आपण आत्महत्या टाळू शकतो !
नवी दिल्लीच्या मुख्य सचिव पदी राहिलेल्या व्यक्तीने नुकतीच आत्महत्या केली. इतक्या उच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याबद्दल सर्व देशभर त्याचे पडसाद उमटत आहेत. तसेही अधूनमधून कुणा उद्योजकाने, डॉक्टरने, अधिकाऱ्याने, विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या येतच असतात.
दिवसेंदिवस जगभर आत्महत्येची समस्या वाढत चालल्याने आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 2003 पासून 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणुन पाळण्यात येतो. जगात दरवर्षी सात लाखाहून अधिक व्यक्ती आत्महत्या करीत असतात. तर भारतात जवळपास पावणेदोन लाखाहून अधिक व्यक्ती आत्महत्या करतात. दुर्दैवाने देशात सर्वाधिक आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात होत असतात. या बाबीचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2015 पासून 104 ही हेल्पलाइन सुरू केली आहे. काही स्वयंसेवी संस्था देखील यासाठी कार्यरत आहेत.

वरकरणी सर्व काही आलबेल असल्याचे वाटणारी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते, तेव्हा त्या व्यक्तिच्या परिवाराबरोबर समाजासाठीही तो मोठा धक्काच असतो. शिवाय ते राष्ट्राचेही मोठे नुकसान असते. त्यामुळे आत्महत्या टाळले जाणे अतिशय महत्वाचे होऊन बसले आहे.
अशा आत्महत्या होऊ नये म्हणून, ज्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार घोळत आहेत, अशा माणसांची काही लक्षणे दिसतात का ? ती आपण कशी ओळखली पाहिजे ? अशा व्यक्तिला आपण तातडीने मानसिक उपचार कसे मिळवून दिले पाहिजेत ? या दृष्टीने मी काही मानसोपचारतज्ज्ञ यांच्या मुलाखती घेतल्या. बरेचसे साहित्य वाचले, त्याचा हा गोषवारा देत आहे.
आत्महत्येच्या मागे काही ना काही मानसिक आजार कारणीभूत ठरत असतात. त्यातील एक कारण म्हणजे आपल्या आई/वडिलांपैकी आधीच्या ६ पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार असेल तर शक्यता खूप असते. दुसरे कारण परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळेही मानसिकतेवर विपरित परिणाम होतो.
मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अशा व्यक्ती संशयी वृत्तीच्या होतात. त्यांना आपल्याविरुद्ध कुणी काही कट कारस्थाने रचतात असे वाटत राहते. परत कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीची सतत भीती वाटत राहते. त्या एकच गोष्ट सतत करीत राहतात.
काही प्रमुख मानसिक आजारांची नावे म्हणजे डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया (त्यात परत पॅरानॉईया एक प्रकार), नास्काटी कॅटॅटॉनीक, डिसऑर्डर, (दुश्चिता) बायपोलर डिसऑर्डर अशी आहेत. आजारांच्या लक्षणावरून ती ओळखता येतात.

स्क्विझोफ्रेनियामध्ये रुग्णाचे मन कशात लागत नाही. त्याच्या मनात सतत असंबंध विचार येत राहतात. तो खूप आळशी बनतो.
कॅटॅटॉनिकमध्ये रुग्ण एकाच स्थितीत दिवसेंदिवस राहू शकतो. उदा. एकटक पाहत राहिले तर तसेच राहतील. अशा रुग्णांना प्रसंगी शॉक ट्रीटमेंट द्यावी लागते. अशा रुग्णांचे प्रमाण कमी असते.
पॅरानॉईयामध्ये रुग्ण संशयीखोर असतात. ते सतत संशय घेत असतात. बायको असेल तर नवऱ्याचा, नवरा असेल तर बायकोचा; त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये सतत भांडणे होतात. वैवाहिक जीवन कष्टप्रद होते. बऱ्याचदा अशा विवाहांची परिणती घटस्फोटात होते. प्रसंगी काही रुग्ण जोडीदाराची हत्या पण करतात. त्यांच्या डोक्यात ते सतत कटकारस्थाने रचत असतात. कधीतरी शेवटी त्यांच्या हातून कृती घडते.
डिप्रेशन हे आनुवंशिकतेमुळे होऊ शकते. तसेच ते बाह्य वातावरणामुळेही होऊ शकते. घरातील वातावरणही कारणीभूत असू शकते. अशी व्यक्ती मनातल्या गोष्टी कुणाशी बोलत नाहीत. ती एकलकोंडी बनतात; त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये लवकरच जातात. काही वेळा अशा व्यक्तींच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की, ते बोलत नाहीत आणि एकलकोंडेपणा वाढत जातो.
फोबियामध्ये व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भीती वाटत राहते. ही भीती उंचीची, पाण्याची, गर्दीची, सभेत बोलण्याची असते. एका मर्यादेपलीकडे भीती गेली की, त्याला फोबिया म्हणतात.
रुग्णाच्या मानसिक आजाराचे निदान होण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र यांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांनी रुग्णाची लक्षणं ओळखून त्याला तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे. या रुग्णांचे उपचार म्हणजे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाने लिहून दिलेली औषधे नियमितपणे घेणे, गरजेनुसार विद्युतलहरींचा वापर करणे ही होत. उपचारांचा कालावधी रुग्णांच्या आजाराच्या प्रमाणावर अवलंबून असतो.स्क्विझोफ्रेनियामध्ये मात्र आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. पॅरानॉईयाच्या रुग्णास डिप्रेशनमध्ये औषधाबरोबर समुपदेशन जास्त महत्त्वाचे असते. डिप्रेशन काही काळापुरते असू शकते. वेळेवर व योग्य उपचाराने ते कायमचे बरे होऊ शकते; पण वेळीच उपचार न घेतल्यास असे रुग्ण आत्महत्येस प्रवृत्त होतात किंवा अन्य व्यक्तीची हत्या करू शकतात. भावनिक, संवेदनशील व्यक्तींना डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते.
समाजात आज जीवघेणी स्पर्धा, तुलना वाढल्याने डिप्रेशनचे प्रमाण वाढताना दिसते. यास एकल कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी घरातील आजी, आजोबा, काका, काकू इतर भावंडे असतात. त्यामुळे संयुक्त कुटुंबात डिप्रेशनचे प्रमाण अत्यल्प असते. आईवडील दोघेही नोकरीला असणाऱ्या कुटुंबातील मुलांमध्येही डिप्रेशनचे प्रमाण अधिक असते; परंतु दोघांनाही नोकरी/व्यवसाय करणे आवश्यकच असेल तर त्यांनी मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. लहान मुले आपल्याला वेळोवेळी समजून घेत असतात, त्यामुळे त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. एकत्र चहा घेणे, निदान रात्रीचे जेवण एकत्र घेणे, घराशी संबंधित बाबींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांना मान देणे अशा गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. व्यक्तिने कार्यालयात कामाला व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये, तर ते सामूहिक जबाबदारी म्हणून पार पाडले पाहिजे. एकमेकांविषयी द्वेष, मत्सर असता कामा नये. एकमेकांशी सतत संवाद साधला पाहिजे. कार्यालयात निरोगी आणि पोषक वातावरण राहिले पाहिजे.
आपले विचार अनियंत्रित होऊ नये म्हणून योग आणि ध्यानधारणेचा फार उपयोग होतो; म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी; त्यामुळे मन समतोल राहण्यास मदत होते. आपण मनाला सतत सकारात्मक सूचना देत राहिले पाहिजे. आपले मन हे रिकाम्या भांड्यासारखे असते. त्यात चांगले विचार टाकले तर चांगली कृती होते. नकारात्मक विचार टाकले तर व्यक्ती कृतीशून्य होते किंवा नकारात्मक बाबी करण्यास प्रवृत्त होते.आयुष्यात आपण संकटाला कसे सामोरे जातो, तेही खूप महत्त्वाचे आहे. आपण नशिबाला, देवाला दोष देतो; पण संकटाला संधी समजलो, तर आपण ते आव्हान पेलू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो. म्हणून व्यक्तीने भविष्याचा अतिविचार न करता, वर्तमानकाळ कसा चांगला होईल हे पाहिले पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहिले पाहिजे.
आजकाल आईवडील दिवसभर बाहेर राहतात. पूर्वी मुले फक्त टीव्ही पाहू शकायची; पण आता मोबाईलमुळे चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही मुलामुलींपर्यंत तत्काळ पोहोचतात; त्यामुळे पालकांनी मुलामुलींना योग्य वेळीच सर्व गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत.
संपूर्ण आयुष्य ही एक परीक्षा असते हे आपण समजून घेतले पाहिजे. ताणतणावांना दूर ठेवण्यासाठी व्यक्तीला काही ना काही छंद असला पाहिजे. आपली आवड काय आहे, हे ओळखून त्या व्यक्तीने वाचन, लेखन, फिरणे, पोहणे, खेळणे, सायकल चालविणे, मित्र मंडळींशी गप्पागोष्टी करणे असे काही ना काही छंद जोपासले पाहिजेत.
भारतात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवक प्रथम क्रमांकावर आहेत, ही बाब लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आदेश दिले आहेत. याबाबतीत युवकांना मला असे सुचवायचे आहे की, त्यांनी करिअर निवडताना प्रामुख्याने आपली आवड, क्षमता, मर्यादा लक्षात घेऊन करिअर निवडले पाहिजे.
या संदर्भात काही महत्वाची आकडेवारी द्यायची झाली तर ती वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची देता येईल.
भारतात गेल्या पाच वर्षांत एम बी बी एस; एम डी; एम एस करणार्या 122 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 1270 जणांनी हे अभ्यासक्रम मध्येच सोडून दिले आहेत. तर अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्या आयआयटी मध्ये गेल्या दहा वर्षात 115 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात हट्टेकट्टे समजल्या जाणाऱ्या पोलीस दलातील 45 अधिकारी, पोलीस यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणुनच करिअरची निवड करताना प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती याच्या आहारी न जाता आपली आवड ओळखूनच करिअर निवडल्यास आपण आपले जीवन आनंदाने जगू शकतो, असे मला वाटते.
शेवटी एकच आवाहन करावेसे वाटते की, आत्महत्या मुक्त जग निर्माण करण्यासाठी आपण आपल्या कडून होईल तेवढे योगदान देऊ या.
(काही संदर्भ : गुगल)

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Sunder Abhyaspurna lekh👌👌👌🙏
Sunder lekh
‘आत्महत्या’ हा आजच्या काळातील फारच महत्त्वाचा विषय आहे. आपण खूप चांगल्या प्रकारे त्याला हाताळले आहे.