Homeलेखसंगती रंग : ६

संगती रंग : ६

ईश्वराचा स्पर्श

मी परवा कारने पुण्याला गेले होते. कार सुरू झाली की ड्रायव्हरची मी मुलाखत घेत असते. कधीपासून ड्रायव्हिंग करता, घरी कोण कोण आहेत असे अगदी साधे प्रश्न असतात. त्यामुळे ड्रायव्हर नवखा आहे की काय , तो किती कुटुंब वत्सल आहे याची माहिती मिळत असते. कार चालवणारा अनोळखी ड्रायव्हर पैसे देऊन बोलावलेला असतो. अशी माहिती घेतलेली बरी असे मला वाटते. अधूनमधून बोलत राहिलं की त्या लोकांना झोप येत नाही हा देखील  एक उद्देश असतोच. त्यामुळे  थोड्या थोड्या गप्पा मारत रहाते मी.
इतकी सरावले इंजिनला ‘इंजेन’ असं सहज म्हणू लागले बघा मी. पीयूशी म्हणजे पी.यु.सी हे तत्काळ कळते मला. पार्किंगसाठी जागा  शोधताना ‘दाबायला’ ‘भेटत’ नाही कुठे असं म्हटल्यावर मी आता बिचकत नाही ! सहज तोंडात येणाऱ्या शिव्या हा भावनांचा उद्रेक असतो, ह्यावर तुमचेही दुमत नसेल.

तर, परवा मी असे नेहमीचे प्राथमिक प्रश्न विचारले. त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, होती किंवा मंदिरात केजपंचवीसएक वर्षे मी ट्रक चालवत होतो. रात्री बेरात्री  प्रवास आता झेपत नाही. घरात म्हातारी आई आहे. बायको एकटी किती बघणार ? मुलीची बारावीची परीक्षा आहे आता. तिचे दहावीचे वर्ष सुरू झाले तेव्हापासून मी बदलीचा ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे.”
मला हवी ती माहिती खरं म्हणजे मिळाली होती. पण ‘ट्रक ड्रायव्हर’ असं म्हटल्यावर मला आश्चर्य वाटलं. त्यामुळे संवाद सुरूच राहिला. म्हणाला,… “अठराव्या वर्षीपासून मी ट्रक चालवत आहे. तसं तर तेराव्या वर्षीच…  “मला जाणवलंच एकाएकी, विलक्षण असणार ह्याचं आयुष्य.
तो सहज सांगू लागला, त्याची कहाणी !

वयाच्या तेराव्या वर्षीच तो क्लीनर झाला. घरी गरीबी होती म्हणून आईने एका ट्रक ड्रायव्हरकडे ठेवलं. पडेल ते काम करेल हा, फक्त जेवण दिलं पाहिजे. ही बोली. ट्रक ड्रायव्हरकडे काम केल्यामुळे त्याला ट्रकबद्दल सगळे जाणून घेता आले. क्वचित ट्रक चालवावादेखील लागला ! गरीबीमुळे तेराव्या वर्षापासून अशी कामे करावे लागणे ह्याची साहजिकच मला  हळहळ वाटली.

टॉलस्टॉय म्हणतात ते किती खरे, सगळी सुखी कुटुंबं एकमेकांसारखीच वाटतात.‌ परंतु प्रत्येक दुःखी कुटुंबाची कथा ही आपापली वेगळीच असते. गरीबी, त्यामुळे असणारे हालसुद्धा व्यक्तिगणिक निराळे !

ट्रक ड्रायव्हर जिथे नेईल तिथे जायचे. खायला मिळेल ते खायचे. अंघोळ रोज मिळेल याची खात्री नसायची. तेरा वर्षाचं लहान, अल्लड वय. त्याची एकदा ट्रक ड्रायव्हर जवळ धुसफुस झाली. याने काहीतरी दुरुत्तर केलं . स्वतःच रुसून बसला. एवढंसं पोरगं माज करतंय, असं ड्रायव्हरला वाटलं.

