Wednesday, October 15, 2025
Homeलेखअमेरिकेत असं काय आहे ?

अमेरिकेत असं काय आहे ?

आपल्या कडील विद्यार्थी, तरुण वर्ग यांचे वर्षानुवर्षे चालत आलेले अमेरिकेविषयीचे आकर्षण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकावर एक सुरू केलेल्या निर्बंधामुळे, कडक नियमांमुळे पुन्हा तो चर्चेत आलाय.

कोणे एके काळी हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, पुणे अशा शहरातील अनेक घरी कुणी न कुणी (मुलगा, मुलगी, जावई) अमेरिकेत असलेच पाहिजे असा नियम होता ! आय आय टी, इतर नामांकित इंजिनियरिंग कॉलेजची मुले आधी पदव्युत्तर शिक्षणासाठी, अन् सोबतीने नोकरीसाठी तिकडे कायम स्थिरावल्याची अनेक उदाहरणे आहेत. खरे तर आय आय टी सारख्या संस्था प्रत्येक विद्यार्थ्यावर सरकारी तिजोरीतून करोडो रुपये खर्च करीत असताना ही मुले देशाच्या वृद्धीच्या कामी न येता अमेरिकेच्या वृध्दीस मदत करतात हाही चर्चेचा विषय झालाय.

खरे तर ज्या प्रमाणे मेडिकल पदवी घेणाऱ्यांना एक वर्षे खेडे गावात इंटर्नशिप करावीच लागते, तसेच आय आय टी च्या विद्यार्थ्यांनी भारतात नोकरी करणे अनिवार्य करायला हवे होते. पण आपल्या बुद्धीचा उपयोग इथे काय किंवा अमेरिकेत काय कुठेही झाला तरी शेवटी योगदान हे जगाच्या कल्याणासाठीच तर असते, असा उदारमतवादी दृष्टिकोन ठेवल्याने ही स्थिती निर्माण झाली.

आज आपल्या कडील अनेक मोठ्या शहरात अनेक वृद्ध एकाकी जीवन जगताहेत. मोठा बंगला आहे, भरपूर पैसा आहे पण मदतीला, बोलायला प्रेमाने विचारपूस करायला कुणी नाही अशी दयनीय परिस्थिती अनेक घरात आहे. अगदी शेवटच्या वेळी सुद्धा पोटची मुले पाणी द्यायला उशाशी नाहीत अशी दारूण स्थिती आहे.

काही दशकापूर्वी अमेरिकेचे हे आकर्षण योग्य म्हणता येण्यासारखे होते. तिकडच्या विद्यापीठाचा शिक्षणाचा दर्जा, संशोधनाच्या सोयी सुविधा, पोषक वातावरण ह्या जमेच्या बाजू होत्या. पण आता तसे राहिले नाही. गेल्या दोन दशकातील वेगाने झालेली प्रगती, भारताची सर्व क्षेत्रातील गरुडझेप लक्षात घेता, इथे काय नाही जे तेथे आहे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तिकडचे भारतीयाचे राहणीमान हे मध्यमवर्गीय असेच असणार. उलट इथे ते उच्च मध्यम किंवा श्रीमंत श्रेणीतले असू शकते. अशी कोणती गोष्ट आहे जी तिथे मिळते पण इथे नाही ? उलट नोकर चाकर इथे सहज मिळतात. तिकडे मुळीच नाही. मुलाच्या शिक्षणासाठी कितीतरी इंटर नॅशनल ग्लोबल शाळा इथे आहेत. तिथले शिक्षण ही तिकडच्या तुलनेत उत्तमच आहे. उलट आपली संस्कृती,आपली परंपरा, मातृभाषा जपणे इथे राहून सहज शक्य आहे. (काही निवडक मंडळी तिकडेही जमेल तसे जपतात हा भाग वेगळा). तिकडचे एकमेव आकर्षण म्हणजे ८० /९० ने होणारा उत्पन्नातला गुणाकार. विनिमय दर..तेवढे एक सोडले तर इथेही करोडोचे घर, मॉल संस्कृती, हाय फाय वातावरण सगळे आता आहेच की !आपल्याकडे ट्रान्सपोर्ट च्या जितक्या सहज सुविधा आहेत त्या तिकडे नाहीत. शिवाय तिकडची मंडळी तिथे राहून इथले सणवार, लग्न समारंभ, भेटीगाठी याला कायमची मुकली ते वेगळेच. यामुळे एकूणच कुटुंब व्यवस्थेची जी मोडतोड झाली तो वेगळा चर्चेचा विषय.

कुठल्याही देशात स्वदेशीला जो मान सन्मान, मिळतो, प्रतिष्ठा मिळते ती (काही सन्माननीय अपवाद वगळल्यास) परकियांना मिळणे तसे कठीणच. आपण तिकडे केव्हाही दुय्यम नागरिक, हे विसरता कामा नये. शिवाय प्रत्येक देशाच्या, प्रांताच्या बाबतीत स्थलांतराचा मुद्दा गेल्या काही वर्षात गंभीर झाला आहे. मूळचे इथले, अन् बाहेरून आलेले परके या वादापोटी चक्क युद्ध, संघर्ष होताहेत ! बाहेरून आलेली मंडळी नाकापेक्षा मोती जड झाली आहेत. काना मागून येऊन तिखट झाली आहेत. मुंबई, महाराष्ट्रात गुजराथी, तामिळ, तेलुगू, भय्ये नकोत, तर मग हेच धोरण अमेरिकेचे असले तर ट्रम्प ला नावे का म्हणून ठेवायची ? आपला स्वाभिमान, देशाभिमान जितका प्रबळ तितकाच त्यांचाही, असे का मानू नये ? त्यांना ही त्यांची चिंता आहेच की! मग त्यांचे काय चुकले ?

आता आपणच सावध व्हायला हवे. परिस्थिती बदलली आहे आता.सगळीच समीकरणे बदलत चालली आहेत. अनेक देशात युद्धजन्य स्थिती आहे. आर्थिक डोलारा पूर्वीसारखा मजबूत नाही राहिला. नव्या तंत्रज्ञानाच्या राक्षसी विळख्यात सगळे जग अडकले आहे. येत्या दोन तीन दशकातले भविष्य कमालीचे अनिश्चित आहे. कधी नव्हती इतकी अस्थिरता आर्थिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्रात पसरली आहे. हे सारे लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने पाऊले उचलली पाहिजेत. सांभाळून..विचार करून.. हीच ती वेळ. हीच ती संधी. स्वदेशी परतण्याची. जर खरेच भारतीयांचे अमेरिकेतील योगदान मोलाचे, महत्वाचे असेल, (जसा एक विचार पसरवला जातो), तर आपल्या परतण्याने अमेरिकेला धडा शिकवण्याची, अन् तिथल्या संपादित द्यानाचा, अनुभवाचा फायदा आता आपल्या स्वदेशाला करून देण्याची देखील ही सुवर्ण संधी आहे.

इथेच बालपण गेलेले पण तिकडे जाऊन अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले इकडच्या परिस्थितीला, वातावरणाला नावे ठेवतात. तेही बंद केले पाहिजे. शेवटी ही आपली जन्म भूमी आहे. मातृभूमी आहे.आपण या देशाचेही आता काही देणे लागतो हा कृतार्थ भाव जागवला पाहिजे.तिकडचे पाश्चात्य, आधुनिक वातावरण झाले भोगून आता स्वदेशी मातीची धूळ बघा अनुभवून. आपले गाव,आपली माणसे, आपले स्नेही यांच्याही सहवासात राहा बघून. तिकडच्या संपन्नतेत भर घातलीत. आता इथल्या बौद्धिक, आर्थिक, सपन्नतेत योगदान लाभू द्या तुमचे. त्या ट्रम्प लाही कळू द्या..सगळेच त्याच्या सारखे स्वार्थी, हेकेखोर नसतात. विवेकाने तार्किक विचार करणारे देखील असतात.

अर्थात यासाठी परतणाऱ्या भारतीयाची इच्छा शक्ती जितकी महत्वाची, तितकीच आपल्या सरकारची वेगळा out of box विचार करण्याची प्रवृत्ती देखील महत्वाची. या परत येऊ इच्छिणाऱ्या अमेरिकन भारतीयांसाठी त्यांच्या अनुभवानुसार, योग्यतेनुसार विविध विद्यान, उद्योग, व्यावसायिक क्षेत्रात त्यांना सन्मानाने सामावून घेणे हे देखील तितकेच महत्वाचे. आपल्या संरक्षण प्रयोगशाळा, स्पेस सेंटर्स, आय आय टी, नवी विद्यापीठे यात कितीतरी जागा रिकाम्या आहेत. याशिवाय नवे उद्योग, ए आय,एम एल, नॅनो सारखे तंत्रद्न्यान यातही नवनवे प्रयोग, संशोधन, उत्पादन करण्यासाठी ही परतणारी आपल्याच मातीतली मंडळी छान हातभार लावू शकतील. त्यासाठी सरकारला वेगळे नियम करावे लागतील. वेगळी यंत्रणा निर्माण करावी लागेल. हे जर खरेच घडले, तशी सुरुवात जरी झाली तर ती आपल्या भारतासाठी एक नव्या दिशेने जाणारी नवी प्रगती यंत्रणा ठरेल यात शंका नाही. जे वृद्ध आईवडील आपल्या मुलांच्या भेटी गाठी साठी इकडे तिष्ठत झुरत आहेत त्यांना तर वर जाण्या आधीच स्वर्ग दिसेल इथेच !

डॉ विजय पांढरपट्टे

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. एम टेक, पी एचडी (आय आय टी)
माजी कुलगुरू, हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. डॉक्टर सरांनी वास्तव लिहिले आहे. मुले अमेरिकेत जातात. तिकडचा खर्च ही भरमसाठ. नोकर चाकर ठेवले तर बचत होणे मुश्किल. आता भारतात सुद्धा भरघोस पगार घेणारी मंडळी आहेत, देणार्‍या कंपन्या आहेत. जास्तीत जास्त इतर राज्यात जावे लागेल. पालकांना घेवून जावू शकतो किंवा दर आठवड्याला, पंधरा दिवसानी मूळ ठिकाणी भेटू शकतो. या चिमण्यांनो परत फिरा , ने मजसी ने परत मातृभूमीला ही गाणी फक्त ऐकण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी. सर लेख आवडला. कवी गजाभाऊ लोखंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप