“श्रीनगर: तिसरे पोस्टिंग”
१९९६ ते ९८ या कालावधीत मी एकटा श्रीनगर पोस्टिंला गेलो. वातावरण एकदम बदललेले होते. आता पूर्वीचा चपरासी अब्दुल चहाचे कॅन्टीन चालवणारा ‘अब्दुल बाबा’ झाला होता. दाललेक, निशात- शालिमार बागा, शंकराचार्य मंदिर दर्शन आता आम्हाला अशक्य होते. पर्यटकांना काही भागात फिरायला जाता येत होते पण आमच्या सारख्या संरक्षण दलाला शहरातील भागात जायला पुढे मागे सेक्युरीटीच्या मशीन गन लावलेल्या गाड्यांचे ताफे घेऊन जायचे झाले तर अशा तामझामातून मधल्या गाडीत बसून जावे लागे.
थोडक्यात वाचलो…
एकदा माझा एक विंग कमांडर सहकारी स्टेट बँकेत गेला. तिथून लाल चौकात तो कोर्टाचे काम करेतोवर एका चिंचोळ्या गल्लीत मी गाडीत एकटा बसून होतो. जवळच्या टेलिफोन बूथमधून पुण्यात घरच्यांना फोन लावला. पण एकदम मला आजूबाजूला अस्वस्थता जाणवली. काही नजरा खटकायला लागल्या. माझ्या मित्राला येताना पाहिले. पटकन आम्ही सटकलो, दुसऱ्या दिवशी पेपरमधे वाचले… लालचौकात सेक्युरिटी ट्रकवर हल्ल्यात काहींचा बळी…
आमच्यासाठी जमवलेला दारूगोळा दुसरीकडे वापरला गेला! परिस्थिती किती उग्र आहे ते प्रत्यक्षात राहायला लागल्यावर त्या दहशतीचा दाह जाणवला.
आता रूम उबदार ठेवायच्या दगडी कोळशाच्या बुखारी शेगड्या जाऊन हीटर आले. इलेक्ट्रिक ब्लँकेट्स आली. आता बदामी बाग ऑफीसर्स मेस ऐवजी ऑफिसजवळ क्वार्टर्समधे राहायची सोय झाली. पायी चालत जायच्या अंतरावर अकौंट्स ऑफिस होते. बॉस एयर कमोडर आर डी लिमये, म्हणजे घारे डोळे, पिळदार मिशा, घारीची नजर असा मामला होता. माझा रूममेट विंग कमांडर शशांक कोठारे होता. नंतर तो म्हणाला की १९७२ साली आधमपूरला त्याचे वडील माझे अकौंट्सचे बॉस होते. तेव्हा मी त्याच्या स्कूल स्टूडंट मोठ्या भावाच्या वाढदिवसाला हजर होतो !
मधल्या काळात शशांक फ्लाईंग इन्स्ट्रक्टर बनला. जे एक मिग विमान डिस्प्ले म्हणून ठेवले होते. ते विमान पूर्वी मी चालवले आहे सर… म्हणत खूष असे !
कुटुंबाला राहायला पुण्यातील आमच्या – मन में है विश्वास फेम – फ्लॅटवर सोय केली. श्रीनगरहून पुण्यात यायला जायला अगदी सर्कस करावी लागे. रजा मिळणे दुरापास्त झाले. एकदा लेह हून विमान पुण्यात चालले होते म्हणून कसाबसा बसून पुण्यात आलो. परत जाताना बिना रिझर्वेशन अंबाल्याला पहाटेला उतरून तिथून बस मधून चंदिगढला रस्त्यावर उतरून ३,४ किमी चालत जावे लागे. तिथे सोमवारी श्रीनगर कुरीयरने पोहोचताना कुठून रजेवर गेलो असे होई !
आम्हाला पगार वाटपासाठी १ कोटी रुपयांची रक्कम आणायला दरमहा चंदिगढला जावे लागे. त्यामुळे हत्यारबंद गाड्या, पैशाच्या ट्रंका घेतलेला मी, असे लटांबर असे. या पोस्टींगचे वैशिष्ट्य म्हणजे मी राष्ट्र भाषा आठवडा साजरा करायला हिंदीत कॅशबुक लिहायला लागल्याने मला एक पारितोषिक मिळाले !
१९९७ साली मला ३ महिन्याचा एक कोर्स पुण्यात करायला मिळाला. आर्मी कँपात सेपरेटेड क्वार्टर भांडून मिळाले. हवाईदलातला आहेस मग लोहगावला जा, म्हणून जे ऑफिसर मला क्वार्टर नाकारत होते, त्यांच्या टेबलावर ठेवलेल्या आर्मी ऑर्डरच्या बाडातून काढून मी त्यांना दाखवले की ही ऑर्डर नेव्ही, आर्मी व हवाईदलातील सर्व ऑफिसर्सना समान लागू आहे. आपली अशी फजिती झाकायला मला क्वार्टर अलॉट झाले. हाऊस रीइंबर्समेंटचे क्लेम पास करताना असे कायदे कानून पाठ होते ते ज्ञान कामाला आले. पुढे १९ महिने तिथे राहिलो.
मुलगी नेहा व चिन्मय कॉलेजला सोयीने जाऊ लागले. मे महिन्यात कंपनी श्रीनगरला आली. मधल्या काळात नाडी भविष्यावर माझे लेख, पुस्तके यामुळे अंनिसचा रोष ओढवून घेतला. नाडी भविष्य थोतांड आहे, ताडपत्रावर काही कोरलेले नसते. ओक लोकांची दिशाभूल, अपप्रचार करीत आहेत. अशी झोड त्यांनी उठवली. त्या वेळी प्राचार्य अद्वयानंद गळतगे यानी अंनिसला फैलावर घेतले. मी निपाणीला सरांना भेटलो पण सरांचे डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याने ते मला पाहू शकत नव्हते. १ वर्षानंतर पर्यटक म्हणून आलेल्या सरांनी दाल लेकवर प्रथम पाहिले!
सन १९७८-७९ मधील रावलपुरा कॉलनीत आम्ही ज्या बंगल्यात राहात होतो तो आता शोधून सुद्धा सापडेना! हिंदूंच्या पलायनाची दाहकता तिथे भेटल्यावर समजली. मला खूप आवडलेली टीटा कौल आता दिल्लीकडे राहायला गेली असल्याचे समजले. डॉ गंजू जम्मूत राहायला गेले होते. त्यांची घरे इतरांनी बळकावली होती!
१९९८ मध्ये बॉस म्हणून पी. व्ही. नाईक आले. ते नंतर हवाई दल प्रमुख झाले. मला चॉईस पोस्टींग नाकारले गेले. पुण्यात आधी एकदा पोस्टींग झाले असल्याने आता पुन्हा नाही असा शेरा बसला होता! नाडी भविष्यात पुण्याच्या वेशीवर बदली होईल असे लिहिले होते. ते नगर रस्त्यावर ९ बीआरडीला कसे प्रत्यक्षात झाले ते मलाही माहित नाही!
ऑक्टोबर १९९८ मधे पुण्यात आलो. वयाच्या ५४व्या वर्षी मी निवृत्त होईन असे नाडी भविष्य कथन २ वर्षे एक्स्टेंशन मिळाल्याने तेही अचुक खरे ठरले.
आधी नगर रस्त्यावरील व नंतर २ विंग अशी पुण्यातल्या पुण्यात दोन बदल्या झाल्या. त्यातील किस्से पुढे येतील.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800