विद्यापीठातर्फे दरवर्षी ज्या प्रमाणे युवा महोत्सव आयोजित केला जातो त्याप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करणे आवश्यक आहे, अशी सूचना ज्येष्ठ साहित्यिक श्री दिलीप गडकरी यांनी केली.श्री गडकरी यांच्या हस्ते नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाचे नुकतेच उद्घाटन झाले ,त्या प्रसंगी ते बोलत होते.
श्री गडकरी पुढे म्हणाले की , विद्यार्थी साहित्य संमेलन नियमितपणे आयोजित केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व लेखनाची आवड निर्माण होऊन अनेक नवीन लेखक, कवी तयार होतील. त्याच बरोबर वाचन संस्कृती वाढण्यास निश्चित मदत होईल.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. रेखा सोलंकी हिने ऊत्तम कथेद्वारे नेत्रदानाचे महत्व सांगितले.प्रथमेश झनवर, मयुरी साळूंखे, विश्वजित जानराव इत्यादी विद्यार्थ्यानी कविता वाचन केले.तसेच शिक्षकांनीही कविता, चारोळ्या, कथा, गाणे यांचे सादरीकरण केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. विवेक पोतदार यांनी भूषविले.या कार्यक्रमासाठी डॉ. मिलिंद पोतदार ( विश्वस्त, विद्यामंदिर मंडळ ),श्री. अरुण धारप ( उपाध्यक्ष, विद्यामंदिर मंडळ),श्री.रमेश कुंभार ( सदस्य, विद्या मंदिर मंडळ ), सौ.भोईर मॅडम, ( मुख्याध्यापिका,नेरळ विद्या मंदिर,प्राथमिक विभाग) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे उपस्थित होते.
या मान्यवरांनी मराठी भाषेची थोरवी,मराठी भाषेतील संस्कार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी भाषेतील वाक्यप्रचार याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष तुरुकमाने यांनी केले.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800