भाग – १
संपूर्ण जग कोरोना लसीच्या पुरेश्या पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असताना लसीकरणासारखा विषय नुसता चर्चेत आला नसता तरच नवल ! बालकांच्या संदर्भात या बाबीचं महत्व विशद करताहेत, डॉ राजेंद्र चांदोरकर, एम डी, बालरोगतज्ञ …
जगात सगळीकडे कोव्हीड 19 लसीचं आगमन तर झालंय परंतु मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ न जमल्यामुळे लवकर होणं नितांत गरजेचं असलेलं कोव्हीड लसीकरण लांबणीवर पडत चाललं आहे. त्यातही लहान मुलांविषयी कोव्हीड 19 लसीच्या अनेक समस्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लसीकरण व कोव्हीड 19 लसीकरण यावर थोडा प्रकाश टाकणे आवश्यक आहे.
जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी लसीकरण हे शास्त्रीयदृष्ट्या प्रभावी अस्त्र आहे हे आज नव्याने सांगण्याची गरज नाही. देवी सारखा जीवघेणा आजार जगभरातून नामशेष करण्यास तसेच पोलिओ सारखा शरीराला व्यंगत्व आणणारा आजार जगभरातून जवळ जवळ नष्ट करण्यामागे लसीकरण व त्यामागची तपस्या दडलेली आहे हे मी सुरुवातीलाच नमुद करु इच्छितो.
मला वेगवेगळ्या लसींबाबत नेहमीच एक वेगळी उत्सुकता, आकर्षण व कौतुक वाटत आले आहे आणि त्यांचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांबद्दल व त्या निर्माण करणाऱ्या मंडळींबद्दल प्रचंड कृतज्ञता !!.. आम्हा लहान मुलांच्या डॉक्टरांच्या आरोग्य सेवेत प्रतिबंधात्मक उपचारांना फार महत्व असते. जन्मल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांत जंतुसंसर्गाने होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून सहीसलामत बचावलेली हि सशक्त बालकेच भावी सुदृढ नागरिक आणि मग सक्षम पालक होणार असतात.
त्या दृष्टीने आमूलाग्र सुधारणा घडवण्यात लसींचा सिंहाचा वाटा आहे. मूल बिचारे स्वतः चालत जाऊन लसी घेऊ शकत नाहीत, पालकांनी दिल्या तरच त्यांना त्या मिळणार !!… म्हणुन त्यांना त्या मिळवून देणे हे प्रत्येक पालकाचे आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं !!
लस हि संकल्पना येऊन एव्हाना शंभरेक वर्षे उलटली असतील. आमच्या दंडावर असलेले देवीच्या लसीचे गोल गोल व्रण व टी.बी.च्या लसीचा छोटा व्रण आम्ही किती भाग्यवान आहोत याचीच ग्वाही आम्हाला देतो. धनुर्वात, टायफॉईड, कॉलराच्या लसी द्यायला आरोग्यसेविका आल्या कि इंजेक्शनच्या भीतीने झालेली भागमभाग आजही आठवते. लसीकरण हा विषय सरकारने व पर्यायाने त्या काळातील बालरोगतज्ज्ञांनी एवढ्या संवेदनशीलतेने व गांभीर्याने मांडला व हाताळला होता कि योग्य वेळी केलेल्या जनजागृतीमुळे धनुर्वात, घटसर्प सारखे जीवघेणे आजार आजकाल औषधालाही सापडत नाहीत.
रेबीजची लस नसताना कुत्रं चावलं तर पहिली भीती असायची ती रेबीज या जीवघेण्या आजाराची आणि खात्रीने होणाऱ्या मृत्यूची !!…काही धडधाकट लहान/थोरांनी कुत्रं चावल्यानंतर प्रभावी लसीअभावी आपला जीव गमावल्याचे आम्ही ऐकलंय व डोळ्यांदेखत पाहिलंय सुद्धा !!…..परंतु आज या आजारावरच्या नवीन व प्रभावी लसीने रुग्ण शंभर टक्के वाचतो. कावीळ, कॉलरा व टायफॉईड इत्यादी ….दूषित अन्न, दूषित पाणी… खाण्या पिण्या मार्फत होणारे आजार…. खाण्या आधी हात धुण्याने, अन्न पाण्याच्या शुद्धतेच्या खबारदाऱ्या घेतल्याने, हॉटेल व बाहेरील पदार्थ खाणे टाळल्याने जरी हे आजार कमी प्रमाणात दिसत असले तरीही लसींना मात्र या सर्व गोष्टी पर्यायी मार्ग निश्चितच ठरू शकत नाहीत.
लसीकरण या विषयाकडे प्रथमदर्शनी, प्रात्यक्षिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर…. “पारंपरिक लसी” व “मॉडर्न लसी” अशा दोन प्रकारांत लसींची विभागणी करण्यात येईल.
पूर्वी घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, गोवर या आजारांनी मुलं ग्रासली जायची व पर्यायाने मृत्यूला कवटाळायची. तसेच पोलिओने पांगळेपणा यायचा. टी. बी.ची टांगती तलवार तर कायमचीच डोक्यावर असायची !!… या सहा घातक आजारांविरुद्ध सुरुवातीच्या काळात ज्या लसी आल्या व ज्या आजही प्रचलित आहेत त्या सर्व लसींना मी “पारंपरिक लसी” असे संबोधेन.
जगभरात सगळीकडेच त्या दिल्या जात होत्या व त्यातील काही मोजक्याच वगळता इतर आजही सगळीकडे दिल्या जातात. या सर्व लसी “युनिवर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम” च्या अखत्यारितल्या समजल्या जातात. कावीळ (हिपॅटायटीस बी), मेंदूज्वर व रोटा ची एव्हाना त्यात भर पडली आहे. या सर्व लसींचं वैशिष्ठय असं आहे कि अक्ख्या जगातील मुलांना त्या दिल्या जात असल्यामुळे (मुख्यत्वेकरून सरकार मार्फत) व अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनात सामिल असल्या कारणाने खुप खर्चिक/महाग नसतात. याच्याच विरुद्ध टायफॉईड, निमोनिया, कांजिण्या, स्वाईन फ्लू, एच.पी. व्ही, हिपॅटायटीस ए इत्यादी लसी या मॉडर्न लसी म्हणुन समजल्या जातात. यांपैकी संरक्षण मिळणारे आजार मात्र मॉडर्न किंवा नवीन नाहीत बरं का !… स्वाईन फ्लू व गर्भाशयाचा कर्करोग सोडला तर इतर सर्व आजार पारंपारिकच !!….
मग नेमकं काय वेगळंपण आहे या मॉडर्न लसींमध्ये????
तर…. या लसी तयार करण्यासाठी मॉडर्न तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या जगभरात कमी आहेत. ज्या लसी दिल्यानंतर बाळांना काही सौम्य अथवा क्वचित तीव्र स्वरूपाच्या रिऍक्शन्स येतात त्या सर्व नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन त्यापैकी काही लसी रिऍक्शन विरहित केल्या जातात. अशा लसींना “पेनलेस व्हॅक्सीन्स” असे संबोधले जाते व त्या घेण्याची “फॅडहि” नवीन जनरेशन च्या पेरेंट्स मध्ये आहे. खरं तर मुळात त्या पेनलेस नसतातच. त्यांचं प्रोमोशन तसं केलं जातं आहे असे म्हटले जाते. म्हणूनच म्हणावसं वाटतं कि “पेनलेस लस हे एक मिथ आहे“.
काही मॉडर्न लसींमध्ये बऱ्याच लसी एकत्र, एकाच0 सिरिंज/इंजेक्शन मध्ये देता येत असल्याने, कधी कधी चार/पाच/सहा लसी एकत्र दिल्याने मुलांना डॉक्टरांकडे कमी वेळा लसीकरणासाठी आणावे लागते. पर्यायाने मुलांना कमी वेळा टोचावे, प्रिक करावे लागते. सौम्य त्रास होणाऱ्या लसी तयार कारणासाठी वापरण्यात येणारे वाहक…….. (प्रोटीन्स व त्यांच्या एकंदरीत वापराचे तंत्रज्ञान), त्यांची साठवण, कोल्ड चेन, कच्चा माल, तयार लसी डॉक्टर व लाभार्थी यांच्या पर्यंत पोहोचवणे इत्यादी…….. इत्यादी……… )
सर्वसाधारणपणे महागडे असल्या कारणाने त्या लसींची किंमत वाढते. सध्याच्या युगात टाळता येण्याजोगे खर्च उदा. महागडी खेळणी, महागडे कपडे, उठ सूट हॉटेल मधले जेवण इत्यादी गोष्टी टाळून अशा प्रकारच्या लसी मुलांना देऊन आईवडिलांनी आपली जबाबदारी पूर्ण करावी असे सांगावेसे वाटते कारण ज्या लसी मी माझ्या मुलांना दिल्या त्याच माझ्याकडे येणाऱ्या इतर सर्व चिमुकल्यांना देण्याचं उद्दिष्ट मी सदैव ठेवत असतो.
आता बालरोगतज्ञ प्रॅक्टिशनरच्या भूमिकेतून मला काय वाटतं ?…. लहान बालकांना पहिल्या दिवशी मिळणारी पहिली लस म्हणजे, “कॉलस्ट्रम“…म्हणजेच प्रसूतीनंतर मातेस येणारं “चीकदूध“!!… प्रतिकारशक्ती वाढवणारे अनेक पदार्थ, अँटीबॉडीज, पेशी त्यात असतात. उगीच का पूर्वी सिनेमांत एक डायलॉग असायचा…….हिरो व्हीलनला म्हणायचा, “अगर माँ का दूध पिया हैं तो सामने आ,
“…तर कॉलस्ट्रम हि माझ्या मते स्वस्त व मोफत मिळणारी पहिली लस असुन सर्व लहानग्यांचा त्यावर जन्मसिद्ध हक्क आहे. त्यानंतर मात्र ….आधी नमुद केल्याप्रमाणे पहिल्या फळीतील सर्व लसी नक्कीच घ्याव्यात. सरकारीं रुग्णालयांत तर त्या मोफत मिळतात. त्या म्हणजे पोलिओ, बी.सी.जी, हिपॅटायटीस बी, ट्रिपल, गोवर, गालगुंड व जर्मन गोवर.
यानंतरच्या फळीत आहे हिपॅटायटीस ए, टायफॉईड, कांजिण्या, मेंदूज्वर, न्यूमोक्कोकल…… या लसीही जरूर घ्याव्यात. थोडी पदरमोड करावी लागेल पण त्या नक्कीच गुणकारी आहेत. मेंदुज्वरची मेनिंगोकोक्कल लसहि तशीच महत्वाची व तितकीच गुणकारी.
इतर काही लसींची शिफारस हि वेगवेगळ्या भौगोलिक प्रांतानुसार केली जाते. उदा. जापनीज एनसिफायलायटिसची लस. अशा प्रकारच्या काही लसी सरसकट सर्वांनाच देण्याची गरज नसते. तसेच आपण जगातील एखाद्या वेगळ्या प्रांतात जात असु तर तेथे प्रचलित असलेल्या आजारांविरुद्ध लस घेणे अनिवार्य ठरतं उदा. येलो फिवर ची लस (तुम्ही साऊथ अमेरीकेत अथवा अफ्रिकेत जात असाल तर) आणि मेनिंगोकोक्कल ची लस (तुम्ही नॉर्थ अमेरिकेत जात असाल तर) अशा प्रकारच्या काही लसींबाबतीत डॉक्टरांचा सल्ला फार महत्वाचा ठरतो.
आता रोटाव्हायरल, गर्भाशयाचा कर्करोग आणि फ्लू लसींबद्दल… या लसी घेतल्यामुळे तोटा तर नाही मात्र खर्चाच्या मानाने त्याचा फायदा किती याची डॉक्टरांबरोबर चर्चा होणे तितकेच गरजेचे आहे. अशा परिस्थितीत पालकांनी निर्णय घेणं गरजेचं होऊन जातं. असे निर्णय जेव्हा आम्ही पालकांवर सोपवतो तेव्हा त्यामागची आमची भूमिका आपण सर्वांनी समजुन घेणं गरजेचं असतं. आम्ही पालकांना संभ्रमात टाकत नसतो तर चर्चा करुन लसीकरणाच्या फायद्याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करत असतो.
काही लसी या पौगंडावस्थेत (डांग्या खोकला, कांजिण्या इ.) गर्भावस्थेत (धनुर्वात ) देणं गरजेच्या असतात. मुलींसाठी काही मोजक्याच लसी खुप महत्वाच्या असतात ( गर्भाशयाच्या कर्करोगावरील एच.पी.व्ही, रुबेला इ. ) तसेच ज्या व्यक्तींना प्रतिकारशक्ती कमी असणारे आजार असतात त्यांना विशिष्ठ लसी घेणं अनिवार्य असतं ( उदा. दमा, डायबेटीस, किडनीचे विकार, एच. आय.व्ही, सिकल सेल ऍनेमिया इत्यादि आजार)…परंतु या सर्व बाबतीतही वैद्यकीय सल्ला फार मोलाचा ठरतो. “गुगल सर्चच्या गुंत्यात न अडकता डॉक्टरी सल्ला आरोग्याच्या सफलतेची गुरुकिल्ली आहे”, असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही !!.
आज मलेरिया, डेंग्यू, लेप्रसी, एड्स इत्यादी आजारांवर लवकरात लवकर प्रभावी लस येणं गरजेचं आहे. सध्या सर्वांना हैराण करुन सोडलेल्या कोविड 19 या जीवघेण्या आजाराविरुद्ध लसीची जितकी गरज आहे किंबहुना तितकीच गरज बी.सी.जी व्यतिरिक्त अजुन एखाद्या टी.बी.वरिल अत्यंत प्रभावी लसीची
आहे.
सर्व वैद्यकीय निकष व चाचण्या, काही अटी व नियम, काही वैद्यकीय बंधनं तसेच लसीचे दुष्परिणाम या सर्वांचा सखोल विचार केल्यास एखादी लस वापरात येण्यासाठी किमान दोन-अडीच वर्षे लागतात. आज जगभरात विविध कंपन्यांच्या व विविध देशांतील सरकारच्या पुढाकाराने युद्धपातळीवर कोविड 19 विरोधी लस निर्माण करण्याचे प्रयत्न व धडपड चालु आहे. कोविड 19 वरील लस मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायची तेव्हा होवो परंतु सद्यपरिस्थितीत ज्या लसी उपलब्ध आहेत त्यांचा पुरेपूर लाभ उठवुन एक नवी निरोगी पिढी उभी करणं हे मात्र आपल्याच हाती आहे.
कोरोनाच्या येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या “फ्लू” च्या लसीची मीडिया मध्ये, पालकांमध्ये जोरदार चर्चा चालु आहे. सांगण्यासारखं महत्वाचं म्हणजे
फ्लूची लस घेऊन फक्त कॉमन फ्लू व स्वाईन फ्लू पासून आपण मुलांचं रक्षण करु शकतो. हे सिझनल फ्लूचे प्रकार पावसाळ्यात खुप दिसून येतात. लस घ्यायला काही हरकत नाही परंतु चार मुख्य बाबींकडे सर्वांनी लक्ष द्यावे….. पहिल्यांदा या लसीचे एक महिन्याच्या अंतराने दोन डोसेस घ्यावे लागतात. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक डोस. लस थोडी महाग आहे, हि लस कोव्हीड पासून मुलांचा बचाव करु शकत नाही आणि आपल्या देशासाठी दक्षिण वि्षुवृत्तीय लस घ्यावी लागते.
लसीकरण करताना लहान मुलांचे डॉक्टर हे मुलांच्या आणि पालकांच्या हिताचाच विचार करत असतात व त्यांच्या हितातच स्वतःचं हित शोधत असतात…. आणि हिच खरी वस्तुस्थिती व सत्यता आहे याची ग्वाही या लेखाद्वारे मी आज येथे देत आहे.
पुढील लेखात आपण कोव्हीड 19 लसीचा आढावा घेऊयात !!

– लेखन : डॉ राजेंद्र चांदोरकर, एम डी, बालरोगतज्ञ
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.