शाळेत गणित आणि विज्ञान विषय कमकुवत असणाऱ्या राज मोरे यांना कलेचं आणि जीवनाचं गणित आणि विज्ञान छान जमलं. त्यातूनच त्यांनी आज जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला..
कलेला मानवाकडून कोणतीच अपेक्षा नसते. म्हणून ती मानवाची उपेक्षा करत नाही. जातिवंत कलावंतसुध्दा कलेकडून कोणतीच अपेक्षा करत नाही, आणि तो कलेची उपेक्षा हि करत नाही. असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे राज मोरे….
दिग्दर्शक, कलावंत म्हणून ओळख असणारे राज यशस्वी चित्रकार झाल्यानंतरही माझी पहिली आवड चित्रपटसृष्टीची होती, असे म्हणतात.
मिमिक्री कलाकार, चित्रकार आणि आज दिग्दर्शक म्हणुन प्रसिद्ध झालेले राज यांनी वेगळा विचार आणि वेगळी मांडणी प्रत्येक कलाकृतीत सहजतेने केली मग तो चित्रपट असो वा एखादे चित्र.
आपल्या चित्रातुन व्यक्त होणारे राज आपल्या चित्रांच्या बाबतीत भरभरून बोलतात. मुंबई एक शहर नाही तर एक व्यक्तीमत्व आहे. राज यांनी मुंबईचा वीस वर्षाचा अनुभव जाणला. मुंबई हे बोलणारे शहर, भावना जाणणारे शहर त्यांनी आपल्या सलाम बॉम्बे, लाइफ लाईन ७८६ या चित्र प्रदर्शनातून मांडले आणि यातून ते प्रसिद्ध झाले. मुंबईतील वैविध्यपूर्णता आणि विचारातील विरोधाभास राज यांनी आपल्या चित्रातून मांडला.
आपला हा कला प्रवास नेमका कधी सुरु झाला असे विचारले असता राज म्हणाले, विदर्भातील अकोला येथे माझा जन्म झाला. वडील सरकारी कर्मचारी होते. शाळेत माझे गणित आणि विज्ञान विषय कमकुवत होते. मी दिवसभर क्रिकेट खेळत असे आणि फक्त जेवणासाठी घरी येई.
सुदैवाने, शिवाजी, राधा-कृष्णा मीराबाई, दिलीप कुमार आणि स्मिता पाटील यांचे मी केलेले पेन्सिल रेखाटन, स्वतः चित्रकार असलेले, त्यावेळी बाल चित्रकला स्पर्धा भरवणारे किशोर विभूते सर यांच्या लक्षात आले. त्यांनी मला कला अभ्यासण्याचा सल्ला दिला आणि तिथून माझी या प्रवासाची सुरुवात झाली.

शालेय शिक्षणानंतर पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाच्या पदविका अभ्यासक्रमास मी प्रवेश घेतला. तिथे असताना मी मुंबईत सतत चित्रं प्रदर्शनं व चित्रपट पाहण्यासाठी जात असे.
कला पदविका प्राप्त केल्यानंतर मला मुंबईच्या सर जे.जे. मध्ये प्रवेश मिळाला. स्कूल ऑफ आर्ट्समधून एप्लाइड आर्ट्समध्ये मी पदवी प्राप्त केली तर जाहिरात फर्ममध्ये नोकरी मिळू शकेल, असे वाटत होते.
ललित कला म्हटले सुरक्षितता किंवा उत्पन्न याची खात्री नसते. पण मला अनेक संधी मिळाल्या. जे.जे. मध्ये काही वर्षांच्या शुल्कासाठी मी स्कूल, राज बाजीगर, ‘अकेले हम अकले तुम’ या चित्रपटांसाठी आणि टीव्ही मालिका ‘चाणक्य’ साठी तसेच नादिरा बब्बर यांच्या एकजुट मंडळाच्या नाटकांच्या महोत्सवासाठी बॅक ड्रॉप्स रंगवले आहेत.
चित्रकार होण्यासाठी मुंबईतल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हाच खरे म्हणजे मला चित्रपट निर्मितीमध्ये जास्त रस होता. माझ्या चित्रांना मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबरोबरच चित्रकार म्हणून मला सुरुवात करण्यास प्रवृत्त केल्यामुळे अब्राहिम अलकाझी यांनी त्यांचे कौतुक केले.
