Saturday, July 12, 2025
Homeलेखलेकुरे उदंड झाली…

लेकुरे उदंड झाली…

“वसुंधरेच्या पाठीवरती अफाट झाली गर्दी,
गर्दीतच जन गुदमरती, दुःखात किती तळमळती,
हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर भासते आहे,
ही वसुंधरा लोकसंखेच्या भाराने रडते आहे”

कवीने अवघ्या चार ओळीत लोकसंख्या वाढीमुळे जागतिक पातळीवर किती मोठी समस्या निर्माण झाली आहे हे सांगितले आहे. इ.स. १६०० मध्ये संपूर्ण जगाची लोकसंख्या केवळ ४० कोटी होती. १८२५ साली १०० कोटी, १९२५ साली २८० कोटी, १९७५ साली ४०० कोटी, १९९१ साली ५३७ कोटी, २००० साली ६१५ कोटी तर २०१४ साली ७१४ कोटी लोकसंख्या होती. तर आज जगाची लोकसंख्या ८०० कोटीपेक्षा जास्त झाली आहे. वैद्यकीय आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढले आणि मृत्युदर कमी झाला त्यामळेच लोकसंख्या वाढली आहे. ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर २०३० साली ८८७ कोटी पर्यंत पोहोचेल असा तज्ञांचा अंदाज आहे.

११ जुलै १९८७ रोजी युगोस्लाव्हिया येथे एका बालकाचा जन्म झाला आणि  पृथ्वीने लोकसंख्येची पाचशे कोटीची संख्या ओलांडली. त्यानंतर जागतिक पातळीवर लोकसंख्या नियंत्रणाबाबत विचार करण्यात येऊन जनमानसात जागृती व्हावी म्हणून युनोच्या सूचनेनुसार १९८९ पासून ११ जुलै  हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा होऊ लागला.

संत रामदास स्वामींनी  ज्यावेळेस जगाची लोकसंख्या चाळीस कोटी होती त्याकाळात म्हणजे इ.स. १६०० च्या दरम्यान आपल्या दासबोध या ग्रंथात लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम यावर मर्मिक भाष्य केले आहे. ते म्हणतात,

लेकुरे उदंड झाली  ।  तो ते लक्ष्मी निघोन गेली  ।
बापडी भिकेस लागली   ।   काही खाया मिळेना  ।

म्हणजे त्यावेळेस सुध्दा भारतातील लोकसंख्यावाढ चिंताजनक  होती. सध्या भारतात दर दिड सेकंदाला एक मूल याप्रमाणे वर्षाला २.४ कोटी बालकांचा जन्म होतो. ११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या शंभर कोटी झाली. जगातील २.४% क्षेत्रफळ असलेल्या देशातील १६% लोकसंख्या होती. त्यामुळे २००० साली केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणाबाबत ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली. भारताने लोकसंखेवर नियंत्रण ठेवले नाही तर पुढील काही वर्षात भारताला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य या भावनेने धर्मापेक्षा देश मोठा आहे असे मानले व देशहितासाठी लोकसंख्या नियंत्रण योजनेस सहकार्य केले तर भारत अधिक प्रगती करून जगातील एक महासत्ता बनेल यात शंकाच नाही.

दिलीप गडकरी

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments