गुरू बळ हे अतिशय दुर्मिळ व नशीबवान असल्याचे लक्षण आहे. हे ज्या कोणाला प्राप्त होते त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो. योग्य वेळी योग्य गुरू लाभणे ही एक पर्वणीच म्हणावी लागेल आणि हो, या बाबतीत मी जरा जास्त भाग्यवान आहे असे मला नेहमीच वाटते. पूर्वजन्माची पुण्याई म्हणा अथवा काही चांगले म्हणा ज्यामुळे मला एक नाही तर दोन गुरू लाभले. या दोन गुरूंपैकी एक सामाजिक गुरू व दुसरे माध्यम गुरू आहेत, ज्यांच्यामुळे माझे जीवन अधिक सुंदर झाले. त्यांची साथ असल्याने अनेक कठीण गोष्टी सोप्या झाल्या. मी कायम त्यांच्या ऋणात आहे व नेहमीच राहील.
पुण्यासारखे शहर हे माझे माहेर असूनही घरात अतिशय कडक वातावरण होते. कुठेही जाणे येणे नाही फक्त घर, शाळा व कॉलेज हेच विश्व. लग्न झाल्यावर सासरी मला मोकळीक मिळाली अन जणू अदृश्य पंख मिळाले. माझ्या जावेने म्हणजे सौ सविता अनिल हेडे यांनी समाजात आणले. बाहेरच्या जगाची ओळख होऊ लागली. मला ज्यांच्याविषयी आदर वाटायचा ते म्हणजे सर्वांच्या परिचयाचे कर सल्लागार हेमंत कासार साहेब. साताऱ्यातील कासार समाजाचे कुटुंबप्रमुख ज्यांच्यामुळे सातारा कासार समाजाचा लौकिक खूप वाढाला. अनेक मोठेमोठे कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. जेथे कमी तेथे आम्ही म्हणत नेहमीच सामाजिक व आर्थिक सहकार्य केले व आजही करत आहे.
व्यवसायिक मार्गदर्शन असो अथवा सामाजिक, कौटुंबिक लहान मोठया समस्या त्या सोडवण्यात ते नेहमीच मोलाची भूमिका बजवतात. आपल्या ओळखीचा फायदा सर्वांच्या हितासाठी करतात. समाजात अनेक चांगले बदल झाले, त्यामध्ये कासार साहेबांचा मोलाचा वाटा आहे. पारदर्शक व्यवहार व प्रामाणिक काम यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही.
आधी अतिशय भित्री, घाबरट, अबोल अशी मी पण आज आत्मविश्वासाने अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करू शकले ते केवळ कासार साहेब यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच. त्यांच्यामुळे समाजात व्यासपीठ मिळाले. त्यांनी मला अनेक लहान मोठया संधी दिल्या. तू घाबरू नको काही चुकले तर मी सांभाळून घेईल. नवरात्रीतील सूत्रसंचालन ते अनुराधा दीदी शेटे यांचे आयोजित केलेले भव्य भागवत सप्ताह या कार्यक्रमाचे स्वागताचे सूत्रसंचालन करणे ही खूप मोठी संधी होती. हे अविस्मरणीय क्षण माझ्या मनावर सोनेरी अक्षराने कोरले गेले आहेत जे मी कधीच विसरू शकत नाही. असे हे माझे सामाजिक गुरू हेमंत कासार साहेब यांची मी ऋणी आहे.
कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व जग थांबले तेव्हा माझे नव्याने जग सुरू झाले. श्री व सौ आशाताई कुंदप यांच्यामुळे सौ अलकाताई व देवेंद्र भुजबळ सरांची ओळख झाली व त्यांच्या रूपाने मला माध्यम गुरू लाभले. जीवनाला नव्याने पालवी फुटली. स्वप्नात देखील वाटले नव्हते की मी लिहू शकेन ! पण ती प्रेरणा, तो भक्कम आधार, ती साथ वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन व सूचना त्यामुळे माझ्या लेखणीला बळ मिळाले.
अगदी सुरवातीच्या काळात त्यांनी लहान लहान गोष्टी शिकवल्या. अतिशय कडक धोरण असल्याने मला ही लिहायची सवय लागली. माझ्या प्रत्येक लिखाणाचे त्यांनी संपादन केले. त्यामुळे सर्व लेख अनेक वृत्तपत्रात तसेच दिवाळी अंकात देखील प्रकाशित होऊ शकले. ती माझ्यासाठी पर्वणीच होती. आज देखील न्युज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून माझे लेख व कविता प्रकाशित होत असतात. या हक्काच्या व्यासपीठामुळे लेखणीतून व्यक्त होण्याची संधी वेळोवेळी मिळत असते.
भुजबळ सरांच्या आशीर्वादामुळेच माझ्या लेखणीचे पुस्तकात देखील रूपांतर झाले. हे एक स्वप्न होते जे त्यांच्यामुळे सत्यात येऊ शकले. तो अविस्मरणीय क्षण माझ्या मनावर कोरला गेला. त्यावेळी गुरू पत्नी सौ अलकाताई यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. माझी मोठी बहीण, एक मैत्रीण कायम मला साथ देणारी, सुख दुःखात सोबत करणारी, तू काळजी करू नको… आम्ही आहे ना ! हा भावनिक आधार त्यांनी कायम दिला व आजही देत आहे. अलकाताई मी तुमची आभारी आहे.
अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लाभलेले भुजबळ सर अनेकांचे प्रेरणास्थान आहे. अनेक मानाच्या पुरस्कारांचे मानकरी, एक उत्तम वक्ता व लेखक आणि सर्वोत्तम माणूस म्हणून भुजबळ सर सर्वांच्या परिचयाचे आहे, ज्यासाठी देश विदेशात त्यांना एक आदराचे स्थान आहे.
असे हे माझे दोन्ही गुरू ज्ञानाचा खजिना आहे अनमोल रत्न आहे. सामाजिक बांधिलकीचा वसा जपत आहे. स्वतःबरोबर अनेकांना मोठं करण्याचा पवित्र काम करत आहे. वय केवळ एक आकडा आहे हे त्यांनी सिद्ध करून जगासमोर एक उदाहरण उभे केले आहे. नोकरीतून निवृत्त झाले तरी देखील ते सतत सक्रिय आहे. निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे काम करून अनेकांचे आधारस्तंभ आहेत.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात आपणही काही देणे लागतो असे विचार करणारे दुर्मिळच असतात. लोकांच्या हितासाठी वेळ देणे, योग्य सल्ला देणे, मार्गदर्शन करणे याला मनाचा मोठेपणा लागतो जो केवळ गुरूंकडे असतो म्हणूनच गुरूंना उच्च स्थान दिले जाते.
समाजाचा वसा जपणाऱ्या, माणुसकी जपणाऱ्या या माझ्या दोन्ही गुरूंना माझा साष्टांग नमस्कार. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हा लेख गुरू चरणी अर्पण करते व आपली गुरू कृपा सदैव राहो हीच इच्छा व्यक्त करते.

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.