वडापावची गाडी दिसली, मला हवाय वडापाव म्हणाला. ट्रक ड्रायव्हर म्हणाला खाली उतर आणि घेऊन ये. बरेच ट्रक तिथे थांबा घेऊन थांबले होते. वडापावच्या गाडीशी तो पोचला तेवढ्यात ट्रक ड्रायव्हरने ट्रक सुरू केला आणि सुसाट वेगाने नेला. काय होतंय ते ह्या तेरा वर्षांच्या क्लीनरला कळलंच  नाही.

हातामध्ये वडापाव घेऊन तो जवळच्या कट्ट्यावर बसला. ट्रक ड्रायव्हरने कुठे सोडले होते माहिती आहे ? दक्षिण बिहारमध्ये; आता ते झारखंड म्हणून ओळखले जाते ! मुंबईपासून सुमारे सतराशे कि.मी. दूर…
वर्षभर तो ट्रक चालकाबरोबर इकडून तिकडे हिंडत होता. धाब्याच्या, पेट्रोल पंपाच्या, दुकानाच्या पाट्या नुसत्या वाचत. भूगोल, नकाशा काहीही समजत नव्हते. किती लांब आलो आहोत याचीसुद्धा पुरेशी जाणीव नव्हती. नक्की कुठे आहोत, हे ठाऊक नव्हतं. संकट नेमकं किती भीषण आहे हेच मुळी  कळत नव्हतं.
हातात फक्त वडापाव. खिशामध्ये एखादा रुपयासुद्धा नाही. सोबत कोणी नाही. आई खूप लांब आहे एवढंच त्याला कळत होतं. डोळ्यात पाणी वहात होतं. तेवढ्यात एक माणूस आला .
“कहा से हो बच्चे ?
कौन है तेरे साथ ?“
त्याने विचारले. ह्याने तोडक्यामोडक्या शब्दात सांगितले. त्या माणसाला काय कळले माहीत नाही. पण बंबई- मुंबई कळले असेल.
“तुला आपण कुठे आहोत ते तरी माहीत आहे का ?” त्याने ‘नाही’ असे सांगितले.
“रांचीजवळ आहेस तू .. माझाही ट्रक जातोय, मुंबईला. चल तू माझ्याबरोबर.” तो त्याच्या भाषेत म्हणाला.
मुलं पळवणारी टोळी असते. मुलांना विकले जाते. अत्याचार होऊ शकतात. या गोष्टीची त्याला जाणीवच नव्हती. त्यामुळे भीतीच वाटली नाही ! फक्त मुंबई हा शब्द ऐकल्यावर तो निघाला. ट्रकमध्ये बसल्यावर त्याने गार झालेला वडापाव खाल्ला.

त्या भल्या माणसाने मुंबई पर्यन्तच्या प्रवासात त्याला स्वतःबरोबर खाऊ पिऊ घातले. मुंबईला आल्यावर हातामध्ये शंभर रुपये दिले.
“तुला जायला होतील. तुला तुझ्या घरी जाता येईल ना ?“
त्यानंतर देवासारखा भेटलेला तो ट्रक ड्रायव्हर त्याच्या कामाला निघून गेला . त्या भल्या माणसाचं नाव विचारावं हीसुद्धा त्याला समज नव्हती.
फार मोठ्या संकटात आपण सापडलो होतो हे त्याला वयाने  मोठं झाल्यावर लक्षात आलं !

कितीतरी संघर्षाच्या कहाण्या आपण ऐकलेल्या, वाचलेल्या असतात. पण तरीही असं काही ऐकायला मिळतं आणि थक्क व्हायला होतं.

अजाण वयात त्याला धडा मिळाला, तो त्याला आयुष्यभर आठवत राहील.  जगताना प्रत्येक टप्प्यावर त्याच्या परीने तो अन्वयार्थ लावत असेल.
‘अफाट जगती,
जीव रज:कण‘
हे तर खरेच. तरीही तो सुखरूप होता. करुणा भाकली नव्हती, धावा त्यानं केला नव्हता. तरीही ईश्वरानेच त्याला अलगद घरी आणून पोचवले होते, याची खात्री वाटते मला ! ईश्वराचे पाय न धरता, ईश्वरी हातांचा स्पर्श त्याला झाला होता ! मी त्याला मनोमन नमस्कार केला. ईश्वराचा स्पर्श झालेला, ईश्वर पाहिलेला माणूस आहे तो !

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments