Homeबातम्यापुस्तकांची नदी !

पुस्तकांची नदी !

“वाचाल तर वाचाल”, या बोधवाक्यावर वाढलेली आमची पिढी. आजूबाजूला वातावरणही तसेच असायचे. वाचनालयांत उत्तम पुस्तके, लोकप्रिय झालेली पुस्तके.. यांच्यासाठी प्रतीक्षा यादी असे. मोठी माणसे, मुले यांची नेहमी चर्चा होई, नवीन आलेल्या पुस्तकाविषयी ! दिवाळीच्या पहाटे, अभ्यंगस्नान करून, वाचनालयात धाव घ्यायची, कारण सकाळी ६ वाजतां दिवाळी अंक देणे सुरु व्हायचे. ७/८ टेबले जोडून त्यावर मांडून ठेवलेले अंक, रांगेतून मुखपृष्ठ बघण्याची सर्वांची उत्सुकता आणि हवा तो अंक मिळाला की झालेला अपरिमित आनंद! आजही ते दृश्य डोळ्यांसमोर जसेच्या तसे आहे.

सोशल मिडियाने क्रांती केली जगांत सारीकडेच. जसजशी विविध चॅनेल्स अस्तिवात आली तसतसे लोकांचे वाचन कमी होऊ लागले. आधी नाविन्य नि आता गरज…. गुगलबाबा सर्वांचा गुरु झाला. शिक्षणापुरतं वाचणारी पिढी निर्माण झाली. लहानपणी खूप वाचणारी मुले, आई बाबा म्हणून मुलांपुढे वाचनाचा आदर्श नाही ठेऊ शकली. आत्ता घरी, दारी, इतकंच नव्हे तर रस्त्यांत, बसमध्ये ट्रेनमध्येही, ज्याची त्याची मुंडी खाली. म्हणजे जो तो मोबाईल मध्ये वाचतोय कांहीतरी ? पटापट लिहीतही आहे? पण काय? आता जोडीला व्हाट्सअँप गुरु.
खरे खोटे न पहाता, आली पोस्ट की अभिप्राय लिहायचा, लाईक्स करायचे नि पुढे धाडून द्यायच्या पोस्ट्स. वाचन संस्कृती लोप पावत आहे असे नुसते पिंक टाकल्यासारखे बोलून पुन्हां मोबाईलमध्ये डोके खुपसून चालणार नाही. त्यासाठी उपाययोजना करावीच लागेल. पालकांनी स्वतः मुलासमोर वाचनाचा आदर्श ठेवावा लागेल. पूर्वीच्या घोषणेत थोडी सुधारणा करून,” सकस वाचाल तर वाचाल”, असे म्हणायला हवे. मुलांची पाठ्यपुस्तके पाहिलीत तर कोण महाभाग, कोणाच्या वशिल्यासाठी नीरस धडे, बोजड कवितांची निवड करतात हे तपासून पहायला हवे. ही निवड पद्धती वाचनाच्या आवडीवर कुऱ्हाड चालविते बालपणीच.

आज ४० वर्षांनंतरही आम्हांला आमच्या शाळेतील कविता आठवितात आणि आज त्या कां नाहीत ? कोणाचा उदोउदो करण्यासाठी, निवडसमिती (?!!) बोजड शब्द मुलाच्या माथी मारते यांत लक्ष घालणे जरुरीचे आहे. तरुण पिढी वाचत नाही, असा आक्षेप सतत घेतला जातो. पण तरुण पिढीने वाचावं, अशी वाचन-संस्कृती आपण त्यांच्यात रुजवलीय का? तसेच नव्या पिढीची मानसिकता ओळखून त्यांच्या सोयीने पुस्तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागेल. त्यासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची साधने वापरावी लागतील. असे केले तरच वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होईल. वाचनचळवळीला खरी गतिमानता प्राप्त होईल.

“वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे, रसिकत्व”..वाचन म्हणजे फक्त मनाचा विरंगुळा नव्हे, तर ते आत्मशोधाचे आणि बोधाचे प्रभावी साधन आहे. वैज्ञानिक युगात तंत्रज्ञानाच्या विविध करामती अधिक प्रभावीपणे समोर येणार आहेत, अशा वेळेस मानवाला चतुरस्र होण्यासाठी मनाची मशागत करण्यासाठी बुद्धीला अधिक खाद्य पुरवण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. खरंच, काय करायला हवंची?

वाचनाच्या विविध फायद्यांचा विचार करूनच अमेरिकासारख्या प्रगत देशांनी शालेय अभ्यासक्रमात युद्धपातळीवर वाचन चळवळ सुरू केली आहे. सोशल मिडियाचा वापर तरुणांमध्ये वाचनाभिरुची रुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा.मराठीत तो होतो, नाही असं नाही; पण त्यात ‘टेक्स्ट’चं प्रमाण खूप आहे; आणि त्यातही फारशी कल्पकता नसते. हल्लीचे तरुण मोबाइल, नेट सेव्ही आहेत. त्यामुळे पुस्तकं मोबाइल-बुक, इ-बुक या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली, तर त्याचा उपयोग होऊ शकेल. तसेच व्हिडिओ माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायला हवा. कारण तरुण मुलं ‘टेक्स्टपेक्षा व्हिडिओ अधिक प्रमाणावर पाहतात. हा एक खूप मोठा चर्चेचा विषय आहे. पण जगभर यांवर विचारमंथन केले जात आहे, कधी संस्थामार्फत तर कोणी वैयक्तिक पातळीवरही.

उदाहरण सांगायचे तर, ऐकायला कदाचित वेगळं वाटेल, मूळ स्पॅनिश असणाऱ्या अवलिया Luz Interruptus या माणसाची ही अफलातून कल्पना. एरव्ही रस्त्यांवर गर्दी, गोंगाट, वाहने, वर्दळ, असतेच. या रोजच्या कोलाहलात हरवून जाणाऱ्या समाजाला काहीतरी वेगळं द्यायला हवं या कल्पनेतून हा प्रकल्प साकार झाला. सहा वर्षांपूर्वी एक दिवस एक रस्ता पूर्णपणे हजारो पुस्तकांनी भरून त्यावर छोटे छोटे लेड लावून पुस्तकांची नदी तयार केली आणि ती पुस्तक नदी वाचकांसाठी खुली करून दिली.यांस लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्याला मदत करणारे शेकडो हात पुढे आले.आता दरवर्षी ही कल्पना राबविली जाते. यात साधारणपणे लोकांनी दान केलेली पुस्तके घेऊन त्यांची रस्त्यावर आकर्षक मांडणी केली जाते. पुस्तकांत छोटे छोटे लेड लाईट्स लावून त्यातून ज्ञानरुपी प्रकाश पडतोय असं रूपक तयार केलं जातं. साधारणपणे १०/१२ हजार किंवा त्यापेक्षा जास्त पुस्तके तिथे मांडली जातात. पूर्ण तयारी झाली की ही पुस्तक नदी सामान्य वाचकांसाठी खुली केली जाते. आणि मग गरजू वाचक ती पुस्तके चाळून आपल्याला हवी ती पुस्तके घेऊन जातो.

सायंकाळी पुस्तकांच्या पानांवर लावलेले लेड प्रकाशमान केले जातात आणि पुस्तकांची उघडलेली शुभ्र पाने जणू काही एखादी फेसाळती नदी वहावी असा माहोल उभा करतात. लोक येतात, बघतात आवडती पुस्तके घेऊन जातात. उपक्रमानंतर शहरांत सगळी फूड कोर्ट्स, रेस्तराँ मध्ये हातात पुस्तकांचे गठ्ठे घेऊन चर्चा करत बसलेली, वाचत बसलेली लोकं हे नजरेस सुखावणारे दृश्य असत. कांही तासातच पुस्तके संपलेली असतात त्यामुळे कांही कचरा रहात नाही. पुस्तकांशिवाय कोणतेही सामान वापरले जात नाही, त्यामुळे प्रदूषण होण्याची, नंतर कोणत्याही कारणास्तव वाहतुकीला अडथळा येण्याचा सम्भव रहात नाही. मध्यरात्री, हा रस्ता पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामा होता. लिटरेचर विरुद्ध ट्रॅफिक (Literature vs traffic) असे नांव असलेल्या या प्रकल्पाच्या प्रचंड यशापासून प्रेरणा घेऊन जगभरातील बऱ्याच प्रमुख शहरांत हा उपक्रम राबवला जात आहे.

आपणही प्रेरणा घेऊन अशा प्रकारची भन्नाट कल्पना राबवायची कां ?

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments