आज गुरू पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने गुरूची महती सांगणाऱ्या काही रचना पुढे सादर करीत आहे. गुरू पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
१. अभंग – गुरु अमृताचा बिंदू
गुरुकृपा मनी / वंदिले चरण
गुरूंना शरण / गुरुभेटी //१//
आद्य गुरु माझे / असे मायबाप
कष्ट नसे माप / जीवनात //२//
जीवन अधीन / मनोमार्गगती
गुरूंची महती / त्रलोक्यात //३//
होता गुरु भेट / गवसले धन
तृप्त झाले मन / पामराचे //४//
गुरुकृपा ठाई / उजळती वाती
ज्ञानाच्या ज्योती / तीमिरात //५//
मनोभावे सेवा / मंत्र संजीवनी
सुख नांदे मनी / गुरु मंत्र //६//
ज्ञानाचा वारस / गुरुकृपा सिंधू
अमृताचा बिंदू / जीवनात //७//
धडे जीवनाचे / विद्या मंदिराचे
धन अमृताचे / शिष्यप्रती //८//
ज्ञानाचा प्रसाद / ओंजळीत घ्यावा
अनमोल ठेवा / गुरु ज्ञान //९//
धडा आयुष्याचा / शिकवतो गुरु
चिंतन हे करू / क्षणोक्षणी //१०//
— रचना : सौ भारती वाघमारे. मंचर,जि. पुणे
२. गुरुपौर्णिमा
मंगलदिन हा अजि उगवला
गुरुवर्यांचे पूजन करण्या
ज्ञानामृत ते पाजूनी आम्हां
मार्ग दाविती जीवन जगण्या
मातापितरांसवे देतसे
गुरु जीवना आकार
गुरुपौर्णिमा करू साजरी
पुष्पांजली वाहून चरणावर
लभ्य प्रेरणा गुरुच देती
लघु मधुनी ते गुरु बनविती
एकरूपता मार्ग दर्शविती
पूजण्या कृतज्ञ मनी राहती
गुरुप्रेम ज्ञान, सूर्य, शक्ति
हिमाचलाप्रती गुरुची शांती
सत्याचे पूजन शिष्य जाणती
आचरुनी गुरुभक्ति ते करिती
व्यास मुनींना गुरु मानती
निःस्वार्थ भावना हृदयी वसती
जीवनव्रत प्रचार संस्कृती
पंचारती घेऊनी पुष्पांनी पूजती
— रचना : स्वाती दामले.
३. गुरुपौर्णिमा
🌺🌷🌹।।श्रीराम।।🌹🌷🌺
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा !
धन्य आज शुभदिन गुरुपौर्णिमा
वंदू तव चरणा गाऊ थोर महिमा ।।धृ।।
सर्व काही घडते सद्गुरू कृपेनं
गुरु देतील ते स्वीकारावं समजुन
गुरू काळजी घेतील सर्व भक्त प्रेमा ।।1।।
नामांत प्रेम राहो श्रीगुरूंचे सांगणं
नाम जपावे होई शुद्ध अंतःकरण
अनुसंधान रहावे जिव्हा लागो नामा ।।2।।
गुरू शिष्यांचे अमोल शब्दातीत नाते
जपावे हृदयांतरी मर्मबंधाते
परंपरा युगयुगांची राहे गरिमा ।।3।।
— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
४. दीक्षा
अर्पण मी केला देह, मन अर्पियेले,
तुझी कृपा झाली अन् चित्त स्थिर झाले,
कळले मला हे आता, साक्ष ती पटली,
तूच साऱ्या भ्रमातून, मला जागविले,
खोटा होता, मी पणाचा, ओढला बुरखा,
अहंकार मोठा होता, मीच पाठीराखा,
कर्मगती जाणली ना, केवढा तो हेका,
सारे वाटे मला मीच, जग घडविले,
आणि आली काळगती, क्षणात हे झाले,
घटना पाहता माझे, चित्त भ्रम गेले,
कोणी ना वाटे मला, देईल दिलासा,
तुझे स्मितहास्य, त्याने, आत्मबळ आले,
कर्मफल भोग, दारा, घर, पुत्रपौत्र,
संदर्भ कळला, जन्म, देह हे निमित्त,
जगण्याची बदलली दिशा, कृपा होता,
चित्त आता चरणाशी, तुझ्या स्थिर केले…!!!
— रचना : हेमंत भिडे.
५. शाळा आणि गुरूजन (शार्दूलविक्रीडित)
शाळेने जपले, मला घडविले पाजून संजीवनी
मातीचे मडके जसे बनवितो कुंभार चाकावरी
शिस्तीचा बडगा, छडी जवळ ती; होता दरारा असा
निस्वार्थी हृदये, मनी कळवळा ज्ञानार्पणा लालसा
भीती आदरयुक्त आज अजुनी, आहे मनी आमच्या !
आयुष्या दिधली अशी शिकवणी, अंधार गेला लया !
आहे अमृत लाभले मज तिथे आयुष्य सिंचावया
बागेची करतो मशागत अता आनंद वेचावया
शाळेतील गुरूजना नमन हे ज्यांनी दिली पात्रता
झाले जीवन धन्य आज अवघे, आचार्य ही देवता !
–– रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
६. गुरु अनुभव ..
अनुभवासमअद्भुत
गुरु वर्य दुजा नाही
अदृश्य निराकार रे
कायम सोबत राही
जळीस्थळी शिकवे
व्यापतो दिशा दाही
निरीच्छ निर्लेप असे
तोच राहतो स्वगृही
ज्ञान देतो अव्याहत
धडे गिरवायआग्रही
नकळे ज्ञानशलाका
जमाआपल्यासंग्रही
कडक शिस्त पाळा
कतृत्वाबाबी निग्रही
भर भरून ज्ञानामृत
वर्षाव करी अनुग्रही
जिथल्या तिथे सांगे
कायचूक काय सही
नोंद करा बोधाक्षरा
हृदयाची करुन वही
सर्वशिष्य समसमान
त्याचे लेखी ना दुही
डिग्री मिळणार नाही
शिक्षणअपूर्व प्रत्यही
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
७. गुरू शक्ती
गुरू म्हणजे ज्ञानाचा खजिना
यशाचा जणू अदृश्य जिना
गुरू म्हणजे जगण्याचे सार
संकटात तूच आम्हा तार
गुरु म्हणजे अमृताचा घडा
पवित्र रांगोळीचा जणू सडा
गुरू म्हणजे सोनेरी पर्वणी
समुद्रातील एक अनमोल मणी
गुरू म्हणजे नशिबाची खाण
कृपेने ज्यांच्या समाजात मान
गुरू म्हणजे भाग्याचे लक्षण
शिष्याचे करतात सदा रक्षण
गुरू म्हणजे सूर्यप्रकाश
होई न कोणी हताश
गुरू म्हणजे अतूट विश्वास
जसा अनमोल प्रत्येक श्वास
गुरू म्हणजे जीवनातील सार
दूर लोटतात अंधकार
गुरू म्हणजे निरपेक्ष भाव
शिष्याच्या गुणांचा त्यांना ठाव
गुरू म्हणजे परमेश्वराची कृपा
ज्यास लाभे त्याचा मार्ग सोपा
गुरू म्हणजे निर्मळ स्थान
जसे पवित्र तुळशीचे पान
गुरू म्हणजे आशेचा दिवा
घडो सदैव त्यांची सेवा
गुरू म्हणजे आयुष्याची गती
तीच तर खरी श्रीमंती
गुरू म्हणजे दिव्याची वात
सदैव राहू त्यांच्या ऋणात
गुरू म्हणजे अदृश्य शक्ती
शिष्याची निसिम्म भक्ती.
— रचना : सौ रश्मी हेडे.
८. गूगल गुरू
नको शिकवणी, नको मास्तर,
मोबाईल करतो सुरू !
अडलेल्या प्रश्नावर,
आपला असतो गूगल गुरू !
रोगाची माहिती, डॉक्टर
देतो त्वरित हुडकून !
सत्य असत्य बातम्या,
देई झकास सडकून !
सर्वांचा एकच गुरू,
म्हणे पिंकी, मम्मी, पप्पा
डिक्शनरीचा बाप,
गूगल गुरू
— रचना : गजाभाऊ लोखंडे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800