खूप दिवसांनी एकत्र भेटणाऱ्या मित्रमंडळींनी केवळ मौजमजाच न करता त्याला वृक्षारोपणाची जोड देऊन अभिनव मित्रमेळा घडवून आणला. यात पुढाकार घेतला तो पर्यावरण तज्ञ सुधीर थोरवे यांनी…
भारतात दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात वन महोत्सव साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून सर्वोदय विद्यालय, घाटकोपर आणि वर्सोवा वेल्फेअर स्कूल, अंधेरी येथील चाळीस वर्षांपूर्वीच्या मित्रमंडळींनी एकत्र येऊन वृक्षरोपण कार्यक्रम पार पडला. या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचं काम श्री सुधीर थोरवे आणि त्यांच्या पत्नी प्रा सौ वैशाली यांनी केले.
श्री सुधीर थोरवे हे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून मागील अनेक वर्ष हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आवडीने करत असतात. परंतु मागील चार वर्षापासून त्यांनी आपल्या शाळेतील वर्ग मित्रांना यामध्ये सामावून घेतले आहे. आतापर्यंत या चमूने 500 च्या वर झाडांची लागवड केली आहे.
पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एकत्र आलेल्या एकूण 35 वर्ग मित्रमैत्रिणी तसेच त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील नंदीठाणे ह्या वन विभाग क्षेत्रांमध्ये वनाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून त्यांनी हे वृक्षारोपण केले.
वय वर्ष 15 ते 60 या सर्व वयोगटातील लोकांचा समावेश असलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात सर्व जणच तरुण असल्याचे जाणवत होते. एक वेगळाच उत्साह आणि आनंद प्रत्येकामध्ये दिसत होता. मागील काही दिवस पाऊस नसल्यामुळे वातावरणात उष्णता आणि दमटपणा अधिक जाणवत होता. असे असले तरी वृक्षारोपण करताना विविध वयोगटातील सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. प्रत्येक जण या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक छोटसं योगदान देत असल्याचा आनंद घेत होता.
विविध विभागातून आलेल्या ह्या मित्रमंडळींनी भिवंडी नंतर एका फार्म हाऊसच्या जवळील मोकळ्या जागेत मनसोक्त न्याहारीचा आनंद लुटला.
वन क्षेत्रांमध्ये आल्यानंतर सगळ्यांनी एकत्रित वार्मअप केलं आणि वन अधिकाऱ्यांकडून झाडे
लावण्यासंबंधीची माहिती घेतली. कुदळ, फावडे घेऊन खड्डे खोदताना व रोपे लावताना प्रत्येक जण हिरीरीने भाग घेत होता. सारे जण खऱ्या अर्थाने श्रमदान करत असल्याचे जाणवत होते. सगळ्यांनी मिळून साधारणता दीडशे झाडांची लागवड केली.
तदनंतर डोंगरातून उगम पावलेल्या बाजूला असलेल्या नदीच्या निर्मळ पाण्याच्या प्रवाहात सर्वजणांनी मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. श्रमदानानंतर नदीच्या पात्रातील थंडगार पाण्याच्या प्रवाहात सगळ्यांचा थकवा पार निघून गेल्याचे जाणवले.
वृक्षरोपणानंतरचा आणखी एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे वनभोजन. विलास आचरेकर या हरहुन्नरी मित्राने शेजारील आदिवासी पाड्यातून लाकडे आणि चूलीचं सामान आणलं होतं. त्या चुलीवरील गरमागरम भोजनाचा आनंद प्रत्येक जण आपापल्या परीने घेत होते. जंगलमय वातावरणातील वनभोजनाचा आस्वाद सगळ्यांना वेगळाच आनंद देऊन गेला.
या आनंदमय पर्वणीच आणखी एक भाग म्हणजे ग्रुप मधील विलास, वय 56 आणि निहारिका, वय 20 या दोघांचा वाढदिवस नाच गाण्याच्या सानिध्यात साजरा करताना सगळेजण एका आगळ्या वेगळ्या वातावरणात गेले होते.
कौटुंबिक वातावरणातील या अविस्मरणीय कार्यक्रमात आचरेकर, आजगावकर, कर्णे, पाटील कांबळे, आठवले, पेडणेकर, खाडे, महामुनी, कोंडाळकर, थोरवे कुटुंबीयांनी तसेच डॉ. वेदांगी, उन्नत्ती, मंदा आणि माधुरी यांचा सहभाग होता. अर्डेकर आणि फडके ह्या वन अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
पर्यावरण संवर्धनाचा आणि पर्यावरण संरक्षण जाणीवेचा छोटासा प्रयत्न या मित्र मंडळींनी केला आणि यातील प्रत्येकाला या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगळाच आनंद देऊन गेला.

– लेखन : प्रथमेश थोरवे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800