राज यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून 1999 मध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर जहांगिर आर्ट गॅलरी, मुंबई येथे “बी 4 मुंबई” आणि दक्षिण कोरियाच्या सोल एलव्हीएस गॅलरीने सादर केलेला बुसान आंतरराष्ट्रीय कला मेळा यासारख्या जगभरातील प्रदर्शनात भाग घेतला. दिल्ली, २०१२ मध्ये ललित कला अकादमीतर्फे आयोजित राष्ट्रीय प्रदर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीच्याबद्दल बोलताना राज म्हणाले, ते चित्रकार झाले तरी त्यांची पहिली आवड फिल्म मेकिंग होती. आपल्याला आधीच दिग्दर्शन करता आले असते, पण प्रवेश परीक्षा पास होऊनही मला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये प्रवेश मिळू शकला नाही. पण मी थांबलो नाही, हरलो नाही. त्यावेळी करिअर सुरू करणे महत्त्वाचे होते, म्हणून मी चित्रकलेत गेलो.
चित्रकार म्हणून नाव मिळवल्यानंतरही चित्रपट दिग्दर्शक होण्याची महत्वाकांक्षा राज याना शांत बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि अशाच प्रकारे खिसा या लघुपटाचा जन्म झाला.
हा लघुपट म्हणजे चित्रकार म्हणून त्यांचा विस्तार आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार त्यांनी स्वतः शोधला आणि त्यांच्याकडून काम, संवाद, अभिनय करून घेतला. तो प्रवासही रोचक आहे.
चित्रपटाचे सर्व चित्रीकरण त्यांनी अकोल्यात केले. त्यांच्या गावातून चित्रपटाची प्रमुख भूमिका शोधण्यासाठी अधिक शोध घेतला. प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा वेदांत श्रीसागर छोट्याशा शाळेत शिकतो. तो अभिनयात नवीन होता. इतर सर्व कलाकारांना थिएटर आणि अभिनयाचा अनुभव होता. त्यांच्या सोबत दोन महिने काम केले. समीक्षकांनी वेदांतच्या अभिनयाचे कौतुक केले, असे मोरे यांनी सांगितले. या लघुपटामुळे आज अकोला जगभर पोचले.
राज मोरे यांना खिसा या मराठी लघुपटासाठी दिग्दर्शनासाठी ६७ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला, इस्तंबूल येथे उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट पटकथा म्हणून दोन इस्तंबूल फिल्म अवॉर्डस मिळाले आहेत या शिवाय न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल डब्लिन आंतरराष्ट्रीय लघुपट आणि संगीत महोत्सव डिओरोमा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अर्जेंटिनातील चित्रपट महोत्सव अशा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवां मध्ये खिसा निवडला गेला आहे. पहिल्याच प्रयत्नांत असा सन्मान क्वचितच मिळतो.
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईचा पदवीधारक आणि आत्ता व्हिजुअल फाईन आर्टमधे अनेक वर्षांचा अनुभव तसच कित्येक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाठीशी असलेला कलाकार जेंव्हा चित्रपट व्यवसायात पदार्पण करतो तेंव्हा त्याची कलानिर्मिती ही दर्जेदार आणि प्रभावित करणारी असावी ह्यात शंका नसावी.
श्री राज मोरे हयांनी त्यांच्या पदार्पणातील मराठी लघुपट ‘खिसा’ (२०१)) ह्याद्वारे हेच सिध्द केले आहे. हा लघुपट जाणकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा नक्कीच आहे. त्यांची हि सुरवात दिग्दर्शक म्हणून घडवणारी आहे.
राज यांना सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते रवी जाधव यांचे कौतुकाचे शब्द मिळाले आहेत. अनेक दिग्गजांची कौतुकाची थाप हि मिळाली आहे.
राज म्हणतात, मला वाटतं की चित्रपट निर्मिती एक उत्कृष्ट माध्यम आहे, जिथे मी माझ्या कल्पना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकेन. सध्याही मी पुढच्या काही स्क्रिप्ट वर काम करत आहे. काही नव्या संकल्पना मनात आहेत. त्यावर विचार सुरु आहे. तसेच काही चित्र हि मी पूर्ण करत आहे. माझ्यातला चित्रकार आजही अनेकदा मला झोपू देत नाही. माझीं कला माझी साधना आहे.
माझी मेहनत आहे. माझी पत्नी संगीता आणि माझी दोन्ही मुले माझ्या या कला साधनेत माझ्या सोबत आहेत. त्यांचा मला नेहमी पाठींबा आहे. माझ्या प्रत्येक कलाकृतीचे ते प्रथम प्रेक्षक असतात आणि समीक्षकही.
संवादानंतर जेव्हा मी मुलाखतीच्या शेवटाकडे पोचलो तेव्हा मला ऐकू आले कि “राज, नाम तो सुना होगा” म्हणत राज आपल्या जीवनाच्या मागील प्रवासाकडे समाधानाने आणि समृद्धतेच्या भावनेने पहात आहेत. आणि प्रेरणा देत आहेत अशा अनेक राज यांना, जे महाराष्ट्रात अनेक गावागावात आहेत, प्रयत्न करत आहेत राज मोरे बनण्याचा. आपले अस्तित्व घडवण्याचा.
– लेखन : कमल अशोक, नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.