले असते असे सांगून आईने त्यांचे आभार मानले.

आज इतकी वर्षे लोटली तरी ते प्रसंग, ते डॉक्टर माझ्या मनात कायमचे घर करून आहेत.

– लेखन : बी एस गायकवाड, निवृत्त अवर सचिव.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. डॉक्टर्स विषयी असणारी आस्था, डॉक्टर्स यांनी कोरोना काळात केलेली सेवा हे सर्वश्रुत आहेच. खरच ते आपल्यासाठी देवदूतच आहेत.सुंदर लेखन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप