“हरिवंशराय बच्चन”
थोर हिंदी कवी, साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांच्या “मधुशाला” या एकाच काव्य संग्रहाने त्यांना अजरामर केले आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अशा या थोर साहित्यिकास उत्तर प्रदेश सरकारने तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला, त्यावेळी ते प्रकृती बरी नसल्याने, स्वतः उपस्थित राहून पुरस्कार घेऊ शकणार नाही, ही बाब लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री मुलायमसिंह यादव यांनी तो पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांना मुंबईत येऊन प्रदान केला.
त्यावेळी हरिवंशराय बच्चन, पत्नी सौ तेजी बच्चन यांच्यासह त्यांचे पुत्र महान अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांच्या “प्रतिक्षा” या बंगल्यात रहात होते. त्यामुळे हा छोटेखानी समारंभ अमिताभ बच्चन यांच्या घरी संपन्न झाला.
इतर राज्य सरकारांचे काही कार्यक्रम मुंबई किंवा महाराष्ट्रात असले तरी राज शिष्टाचाराचा भाग म्हणून त्या त्या कार्यक्रमांच्या प्रसिद्धीची, प्रसिद्धीच्या समन्वयाची जबाबदारी, संबधित राज्याच्या प्रसिद्धी खात्याच्या संपर्कात राहुन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला पार पाडावी लागते. त्यावेळी मी महासंचालनालयाच्या मंत्रालयातील वृत्त शाखेत वरीष्ठ सहायक संचालक, वर्ग 1 अधिकारी म्हणुन कार्यरत होतो. वृत्त शाखेतील कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणे, हेच माझे काम असे. त्यामुळे कामाचा भाग म्हणून, खरं म्हणजे मला हरिवंशराय बच्चन यांच्या सन्मान सोहोळ्यास व्यक्तिशः उपस्थित राहण्याची काही गरज नव्हती. पण मुळात बातमीदार राहिलो असल्याने आणि बातमीदारीची आवड कायम राहिल्याने, काही आगळेवेगळे कार्यक्रम, काही महत्त्वाच्या घटना, घडामोडींचे वृत्तांकन, छायाचित्रण, दूरदर्शन चित्रण यासाठी जेव्हा जेव्हा आमचे पथक पाठविण्यात येत असे, तेव्हा तेव्हा शक्य असल्यास मी ही त्या पथकाबरोबर अवश्य जात असे.
तसा, त्या दिवशीचा तो कार्यक्रम संध्याकाळी होता. माझी ड्युटी पण संपली होती. म्हणुन मी आमच्या चित्रीकरण पथकाबरोबर अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यात दाखल झालो. तीस वर्षांपूर्वी दूरदर्शन, माहिती खाते आणि तीनचार वाहिन्यांकडेच टीव्ही कॅमेरा होते. त्यामुळे प्रतिक्षा बंगल्यात पाच सहा टीव्ही कॅमेरामन, पंधरावीस वृत्त छायाचित्रकार, यू एन आय, पीटीआय या वृत्त संस्थांचे प्रतिनिधी दोन्ही सरकारांचे संबधित अधिकारी अशी मोजकीच मंडळी उपस्थित होती. आम्ही आपापली ओळखपत्रे पोलिसांना दाखवून प्रतिक्षा बंगल्यात प्रवेश केला.

प्रतिक्षा बंगल्यात गेल्यावर माझी नजर साहजिकच अमिताभ बच्चन ला शोधू लागली. पण तो काही दिसेना. म्हणुन मग मी तिथे उपस्थित असलेले यू एन आय वृत्त संस्थेचे प्रतिनिधी श्री सिद्धार्थ आर्य यांना विचारले, आर्यजी, अमिताभजी के घर मे खुद अमिताभजीही कही दिख नही रहे ? यावर आर्यजी उत्तरले, अरे भैय्या, दरवाजे पे हम्म लोगो का स्वागत किसने किया ? मी म्हणालो, वो तो सफेद कुर्ता, पायजमा पहने हूए एक लंबे आदमीने किया. यावर आर्यजी बोलले, अरे भैय्या वो ही तो अमिताभजी है ! मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की मी पडद्यावर दिसणाराच अमिताभ बच्चन, त्याच्या घरी दिसेल, अशा अपेक्षेत आहे. पण घरी, घरच्या वेषात असलेला, अजिबात फिल्मी मेकप न केलेला अमिताभ बच्चन मला ओळखूच आला नाही !

थोड्या वेळाने श्री मुलायमसिंह यादव आले. त्यांनी हॉल मध्ये प्रवेश करताच अमिताभ बच्चन त्याच्या वडिलांना आतल्या खोलीतून स्वतः व्हील चेअर वर ढकलत ढकलत घेऊन आला. ते पाहून मला अमिताभ विषयी अतीव आदर वाटला. कारण इतका मोठा सुपरस्टार ते काम, कुठल्याही नोकराला सांगु शकला असता. पण तसे न करता तो स्वतः वडिलांना घेऊन आला, यावरून त्याचे वडिलांविषयीचे प्रेम, आदर, अभिमान अशा कितीतरी उदात्त गुणांचे सहजपणे दर्शन घडले.
नंतर मुलायमसिंह यादव यांनी हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेशचा सर्वोच्च पुरस्कार, शाल, धनादेश प्रदान केला. त्यावेळी तेजी बच्चन, अमिताभ बच्चन हे छायाचित्रात आले. अवघ्या पाच मिनिटात कार्यक्रम संपला. काही भाषणबाजी नाही, की इतर काही औपचारिकता नाही !
एक विशेष बाब म्हणजे, त्या क्षणी जया बच्चन काही हजर नव्हत्या. तेव्हा असे कळाले की, सध्या अमिताभ आणि जया यांचे संबंध बिघडले असल्याने, त्या खाली उतरल्या नाहीत ! असो.
हॉल ला लागूनच असलेल्या लॉन वर भरपूर व्यंजने ठेवली होती. त्या सर्वांचा आस्वाद घेऊन, एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरल्याचा आनंद घेऊन तिथून आम्ही परतलो.
अल्प परिचय :-
हरिवंश राय बच्चन यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून १९३८ मध्ये इंग्रजी साहित्यात एम.ए. केले. त्यानंतर त्यांनी तिथेच १९५२ पर्यंत अध्यापन केले. त्याच वर्षी ते इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात संशोधन करण्यासाठी दाखल झाले. तेथून पीएच.डी प्राप्त करून ते भारतात परत आले.
हरिवंश राय यांनी १९२६ मध्ये श्यामा यांच्याशी विवाह केला होता. पण श्यामा यांचे निधन झाल्यामुळे ते १९४१ मध्ये तेजी यांचेशी विवाहबद्ध झाले. ते काही काळ राज्यसभा सदस्य होते. त्यांना अमिताभ आणि अजिताभ असे दोन पुत्र झाले. अमिताभ यांच्याविषयी आपल्याला खूप काही माहिती आहे. अजिताभ आणि त्याचा परिवार परदेशात स्थायिक झाला आहे.

हरिवंशराय बच्चन यांची ‘मधुशाला’ ही कविता खूप गाजली. या कवितेने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांचे मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के फूल, सूत की माला, मिलन, दो चट्टानें,आरती और अंगारे हे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत.
१९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार तर १९७६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता.
हरिवंश राय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ मध्ये निधन झाले. त्यांच्या ‘मधुशाला’ च्या काही ओळी वाचून आपण त्यांना अभिवादन करू या.
“मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला ।। ।
सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला ।। ।
जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला ।।।”

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
