Homeलेखयुवर ऑनर ….

युवर ऑनर ….

महोदय, पुनश्च विनंती वजा निवेदन देण्याचे कारण तोच विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधी सर्व प्रथम न्यायाधीश महोदयांच्या घराच्या आवारात लाखो रुपयाच्या जळलेल्या नोटा सापडल्या तेव्हाही आम्ही पोट तिडीकेने लिहिले होते त्यावर. सामान्य नागरिकाला वेगळा न्याय अन् न्याय देणाऱ्या न्यायाधिशांना वेगळी वी आय पी ट्रीटमेंट ? असा पक्षपात का? एव्हढा साधा प्रश्न होता आमचा. यांना सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने दोषी ठरवले,त्यांचे काम काढून घेण्यात आले, प्रकरण संसदेत गेले.महाभियोगाची तयारी सुरू झाली.तेव्हा हे वी आय पी महोदय राष्ट्रपती कडे राजीनामा देऊन मोकळे झाले! राजीनामा दिल्याने ते आता मोकाट सुटतील. नियमाप्रमाणे त्यांना भरघोस पेन्शन मिळेल हयातभर. या लाचारीला, कोडगेपणाला काय म्हणायचे युवर ऑनर ?

याच न्याय संस्थेवर पाठ्य पुस्तकात काही विपरीत (?) लिहून आले म्हणून त्या तद्न्य समितीच्या सदस्यांवर आपणच कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत,? असे काय चुकीचे लिहिले होते त्यात ? सत्य स्पष्टपणे कथन करणे हा न्यायालयाच्या दृष्टीने गुन्हा आहे का महोदय ? का त्या पाठ्य पुस्तकात धाडसी सत्य विधान करणाऱ्यावर कारवाई ? काय चुकीचे लिहिले त्यांनी ? अन् पुढच्या पिढीला इतके हलक्या कानाचे समजू नका तुम्ही. आता सोशल मीडियाच्या काळात, माहिती जाळाच्या धबधब्यात पोहणाऱ्या नव्या जेन झी ला सारे काही समजते. तेही उघड्या डोळ्यांनी बघतात, ऐकतात आजूबाजूला काय चालले ते.. अन् वरच्या प्रतिष्ठित खुर्चीवर बसलेली मंडळीच आपल्या पाठीमागे लिहिलेल्या सत्यमेव जयते कडे अशी डोळेझाक करणार असतील, अन् तुम्हा सर्वांचा, म्हणजे त्यांच्या सहकाऱ्यांचा याला पाठिंबा असेल तर आम्ही सामान्य नागरिकांनी काय समजायचे ?

संविधान, न्याय पालिका, संसद, यावर अजूनही या लोकशाही देशातील नागरिकांची श्रद्धा आहे युवर ऑनर. अजूनही आम्हाला वाटते,सर्वांना समान न्याय मिळावा. कायदा सर्वासाठी सारखा असावा. गुन्हेगार हा गुन्हेगारच म्हणवला जावा. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोक प्रतिनिधी, न्यायाधीश .. कुणी कुणीही याला अपवाद असू नये. न्याय पालिकेसाठी कुणी कोणत्याही पदावर असला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात त्याला तीच वागणूक दिली जावी, जी सामान्य माणसाला, गुन्हेगाराला दिली जाते.कारण कुणी कोणत्याही मोठ्या पदावर गेला, कोणत्याही मानाच्या खुर्चीत बसला तरी, त्याचा तोल जाणे, त्याने घसरणे, स्वाभाविक आहे.

आज मोठमोठ्या बलाढ्य देशाचे राष्ट्र प्रमुख कशी दंडेलशाही करतात ते बघतोच आहोत आपण. आज युद्धात मारले जाणारे सामान्य नागरिक, ते कोणत्याही देशाचे असले तरी..ते निरपराध आहेत. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही. तो खून आहे. युद्ध पुकारणारे हत्यारे आहेत. त्यांना शिक्षा व्हायला नको ? काय म्हणतो कायदा? काय सांगते संविधान ? अन् त्यात तसे काही चुकीचे असेल, ज्यामुळे तुमचे हात बांधले गेले आहेत,असे अन्यायकारक काही असेल, तर बदला ते कायदे. बदला ती संविधानातील कलमे. सांगा संसदेला संशोधन करायला त्या अन्यायकारक कायद्यात. द्या सर्वांना समान न्याय.
डॉ बाबासाहेबांनाही हेच अपेक्षित असणार. ते समतेचे पुरस्कर्ते होते ना ? त्यांनाही हे जे काय चालले आहे ते पटणार नाही कधीच. कुणी मोठ्या पदावर बसले म्हणून कसेही वागायचे, तर काहीही गैर वर्तन करायचे, अन् कायद्याचे संरक्षण घेऊन सही सलामत सुटायचे हे यापुढे चालता काम नये.

नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे ही असले आदर्श शिकवणार आहोत का आपण नव्या पिढीला? एपेस्टिन फाईल मध्ये गुंतलेले आदर्श ठेवणार आहोत का आपण उद्याच्या नागरिकांना, जेन झी ला ?

सत्ता, खुर्चीच्या अधिकाराने मिळालेले संरक्षण,लोक प्रतिनिधी हा ठप्पा लागला की हाती आलेले अधिकार या नावाखाली कायद्याची चालू असलेली पायमल्ली थांबली पाहिजे आता.भ्रष्टाचारात खुलेआम पकडले गेलेले कुलगुरू किंवा तत्सम अधिकारी, लोक प्रतिनिधी सर्रास उघड्या तोंडाने समाजात वावरतात. कायद्याची तोडमोड करून, जामीनावर मोकाट सुटतात. तेच कायदे करणाऱ्या भवनात मानाने स्थानापन्न होतात. गुन्हा सिद्ध झालेला स्पष्ट दिसत असताना त्यांना पेन्शन मिळते जन्मभर. काही शिक्षा नाही, दंड नाही. आरोप नाही.. हे सारे समाजात उजळ माथ्याने मिरवायला मोकळे !

हे न्याय्य आहे का युवर ऑनर, तुम्हीच सांगा, तुम्हीच ठरवा… आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला आव्हान करून ठरवा काय ते. आहेत त्या कायद्यामागे पळवाट शोधून हात झटकू नका प्लीज युवर ऑनर !

न्यायाधीशांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. काहींचे निर्णय वादग्रस्त, संशयास्पद ठरले आहेत. मोठमोठे लाखोत फी घेणारे वकील, अन् त्यांचे ठरलेले बेंच, त्यातील हितसंबंध यावर सर्रास बोलले जाते.त्यात खरे किती खोटे किती हे आम्हालाही समजत नाही. त्यावर भाष्य करणेही योग्य नाही. पण आग असल्याशिवाय धूर येत नाही हेही तुम्ही मान्य कराल ना ?

आम्हाला यातले फारसे काही कळत नाही. कायद्याचे सखोल ज्ञान आम्हाला नाही. आमची एकमेव पूंजी म्हणजे आमचा कॉमन सेन्स ! त्याच आधारावर हे लिहिण्याचे धाडस केले. एक धडा शिकविणारी केस समोर आहे. तुमच्या पैकीच एकजण तुमच्या हातातील संविधान, कायदे कानून यातले लूप होल्स बघून पळवाट शोधतो आहे. यासाठी तुम्ही काहीतरी केले पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. हवा तितका वेळ घ्या. काय करायचे ते करा. पण भारतात हा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही हे ठणकावून सांगा प्रत्येकाला. तरच नागरिक सावध होतील. तरच त्यांना न्याय संस्थेबद्दल आदर वाटेल. तरच त्यांना तुमचाही अभिमान वाटेल.मग आज त्या पाठ्य पुस्तकात जी काही विधाने आलीत, तसे पुन्हा लिहिण्याचे कुणी धाडस करणार नाही. आम्ही अभिमानाने तुमच्या आरत्या गाऊ.. ही असे पुन्हा लिहिण्याची आमच्यावर किंवा आणखीन कुणावर वेळ येणार नाही. तेव्हा एवढे प्लीज कराच युवर ऑनर !

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr. Surekha Vivek Joshi on जिचं तिचं आकाश : 23
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 3
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 3
स्वाती देशपांडे on माझी जीवन नौका : 2
मृदुला राजे on पुस्तक परिचय
Dr. Surekha Vivek Joshi on माझी जीवन नौका : 3
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : 3