दोन दिवसांपूर्वी नवा महागडा आय फोन बाजारात आला. तो विकत घेण्यासाठी तरुणाईची गर्दी टीव्ही वर दाखवली गेली. ही गर्दी पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले. या गर्दीकडे बघता भारत हा गरीब देश आहे, येथील अनेक लोक अजूनही सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत हे विधान पटणार नाही. चेहऱ्यावरून व्यक्तीची आर्थिक, सामाजिक परिस्थिती कळत नाही हे मान्य केले तरी लाखाच्या घरात किंमत असणाऱ्या आयफोन साठी ची ही गर्दी बघून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
पूर्वी अशी गर्दी दिलीपकुमारचा “गंगा जमुना” किंवा राजकपूरचा “संगम” चित्रपट रिलीज झाला तेव्हा तिकिटाच्या खिडकीवर बघितल्याचे स्मरते. आता या खिडक्या ओस पडल्या आहेत. गर्दीची दिशा बदलली आहे. गरजा बदलल्या आहेत.
ही तरुण मुले शाळा कॉलेजच्या वर्गात मात्र दिसत नाहीत. शाळा कॉलेजच्या ग्रंथालयात, प्रयोगशाळेत दिसत नाहीत. याही जागा ओस पडल्या आहेत. पण कुणी एखाद्या मोर्चाचे आयोजन केले, आंदोलन छेडले तर यांना याच मोबाईलवरून मेसेज व्हायरल होतो. मग आपली प्रायोरिटी, अभ्यास, नोकरी सारे सोडून ती अशा आंदोलनात घोषणा देताना दिसतात. गळ्यात त्या मोर्चाच्या गरजे प्रमाणे विशिष्ट रंगाचे उपरणे, हातात वेळोवेळी बदलणारा झेंडा घेऊन नारे लावताना दिसतात. कधी कधी अशी आंदोलने दिवसेंदिवस चालतात. किती मनुष्य तास यात वाया घालवले जातात याचा हिशेब न केलेला बरा ! आश्चर्य म्हणजे या तरुणाईला आपले भले बुरे कशात आहे हे कळत नसेल असे आपण गृहीत धरले (जे मुळात चुकीचे आहे), तरी त्यांच्या पालकांचे काय ? ते कसे जाऊ देतात यांना ? ते काहीच विचारपूस का करीत नाहीत ? की व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दिलेली ती सूट आहे ? आपला मुलगा, मुलगी कुठे जातात, काय करतात, कॉलेज मध्ये का जात नाहीत ? शिक्षणाकडे दुर्लक्ष का करतात हे मोर्चात, आंदोलनात सामील होणाऱ्या तरुणाईच्या पालकांना कळत कसे नाही ? स्वतःला नेते, पुढारी, आका, लोक प्रतिनिधी म्हणवणारी ही स्वार्थी, चलाख मंडळी तरुणाईला हाताशी धरून आपली पोळी भाजून घेतात, अडचणीच्या, गरजेच्या वेळी या तरुणाईला चक्क वाऱ्यावर सोडतात, हे साधे धडधडीत सत्य कुणालाच कसे कळत नाही ?
एकीकडे गुणवत्तेचा ध्यास धरणारे नवे शैक्षणिक धोरण, विश्व गुरू होण्याच्या घोषणा, २०४७ ची सोनेरी स्वप्ने, स्कील डेव्हलपमेंट प्रकल्प, मेक इन इंडिया चे नारे, स्वदेशीचे वारे, आपल्या संस्कृती, परंपरेचा अभिमान, ए आय सारख्या नव्या तंत्राचा ध्यास, धार्मिक, राष्ट्रीय अभिमानाच्या उद् घोषणा…अन् दुसरीकडे ज्यांच्यासाठी हे सगळे चालले आहे त्याच तरुणाईचा हा बेछूट, बेबंद व्यवहार ! याचा ताळमेळ कसा लावायचा हा माझ्यासारख्या शिकूनही समज नसलेल्या व्यक्तीला प्रश्न पडतो !विचार करूनही या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. हे कोडे सुटत नाही.
आपल्याकडे शिक्षण सुविधा कितीतरी पटीने वाढल्या. इंजिनियरिंग, मेडिकल अशा सर्व क्षेत्रात प्रवेश संख्या कितीतरी पटीने वाढल्या. शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य, फी माफी, राहण्यास वस्तीगृहे अशा संख्या सुविधाही कितीतरी पटीने वाढल्या. प्रत्येक सरकार असे दावे करते गेल्या दहा वर्षांत हे झाले, ते झाले ! पण ज्यांच्यासाठी हे सगळे चालले आहे, सरकारी तिजोऱ्या खाली होताहेत (म्हणजे सरकार तसे दावे करते आहे), ते तरुण याचा किती उपयोग करून घेतात ? ते नव्या शैक्षणिक धोरणात किती रस घेतात ? किती तरुण चाळीस हजाराची शिष्यवृत्ती घेऊन, ध्यास घेतल्यासारखे जागतिक दर्जाचे संशोधन करतात ? सरकारी योजनांचा फायदा घेतात. पण आपल्या कौशल्याचा कुठल्या उद्योग व्यवसायासाठी उपयोग करतात ? मिडियात येणाऱ्या एक दोन अपवादात्मक बातम्या सोडल्या तर आपण या तरुणाईला हाताशी धरून गेल्या एकदोन दशकात आपले सामाजिक जीवन मान उंचावणारे, जगावर प्रभाव टाकणारे कोणते संशोधन केले ? किती नावीन्य पूर्ण उद्योग, व्यवसाय देश हितासाठी निर्माण केले ?
कारण खरेच असे झाले असते, होत असते तर बेरोजगारीची समस्यांच राहिली नसती. प्रत्येक हाताला काम असते. प्रत्येक जण व्यस्त दिसला असता. समाधानी आनंदी असता. आंदोलन मोर्चासाठी कुणाकडेही फावला वेळ राहिला नसता. नेते, पुढारी यांच्यामागे बेकार तरुणाई भरकटली नसती. हा सगळा विरोधाभास, पॅरोडॉक्स नाही वाटत तुम्हाला ?
कुणीही अभ्यासू राजकारणी, समाजशास्त्रद्न्य, शिक्षणतद्न्य या विषयाचा गंभीरपणे विचार, अभ्यास करताना दिसत नाही. जी आपलीच संस्कृती, परंपरा जपण्याचा आपण अट्टाहास करतो तिथेही या प्रश्नाची उत्तरं नाहीत ,असे कसे होईल ?आपल्याकडे तर सर्व गुरुकिल्ल्या होत्या, आहेत असे आपण म्हणतो. मग आज या भरकटत जाणाऱ्या तरुणाईला आपण का आवरू शकत नाही ? त्यांना शाळा कॉलेजच्या वर्गात का आकर्षित करू शकत नाही ?ते ज्या मृगजळामागे धावताहेत त्याच्या संभाव्य धोक्याची जाणीव आपण (शिक्षक, पालक) त्यांना का करून देऊ शकत नाही ? कसची मजबुरी आहे ? कुठे काय अडचण आहे ?
एकीकडे आम्हाला गुणवत्ता असून प्रवेश मिळत नाही म्हणून ओरड करायची, दुसरीकडे आम्ही शाळा कॉलेजच्या हजारो जागा रिक्त अशा बातम्या वाचायच्या ? एकीकडे सरकारने किती हजारो करोडो चे उद्योग राज्यात, देशात आणले असे दावे करायचे अन् दुसरीकडे बेकार तरुणाईला जॉब मिळत नाही म्हणून त्यांनी आंदोलनात सहभागी व्हायचे ? महागड्या मोबाईल खरेदीसाठी झुंडीने रांगेत उभे राहायचे ? एकीकडे नवे शैक्षणिक धोरण राबवायच्या गप्पा, अन् दुसरीकडे अनेक प्राध्यापकाच्या जागा रिक्त ?एकीकडे आय आय टी, एन आय टी ची संख्यावाढ तर दुसरीकडे जागतिक नामांकनात विद्यापीठांची घसरण, एकीकडे स्वच्छ भारत चे नारे, दुसरीकडे घाणीचे, रोगराईचे साम्राज्य, एकीकडे उंच,लांब समृद्धी मार्ग अन् दुसरीकडे शहरातील रस्त्यावरचे खड्डे, त्याने होणारे अपघात, एकीकडे आपल्या सोज्वळ, एकत्र कुटुंब पद्धतीचे दाखले, अन् दुसरीकडे लिव्ह इन, घटस्फोटाचे वाढते प्रमाण! या सगळ्याचा मेळ कसा लावायचा ?
हीच ती वेळ. हाच तो क्षण.. सर्व राष्ट्रप्रेमी, समाज सेवक, शिक्षणतद्न्य, प्रभावी नेते, उद्योजक, मानसशास्त्रद्न्य, डॉक्टर्स, न्यायमूर्ती यांनी एकत्र बसून विचार मंथन करावे.
जे झाले गेले ते मागे सोडायचे, विसरायचे. आता पुढचा, भविष्याचा विचार करायचा फक्त ! कुठे कुणाचे काय चुकते हे शोधायचे. ते कसे बदलायला हवे याच्यावर चिंतन करायचे. लहान मुले, मुली तरुणाई, यावर लक्ष केंद्रित करायचे. तीच देशाची, भविष्याची खरी आशा. तेच आपले आधारस्तंभ. ते मूळ घट्ट हवे आधी. त्या पायावर या देशाचे भवितव्य उभे राहणार. त्याकडे अशी डोळेझाक नको. या तरुणाईला वेळीच आवरायला हवे, सावरायला हवे. एकदा ही शक्ती हातातून निसटली, हाताबाहेर गेली की संपलेच सगळे. ती नव्या गृहयुद्धाची नांदी ठरेल कदाचित ! आपण अवती भवती बघतोच काय चाललेय ते. कुठलीही समस्या राक्षसी रूप धारण करण्या अगोदर वेळीच सोडवायची असते. ती केवळ सरकारची जबाबदारी नाही. शेवटी सरकार देखील आपलेच. आपल्यालाही जबाबदारी झटकून चालणार नाही हेही तितकेच खरे. तुम्हाला काय वाटते ?

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800