Homeलेखसंगती रंग : १९

संगती रंग : १९

“हे घरची माझे विश्व !”

मैत्रिणीसोबत मी माईंकडे गेले होते. तिची खूप इच्छा होती, ”तू बघच एकदा माईंना.”
माई स्वतः दार उघडायला आल्या. आम्ही गेल्यावर लगेचच माईंनी ग्लासमध्ये पन्हे आणले.
“मला ऊठ बस फार जमत नाही ना. म्हणून आधी केलं हो आदरातिथ्य. उन्हातून आल्या आल्या पाणी चांगलं नाही. पन्हं चालेल. हो ना ? “

पन्हं इतक्या सुरेख रंगाचं त्यात केशर काडीची शोभा. घोट घेताच,
“किती छान झालं आहे, पन्हं !” सहजच आलं तोंडात.
” माझ्या मुलाला मुरांबा आवडतो. नातीला छुन्दा ! मग काय कोयी उरल्या. उकडल्या. भरपूर झाला गर. आवडतं सर्वांना उन्हाळ्यात पन्हं. उन्हाळा लांबलाय त्यामुळे पन्हं हवंस वाटतं .”
” ह्या वयात तुम्ही करता ! “
” सकाळी बाई येते कामाला. ती सगळी चिराचिरी करते , किसून देते. तिनं पसाराही आवरायचा. मी आपली देखरेख करते. दादागिरी असते माझी. आटव जरा पाक, कोयीला गर जास्त ठेव, पन्हं करायचं आहे. अशा माझ्या सूचना. हेच माझं काम.”
“ सगळं बाजारात मिळतं हल्ली…पण घरचं ते घरचं.” माझ्याबरोबर असलेली मैत्रीण म्हणाली.
” फायदे खूप आहेतच. प्रिझर्व्हेटीव आपण घालत नाही. स्वस्तदेखील पडतं. पण माझा फायदा म्हणजे ताज्या, हिरव्याकंच कैऱ्या मला बघायला मिळतात. आता कैऱ्या बघायला मी सुनेचा हात धरून मार्केटमध्ये जाणार आहे का ?”
असं म्हणून त्या हसल्या. मग म्हणाल्या,
” मार्केटला कसली जातेय , मध्यंतरी एक्स रे काढायला माझ्या मुलाने घरी व्यवस्था केली ! आता बोला. “
आम्ही नवलानं फक्त ऐकत होतो. शरीर वयाप्रमाणे थकलं असेल. मनाची वृत्ती किती रसिक, लवचिक, खेळकर,
“तो एक्स रे ठीक आला बाई एकदाचा. हाडं बीडं आहेत जाग्यावर. म्हणून ही मोलकरणीवर सुपरव्हिजन करण्याची परवानगी तरी मिळाली !
त्या बयेला एकटीला काही सुधरत नाही. मी लागतेच. “

तुम्हाला वाटेल इतकं निगुतीने करणारी बाई, म्हणजे आयुष्य फक्त स्वयंपाकपाणी करण्यात गेलं असेल. तर तसं नाही. ह्या बाईंनी इकॉनॉमिक्स विषयात पीएच.डी प्राप्त केली आहे. कॉलेजमध्ये हेड ऑफ दी डिपार्टमेंट हे पद भूषवले आहे. गाण्याची उपजत आवड. नोकरी ,घर ,संसार सांभाळून ती त्यांनी एकीकडे जोपासली आहे. त्यात त्यांना करीअर करता आले असते. पण ही हळहळ त्या उगाळत नाहीत. सगळ्याच गोष्टी कशा मनासारख्या होतील ?

त्यांची स्तुती केली की त्यावर म्हणतात, ” जे जमलं ते केलं. “

माईंना खऱ्या अर्थाने साथ करणारे, प्रोत्साहन देणारे त्यांचे यजमान गेल्यापासून त्यांनी सुरांची सोबत जवळ केली आहे. सुरांच्या सोबतीची जास्त गरज लागली आणि शिवाय सुरांची सोबत होऊ शकते ही जाणीव देखील झाली.
गाणं म्हणजे जगणं, जगणं म्हणजे गाणं असं त्या मानतात.
“आता आवाज चढत नाही. दम लागतो. पण गाणं ऐकते मी. नातीने गाणी लावून देण्याचे तंत्र शिकवले आहे.. ऐकायला पण कमी येतं, आताशा नातवाने ते कानाला लावायचं आणलं आहे. गाण्याची आवड म्हणजे केवळ स्वतः गाणं किंवा झळकणं अशी नसते !
सुरांची समज असेल, तर ती सोबत किती सुखाची असते ! अटीशिवाय असलेली सोबत असते ती. आपल्या पदाची किंवा कर्तृत्वाची सोबत कामी येत नाही. ” उस्फूर्तपणे त्या बोलतात. उपदेश करण्याचा भाव त्यात नसतो.

“ नातवंडांना वेळ नसतो. मुलगा- सूनसुद्धा ,त्यांच्या वेळापत्रकात बंदिस्त ! रोज माझ्यासाठी खूप वेळ कोणी देऊ शकत नाही. मग सूर मला सोबत करतात. ” त्या सहज सांगतात.

भरतकामही करत असत फार पूर्वी. आता नजर साथ देत नाही. गायला गळा तेवढा काम करत नाही. पण क्रिएटिव्हिटी रक्तातच आहे. यू ट्यूब वरच्या रेसिपी पाहून अजून काय काय ट्राय करत असतात.

“ इतके तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ नव्हते हो केले कधी. रोजचा स्वयंपाक, सणासुदीचे पदार्थ, सांडगे – मुरांबे असे थोडे साठवणीचे पदार्थ ! एवढेच…”
” बस, एवढेच ?
हे कमी वाटतात की काय, माई ?” आम्ही दोघी हसलो.
“अगं मुलींनो, त्या काळी हे पदार्थ सहज व्हायचे घरात ! आता मात्र मी व्हेज मंचुरियन करते बघ. “

मग म्हणाल्या, “नातं टिकवण्याचा मार्ग मात्र जिभेतूनच जातो बरं का ! माझी नात इतकी खूश झाली ते चायनीज बघून. नातू म्हणाला हक्का नूडल्स ट्राय कर आजी ! माझी फेवरिट डिश आहे ती. हक्का नूडल्ससाठी हक्काची आजी. म्हणजे कामापुरता मामा नि ताकापुरती आजी. चालायचंच. उभं राहवत नाही, जास्त. दुसऱ्याची मदत लागते. मंचुरियनचे गोळे सुद्धा आमच्या बाईने बनवले. तरीही त्यात क्रिएटिव्हिटी आहे. ते मला जमते हे आहे असंच म्हणते मी. आनंदही मिळतो. “

“सुनेच्या आवडीचं काय बनवता ?” मी मिश्कीलपणे विचारलं.

” मी हे सगळं करते हेच मुळी तिला आवडतं ! तिच्या सोयीचं आहे ना ते. तिचं ‘हे विश्वची माझे घर ‘ चालू आहे ना. ऑफिसटूर साठी बाहेरदेखील जावं लागतं. तिची सोय आणि माझा वेळ घालवणं हे इतकं छान ऍडजस्ट झालं आहे. कारण माझं त्याच्या उलट,’ हे घरची माझे विश्व ! ‘”

आम्ही भारावून ऐकत होतो. हे घरची माझे विश्व ! किती छान. बाहेरची दुनिया पाहूनही हा स्वीकार किती समंजस ! नुसताच समंजस स्वीकार नव्हे तर हिरव्याकंच कैऱ्या पहाण्याची ओढ आणि रसिकतासुद्धा टिकवून आहेत त्या.

“ अनुभवातून शहाणपण आहे हो हे .” त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.

वार्धक्याचे माईंनी हसून स्वागत केले आहे. तरुण मंडळी जास्त वेळ देऊ शकत नाहीत, नाती कामापुरती असतात हे त्यांनी त्रागा न करता सहज स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांना गाणी ऐकू यावीत अशी व्यवस्था नातवंडे आपणहून करतात. एके काळी भिरभिर फिरत होत्या माई. आता घरापुरतं सीमित आहे. म्हणून स्वतःच्या घराला विश्व मानत आहेत. त्यांनी जिंकलं आहे त्यांच्या भोवतालचे जग, घराचे विश्वही !

आयुष्य म्हणजे एखादं शिल्प असावं तसं असतं. दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला की शिल्प तयार होतं ना ! माईंनी अनावश्यक भाग ठेवले नाहीत.
एके काळी मोठे पद होते, आता नाही. आता गाणे ताब्यात नाही. त्या ऐकतात. भरतकाम आता जमत नाही, त्या काळच्या कलेला आता तितके महत्व उरले नाही. कसलीच खंत माई करत नाहीत.

काळ बदलत असतो. तो तुम्हाला दिवसेंदिवस हळूहळू कुरतडतही असतो. त्याकडे सुद्धा काळाची ती क्रिएटिव्हिटी आहे ह्या नजरेने पहाता यायला हवे ! होय ना ? जिवंतपणी मोक्ष हाच असेल ना ?

कार्तिकेयाने घातलेली पृथ्वी प्रदक्षिणा आणि श्रीगणेशाने घरातच मातृपितृ देवांना घातलेली प्रदक्षिणा दोन्हींची मूल्ये समान आहेत ना ? श्रीगणेशाने ते स्पष्ट करून दाखवले आहे. ती कथा आठवली मला ! आयुष्यात परिस्थितीला विवेकाने सामोरे जाणे माईंना जमले आहे.

आम्ही दोघींनी माईंना वाकून नमस्कार केला. श्री गणेशाला मिळाले त्या प्रकारचे समाधान घेऊन आम्ही परतलो.
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments