पालकत्वाचे आव्हान
आपल्या बालपणाची तुलना करत पालक मुलांना मोठं करण्याचा प्रयत्न करतात. त्यात आता मोबाईल संस्कृती मुळे पालकांपुढील आव्हाने वाढतच आहेत. पालकांनी नेमकं करावं तरी काय सांगताहेत बालकांच्या मानस शास्त्रात पी एच डी केलेल्या,
मुख्याध्यापिका डॉ अंजुषा पाटील…
प्रत्येक माणूस स्तुतीप्रिय असतो. त्याप्रमाणे लहान मुलांनाही आपली स्तुती केलेली आवडते. कधी कधी पालक मुलांना चार चौघांसमोर “गधड्या एवढा मोठा घोडा झालास”? याप्रमाणे अपशब्द सहजपणे बोलून जातात. त्यामुळे नकळत मुलांचा अपमान होतो. मुलं एकतर दुःखी कष्टी होतात किंवा कोडगी बनतात.
पण सुजाण पालक असे अपशब्द न वापरता मुलांशी जवळिक साधून चांगल्या प्रकारे संवाद साधतात. तुम्ही म्हणाल “आम्ही नाही का ऐकत होतो आमच्या पालकांची बोलणी” ? तुम्ही आम्ही ऐकत होतो पण आजची मुलं ऐकणार नाहीत. आज आपल्या वेळी होती त्यामानाने आत्ताची परिस्थिती बदललेली आहे. मुलांच्या गरजा, छंद, खेळ, आवडीनिवडी सगळं काही बदललेलं आहे. मुलांना पालकांपेक्षा अनेक कौशल्य अवगत आहेत. मग ती सोशल मिडिया विषयी असू दे किंवा इतर क्षेत्रात, पण आजची मुलं ही स्मार्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या कलाने घेऊन, आत्मपरिक्षण करून आपली कृती व शिकवण बदलली पाहिजे.
आजच्या धकाधकीच्या समाजव्यवस्थेत आपल्याला नवीन पिढीला नवीन शिदोरी द्यायची आहे ती म्हणजे सुरक्षितपणाची भावना. तसेच मुलांशी विचारपूर्वक बोलणे आणि वागणे कारण आपल्या बोलण्यातून, वागण्यातून आणि भावनेतूनच मुलांवर संस्कार होत असतात.
मुलं अनुकरणप्रिय असतात. त्यांच्यासमोर आदर्श वातावरण असलं पाहिजे. “तू अगदीच ठोंब्या आहेस” असं वडील मुलाला म्हणाले कि ते मूल आईकडे जास्त आकर्षिले जाते. बाबांची कधीकधी अनामिक भिती वाटू लागते. संवाद कमी होतो. आईला मध्यस्थी व्हावं लागतं. काही उदाहरणं आपल्या आजुबाजुला घडत असतात. छोट्या रिमाने खेळातल्या घोड्यावर बसताना खिळ्यात अडकून नवा फ्राॕक फाडला. संध्याकाळी आॕफिसमधून आल्यावर वडील म्हणाले “लायकी नाही कार्टीची भारी कपडे घालण्याची”. काही दिवसांनी दिवाळी आली, पणत्यांमध्ये तेल ओततांना आईच्ये नव्या साडीवर तेल सांडले, रिमा लगेच म्हणाली, “लायकी नाही आईची नवीन साडी नेसण्याची” आईबाबा आपलं वक्तव्यं विसरून एकमेकांकडे बघतच राहिले.
घर हिच संस्काराची पाठशाळा आहे. घरातील मोठ्या माणसांच्या बोलण्यातून, वागण्यातूनच मुलांवर संस्कार होत असतात. संस्कार हे आदर्श व परिणामकारकच व्हायला हवेत. सर्वांनी याचं भान ठेवायला हवे. कधी कधी पालकांनी मुलांचं ऐकलं पाहिजे. त्यांना काहितरी सांगायचं असतं. पण आपल्याला वाटते मुलांचं दररोज ऐकलं तर ती हट्टी बनतील व त्यावर दुर्लक्ष केलं जाते. मुलांना अभिव्यक्तीद्वारे मोकळा श्वास घेऊ दिला तर त्यांचं मानसिक आरोग्य निरोगी राहिल.
जीवनाला पायाभूत होणारी मूल्य म्हणजे संस्कार. थोडक्यात काय तर, आजच्या या स्पर्धेच्या, असुरक्षिततेच्या, प्रदूषणाच्या समाजात आपली मुलं कोसळून पडू नयेत तर जीवनसंघर्षात चिवटपणे, खंबीरपणे, आत्मप्रतिष्ठा राखून ताठ उभी राहावीत ह्यासाठी द्यावी लागणारी शिकवण होय.
जनरेशन गॕप राहणारच असं म्हणून गप्प राहून चालणार नाही. बदलती सामाजिक मूल्य, बदलणारी वस्तूस्थिती, बदलत्या गरजा लक्षात घेऊन आत्मपरिक्षण करण्याची आज पालकांना आवश्यकता आहे. शिक्षक हे प्रशिक्षित पालक आहेत आणि पालक हे अप्रशिक्षित शिक्षक आहेत. आधीच स्वतःला प्रत्येक घटकाने समजून घेऊन मगच मुलांना समज दिली पाहिजे. आपण यातल काहीच करत नाही. त्यामुळे पालक व मुलं यांच्यात संघर्ष होत राहतो. पालकांच्या कृतीतून मूल आपोआप शिकत जाते. त्यावर आयुष्यभर संस्कार होतच असतात. फक्त वयाच्या विशिष्ट टप्प्यावर काही अनुभव व विचारांची प्रगल्भता आलेली असते.
लवकर उठण्याच्या सवय लावण्यासाठी आईवडीलांनी सुरूवातीला लवकर उठून पक्ष्यांची किलबिल, उगवत्या सूर्याची किरणं, शूद्ध मोकळ्या हवेचा श्वास, आईचं रांगोळी काढणं किंवा सकाळची छोटी छोटी गमतीदार कामं अशा वेगवेगळ्या गोष्टींचा सुखद अनुभव दिला तर त्याला लवकर उठण्यात आनंद वाटेल. आता तेवढा वेळ मिळत नसला तरी अवघड नाही.
मुलगा मुलगी एकसमान असलं तरी मुलाला मुलगा म्हणून व मुलीला मुलगी म्हणून वाढवल पाहिजे. तशीच अनुरूप वेशभूषा करावी. लहान पणापासून शाळेत गेल्यावर वाचता येऊ लागलं कि वाचनाचे संस्कारृ घरात सहज घडले पाहिजेत. चांगल्या पुस्तकांचे योग्य वयात वाचन झाले तर मुले बहुश्रुत होतात. वेळेचा सदुपयोग होतो. मुलांबरोबर घरातल्या सदस्याँनीही वाचन केले पाहिजे.
आचार, विचार, आदर्श वर्तन, प्रेम, आपुलकी असे भावनिक संस्कार घरातच होऊ शकतात. याची जाणीव ठेवून लहान मुलांबरोबर जाणून बुजून खेळणे, भातुकलीचं जेवण जेवणे, झोपताना गोष्टी सांगणे यामुळे मुलांचं भावविश्व वृद्धिंगत होऊन त्यांना सुरक्षित वाटते.
पालकांच्या इतकाच किंवा काकणभर जास्तच शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा मुलांवर उमटतो. हा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. मुलं शिक्षकांचं अनुकरण करतात. आजचे शिक्षक नीटनेटके, अभ्यासू, तंत्रस्नेही व काळाची पावले ओळखून मुलांना शिक्षण व संस्कार घडवतात. अनेक आव्हानं स्विकारतात व योग्य दिशा दाखवतात. हे संस्कार त्यांना भविष्यात उपयोगी पडतात.
श्रमसंस्कार, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, राष्ट्रीय मूल्यसंस्कार घेऊनच मुले बाहेर पडत असतात. मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याला प्रेम, माया, ऊबदार घरटं व संस्कारी वातावरण मिळवून देणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे. त्यातूनच मुलांना निर्भयता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, उसर्जनशीलत हे संस्कार मिळतात. मुलांना गृहित धरू नये. त्यांना मतं असतात. मूलं आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेलं नाही. आजची मूलं तेजस्वी व हुशार आहेत. ती माणसांची प्रतिनिधी आहेत. शर्यतीतले घोडे नाहीत.
मुलांचे छंद, कल, त्यांची क्षमता यांचा वेध घ्यावा. आपल्याच पावलावर पावलं टाकत त्यांनी चालावं असा आग्रह धरू नये.
आयुष्याला पायाभूत ठरणारी मूल्य म्हणजेच संस्कार आणि हे संस्कार कसे केले तर ते परिणामकारक ठरतील ह्याचं उत्तर एका मुलाच्याच शब्दात…
Tell me, I may foget
Show me, I may Remembar
Involve me, I Will Learn.

– लेखन : डॉ. अंजुषा पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
मुलांना वाढवताना पालकांनी कसं वागावं हे छान विशद करून सांगितलं आहे तुम्ही…आत्ताची पिढी स्मार्ट ही गोष्ट तर खरीच….धन्यवाद 🙏