अभिनय सम्राट दिलीपकुमार आपल्याला सोडून कालच गेले. त्यांच्या चित्रपटातील सदाबहार गाण्यांच्या आस्वाद सादर करीत आहे, अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थेचे निवृत्त जनमाध्यम अधिकारी, प्रसार माध्यमात पीएचडी केलेले, प्रसार माध्यमं, आणि धर्म चिकित्सा यावर पुस्तकं लिहिलेले आणि चित्रपट समीक्षक डॉ त्र्यंबक दुनबळे. आपल्या पोर्टलवर त्यांचं स्वागत आहे….
आठ फिल्म फेअर पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी असलेल्या अभिनय सम्राट दिलीपकुमार यांनी कित्येक पिढ्या भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांचा अभिनय, संवाद, नृत्य आणि विशेष शैलीने ते मनोरंजन विश्वाचे बादशहा होते. त्यांच्या काही भूमिकांनी त्यांना ट्रॅजेडी किंग ही उपाधी बहाल केली. मात्र त्यांनी सर्वच प्रकारच्या भूमिका करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
दिलीपकुमार यांची शेकडो गाणी गाजलेली आहेत. त्यातील त्या त्या काळात गाजलेली, अभिनय कारकीर्द उजळणारी ही गाणी म्हणजे प्रेक्षकांच्या मनातील अनेक आठवणीच आहेत.
‘उडे जब जब जुल्फे तेरी, ओ उडे जब जब जुल्फे तेरी..’ आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा जादुई आवाज. दिलीप कुमार आणि वैजंयतीमाला यांचा बहारदार अभिनय. साहीर लुधियानवी यांचे शब्द आणि ओ. पी. नय्यर यांच्या संगीताने गाजलेला नया दौर (१९५८) सिनेमा. याच सिनेमातील ‘मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार’.. असो की ‘ये देश है वीर जवानों का अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारों क्या कहना, यह देश है दुनिया का गहना’ (रफी/बलबीर) कानावर पडले की देशभक्तीची भावना उचंबळून येते.
दिलीप साहेब यांनी अजित यांच्या समवेत केलेला समूह नृत्य अविष्कार म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा अभिनय. वैजंयतीमाला यांच्या समवेत प्रचंड गाजलेला दिलीप कुमार यांचा मधुमती (१९५८) मुकेश आणि लताजी यांनी गायलेल्या ‘दिल तडफ तडफ के कह रहा है, आभी जा तू हमसे आंख ना चुरा..’ असो की ‘सुहाना सफर और ये मौसम हसीन (मुकेश) आजही मनावर राज्य करतात. या सिनेमातील ‘तुटे हूये ख्वाबों ने हम को ये सिखाया है’.. हे असेच एक अभिनयाने सजलेले दु:खभरे गीत.
कोहिनूर (१९६०) सिनेमात दिलीप कुमार आणि मीना कुमारी ही जोडी. एक ट्रॅजेडी किंग तर दुसरी ट्रॅजेडी क्वीन. ‘दो सितारो का जमींपर है मिलन, आज की रात ..’ (लता रफी/ संगीत नौशाद) किंवा दिलीप कुमार अभिनित ‘मधुबन मे राधिका नाचे रे गिरीधर की मुरलिया बाजे रे .’ रसिक प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात आहेत.
मीनाकुमारी सोबत त्यांचा यहुदी (१९५८) आठवतोय. मुकेश यांच्या आवाजात ‘ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू ना पहचाने तो है तेरे नजरो का कसूर’..शैलेन्द्र यांचे शब्द आणि शंकर जयकिशन याचं संगीत. याच बहारदार जोडीचा आझाद (१९५५) विसरून कस चालेल? या सिनेमातील ‘कितना हसीं हैं मौसम, कितना हसीं सफर है, साथी है खुबसुरत, ये मौसम को भी खबर है..’ राजेंद्र कृष्ण यांचे शब्द. सी रामचंद्र यांचे संगीत आणि लताजी बरोबर चितळकर यांचा मधुर आवाज. क्या बात है !.‘नैन लढ गई है तो तो मनवा क्या करे’, हे गंगा जमुना (१९६१)सिनेमातील एक असंच अप्रतिम गाणं. कितीदा चित्रपट पहावा. संगीत कानात साठवून ठेवा. दिलीप कुमार ग्रेट.
‘इमली का बूटा बेरी का पेड, इमली खट्टी मिठ्ठे बेर..’ (सुदेश भोसले आणि मोहमद अजीज, लक्ष्मीकांत प्यारेरलाल ) हे सौदागर (१९९१) सिनेमात अभिनय क्षेत्रातील सिंह ‘दिलीपकुमार आणि राजकुमार’ समोरासमोर येतात आणि प्रेक्षकांच्या दिलावर खरंच राज्य करतात.
क्रांती (१९८१) चित्रपट आणखी एक माईल स्टोन. त्यात दिलीप कुमार लक्षात राहतात ते त्यांनी क्रांतीकारकाच्या भूमिकेत मनोजकुमार समवेत गायलेले ‘चना जोर गरम..” गाण्यामुळे. किशोर कुमार, नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेले व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेले अजरामर एक गीत.
‘तेरे हुस्न की क्या तारीफ करूं कूछ कहते भी मै डरता हूं’.. लता मंगेशकर आणि मोहमद रफी यांनी गायलेले, नौशाद यांचे संगीत आणि शकील बदायुनी यांचे शब्द. लीडर सिनेमातील दिलीप साहब यांच्या अभिनयाने कित्येक पिढ्या युवकांना प्रेमाची ही भेट दिली आहे. तर आदमी (१९६८) सिनेमात दिलीपकुमार यांचे अभिनयाचे वेगळेच रूप समोर येते.
आपला मित्र आणि प्रेयसी यांनी दुखावलेले, ‘आज पुरानी राहों से कोई मुझे आवाज न दे, दर्द मे डूबे गीत न दे, गम का सिसकता साज न दे’. मोहमद रफी यांच्या दर्दभरी आवाजातील हे गाणे आजही डोळ्यात पाणी आणते. संगीत नौशाद.‘आज की रात मेरे दिल की सलामी ले ले’.. राम और श्याम (१९६७) या चित्रपटातील दुहेरी भूमिकेमुळे गाजलेले अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचे नायिका वहिदा रहमान सोबतची जुगलबंदी. रफी यांचा दर्दभरी व दु:खी आवाज, नौशादचे अफलातून संगीत आणि शब्द शकील बदायुनी.
मधुबाला आणि दिलीप कुमार ही अभिनयाची अजरामर जोडी. तलत मेहमूद यांच्या मखमली आवाजात, राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले आणि सज्जाद हुसेन यांनी सजविलेले ‘ये हवा, ये रात ये चांदणी, तेरी एक अदा पे निसार है’. संगदिल (१९५२).. नुसते ऐकत राहावे असे सुमधुर गीत.
मग येतो, ‘सारे शहर मे आपसा कोई नही’ चा धमाका. आनंद बक्षी, संगीत कल्याणजी आनंदजी. आवाज मोहम्मद रफी आशा भोसले. बैराग (१९७६) लीना चंदावकर बरोबर दिलीपकुमार यांचा अप्रतिम अभिनय. तर ‘कोई सागर दिल को बह्लता नही’, हे रफी यांच्या आवाजातील, नौशाद यांचे संगीत असलेले दिलीप कुमार यांच्यावर चित्रित एक बहारदार गीत. दिल दिया दर्द लिया(१९७६).
दिलीपकुमार आणि नादिरा अभिनित ‘आन’ (१९५२) सिनेमातील नौशाद यांनी संगीत दिलेले आणि रफी यांच्या आवाजातील ’दिल मे छुपाके प्यार का तुफान ले चले’ हे असेच चित्रित जोशपूर्ण गीत.
खरोखरच दिलीप साहेब यांना आपण विसरू शकत नाही. त्यांची लाजबाब अदाकारी कायम स्मरणात राहील. ’मेरी कहानी भूलने वाले तेरा जहां आबाद रहे’ दीदार (१९५१) गाण्यातून तोच सूर निघतो. नायिका नर्गिस. आवाज मोहम्मद रफी. शकील बदायुनी. संगीत नौशाद. ‘मेरे गीत सुने दुनियाने मगर मेरा दर्द कोई जान सका’ कानात निनादत राहते.
हलचल (१९५१) या विस्मरणात गेलेल्या सिनेमात, रफी आणि लता यांच्या आवाजात ‘प्रीत जता के मीत बना के भूल न जाना’ हे नर्गिस आणि दिलीप कुमार यांच्यावर चित्रित असेच एक गीत.
‘कर्मा’ (१९८६) हा देश भक्तीवर आधारित अत्यंत गाजलेला सिनेमा. दिलीपकुमार, नूतन, दारासिंग, अनिल कपूर, जँकी श्राँफ आणि नसरुद्दिन शहा यासारख्या अनेक कलाकारांनी अभिनित व त्यातील गाण्यांमुळे गाजलेला लोकप्रिय सिनेमा. त्यातील ‘ये सनम तेरे लिये’.. हे दिलीपकुमार आणि नूतन वर चित्रित गाणं असो की ‘आय लव्ह यु’ हे गीत किती मजेदार पण अर्थपूर्ण संदेश देणारे आहे.
तर दास्तान (१९७२) चे रफी च्या आवाजातील, ‘ना तू जमीन के लिये, है ना आसमान के लिये, तेरा वजूद है अब सिर्फ दास्ता के लिये’ दिलीप साहेबांच्या अभिनय आणि रफीच्या आवाजासाठी जरूर ऐकलेच पाहिजे.
‘गुजरे है आज आज इश्क में हम उस मुकम से’ असेच भावविभोर करून जाते. ‘इंसाफ का मंदिर है भगवान का घर है, कहना है जो कह दे, किस बात का डर है’ अमर सिनेमातील हे गीत मधुबाला आणि दिलीपकुमार यांच्यावर चित्रित आहे. तर ‘आना है तो आ राह मे, कुछ देर नही है’, भगवान के घर देर है, अंधेर नही है’ अजित आणि वैजयंती मालावर चित्रित ‘नया दौर’ चे हे गीत अंतर्मुख करते.
‘श्यामे गम की कसम, आज गम भी है नम,’ तलत मेहमूद (फूटपाथ) असो की ‘मुझे दुनिया वालो, शराबी ना समझो, मै पीता नही हूं, पिलायी गई है’.. लीडर (१९६४) ही रफी यांच्या आवाजातील गाणी आजही अभिनयामुळे तितकीच लोकप्रिय आहेत. तर विस्मरणात गेलेल्या बाबुल (१९५०) सिनेमाचे हे बहारदार गीत. याच सिनेमाचे शमशाद बेगम आणि तलत यांच्या आवाजातील ‘मिलते ही आंखे दिल हुआ दिवाना किसीका’..दिलीप कुमार आणि निगार सुलताना यावर हे चित्रीत गाणं अतिशय मोहक आहे.
’हुस्नवालों को ना दिल दो’ दिलीप कुमार आणि नर्गिसवर चित्रित. आवाज तलत मेहमूद. ‘ये मेरे दिल कही ओर चल गम की दुनिया से दिल भर गया,’ दाग (१९५२) तलत मेहमूद यांनी गायलेल्या या गीतांनी दिलीप कुमार यांना ट्रँजेडी किंग ची उपाधी मिळवून दिली.
दिलीप कुमार साहेब यांनी आपल्या विविधागी अभिनयानी अशी अनेक गाणी सजवीत आपले सर्वांचे मनोरंजन व सेवा केली आहे. हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास त्यांच्याविना अधुरा आहे. शेकडो चित्रपट आणि गाणी यामधून ते मनात कायम आहेत. असा अभिनेता व कलाकार होणे नाही.
दिलीपकुमार साहेब यांनी आपल्या विविधागी अभिनयानी अशी अनेक गाणी सजवीत आपल्या सर्वांचे मनोरंजन व सेवा केली आहे. हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास त्यांच्याविना अधुरा आहे. शेकडो चित्रपट आणि गाणी यामधून ते मनात कायम आहेत. असा अभिनेता व कलाकार होणे नाही.
– लेखन : डॉ त्रंब्यक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.