समाजात दिवसेंदिवस घटस्फोट वाढत असल्याने विविध कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक प्रश्न निर्माण होत आहेत. यामुळे अस्वस्थ होऊन संवेदनशील कवियत्री स्वाती गोखले यांनी लिहिलेला लेख आपल्याला अंतर्मुख करणारा आहे….
या लेखाच्या शीर्षकातच मोठा गहन प्रश्न दडलेला आहे असे मला वाटते. यात प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याकडे परंपरेनुसार चालत आलेले लग्नाचे प्रकार म्हणजे पालकांनी ठरवून केलेला मुलांचा विवाह आणि दुसरे म्हणजे प्रेम विवाह. या दोन्ही व्यतिरिक्तचे प्रकार फारसे सर्वसामान्य समजले जात नाहीत.
तरी हल्ली माणसांचे दृष्टिकोन खूप बदलत चालले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप काही प्रमाणात मान्यता मिळताना दिसते. परंतु तरीही ते सर्वमान्य नाहीच.
मला या ठिकाणी एवढेच म्हणायचे आहे की, कितीही शक्य असले/नसले तरी एवढी सुशिक्षित आणि समंजस पिढी ही हल्ली फार डोळसपणे प्रेम करते. आणि तेच योग्य आहे. नाहीतर परिणाम उभयपक्षी भोगावे लागतात. मला तर सुचवावेसे वाटते की, प्रेम नेहमी डोळसच करावे. आंधळं प्रेम करण्याचे दिवस आता संपुष्टात आले आहेत.
कारण विवाह हा दोन घराण्यांचे मिलन असते. तेव्हा पूर्वीसारखा “सून करावी गरिबाघरची आणि मुलगी द्यावी श्रीमंताघरी” हेही तितकेसे हल्ली घडत नाही. ते चूक की बरोबर या वादात मला पडायचेच नाही. कारण यातील कुठलीच गोष्ट कुणाच्याच हातात असत नाही. जो तो आपापल्या कुवतीनुसार आणि आवडीनुसारच वागत असतो. हा मनुष्य स्वभाव आहे. त्यात बदल होत नसतो.
पण फक्त हल्लीच्या मुलामुलींना मला एवढे जरूर सुचवावेसे वाटते की, आपल्यापेक्षा कमी किंवा जास्त अशा भिन्न आर्थिक, मानसिक, भावनिक स्तरांचाही विचार लग्न करताना जरूर करावा. एकमेकांच्या घरची राहणीमान शैली, विचार, सवयी, आधुनिकता, त्या त्या घरचे संस्कार, कुळधर्म, कुलाचार या सगळ्यांचा देखील विचार दोन्ही कुटुंबांनी केलाच पाहिजे.
हल्ली या सर्व गोष्टी आपण मालिका, वेबसिरीज, नाटक, चित्रपट, कथा-कादंबरी या सर्व माध्यमातून ऐकत, वाचत आणि पाहत असतो. ते सगळंच खरं किती आणि काय हे वास्तव आयुष्यात पडताळून पाहावं लागतं.
घटकाभरची करमणूक म्हणजे जीवन नव्हे. एकमेकांना प्रेमाने, समजूतीने समजून घेणे, घरातल्या आजारी, वृध्द आई-वडील किंवा इतर कुणी नातेवाईक असतील तर त्यांना, त्यांच्या त्यांच्या पध्दतीप्रमाणे स्वीकारणे, लागेल तशी मदत करणे हे सगळे ही नवीन पिढी करतच असते. (काही सन्माननीय अपवाद वगळता) काही गोष्टीत ही नवीन पिढी थोडी जास्त चिकित्सक आढळते.
दर वेळेला अरेला कारे करून प्रश्र्न सुटत नसतात, किंवा प्रत्येकच प्रथे/परंपरेची कारणमीमांसा ज्येष्ठ नागरिकांना माहित असेलच असं नाही. तेव्हा त्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही विषयासंदर्भात त्यांना गृहित धरले जाऊ नये. किमानपक्षी काही वेळा जमेल तसे सहानुभूतीपूर्वक त्यांचा विचार करायला हवा. आपल्यालाही या अवस्थेतून कधीतरी जावे लागणार आहे याची जाण असावी. पण तरीही हे …सगळं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि उभयपक्षी उत्तम रीतीने घडलं तर ठीकच.
हल्ली खूपशा घरातून खूप प्रमाणात अनेक गोष्टी दोन्ही बाजूंनी समजावून घेतल्या जातात हे चांगलेच आहे. तरीही साधारणपणे यातही दोन प्रकार आढळतात. स्वतंत्र आणि विभक्त कुटुंब पद्धती. मुलं देशात किंवा परदेशात असणे. एकुलती एक मुलगा किंवा मुलगी आणि त्यांना घडवणारे त्यांचे आई-वडील आणि एकत्र भावंडांबरोबर वाढलेली मुले/मुली यांत जमीन अस्मानाचा फरक आढळतो.
इथे मला असे सांगावेसे वाटते की, लग्न करताना हे प्रमाण किमानपक्षी १००% ते ९०% & above किंवा
१००% ते ५०% अशा फरकाने असते.
इतका फरक नसावा की दोन्ही बाजूंनी जुळवून घेणे फारच अवघड जाईल.
एखाद्या घरी मुलगी दिल्यानंतर तिच्या सासरकडचे संस्कार, पध्दती, विचारसरणी, राहणीमानातील बदल हे प्रचंड वेगळे असू शकतात. पण म्हणूनच मी वर म्हटल्याप्रमाणे ९०% ते १००% मध्ये असलेला फरक थोडासा सुसह्य असतो. पण जिथे ५०% ते १००% इतकी तफावत असेल तर दोन्ही कुटुंबांना ते जमवून घेणे जड जात असावे. आणि मग ती जोडपी कायम बिचारी गोंधळलेली, कावरीबावरी, समजून घेता घेता थकलेली, कावलेली आढळतात. कुणाचे ऐकावे, काय खरे किंवा काय नाही अशी द्विधा मनस्थिती त्यांची होते.
वयाच्या मानाने असलेली व्यवहारातील समज आणि आपापल्या करियरमध्ये प्रचंड पारंगत असलेली ही पिढी ह्यांना रोजच्या जीवनशैलीशी सांगड घालता येत नाही. आणि मग सर्वच स्तरावर चिडचिड दिसून येते. गरज ही दोन्ही बाजूंनी सदैव एकमेकांना असतेच. पण एखाद्या घरात १००% हौस असली तर दुस-या घरात काही सन्माननीय अपवाद वगळता ५०% संन्यास वृत्ती दिसून येते, आणि मग साहजिकच मेळ घालता येत नाही.
वरवर पाहता सगळं कितीही आलबेल दिसलं तरी ते तसं असतंच असं नाही. ही तफावत मानसिकरीत्या थकवून टाकणारी असते. तेव्हा असं होऊ द्यायचं नसलं तर उभयपक्षी दोन्ही कुटुंबांनी या गोष्टींचा विचार जरूर करावा. आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करून सुखी, संपन्न आणि आनंदी आयुष्य कसे होईल याकडे लक्ष द्यावे.
विवाहाच्या दालनात प्रवेश करताना या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. तरच कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचतील.
मनाने फारकत घेण्यापेक्षा समजूतीने समजून घेण्यातच खरा शहाणपणा आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.
बघा, पटतंय का ? ज्याने त्याने स्वत: यावर विचार जरूर करून पाहावा.

– लेखन : सौ.स्वाती गोखले.
– संपादन: देवेंद्र भुजबळ 9869484800.