नमस्कार 🙏 “ओठांवरलं गाणं” या सदरात सर्व रसिकांचं स्वागत ! गुरू शिष्य परंपरा ही पुरातन काळापासून चालत आलेली आणि आजच्या आधुनिक काळातही टिकून राहिलेली परंपरा, जी अतिशय श्रद्धापूर्वक आणि आदरभावनेने जपली जाते. शिक्षण मग ते कोणतंही असलं तरीदेखील गुरू शोधल्याशिवाय किंवा त्या विषयातला कोणी तज्ञ गुरू केल्याशिवाय त्या त्या विषयातील इत्यंभूत ज्ञानाची परिपूर्णता होत नाही.
गुरूच्या ऋणातून मुक्त होता येत नाही पण गुरू हातचं काहीही न राखता स्वतःजवळचं ज्ञान आपल्या शिष्यांना देत असतो हे लक्षात घेऊन गुरूप्रती नतमस्तक होऊन आदरभाव व्यक्त करण्याची एक संधी गुरूपौर्णिमेमुळे शिष्यांना मिळते. पूर्वी गुरूगृही आपल्या शिष्यांची परीक्षा घेऊन आपण शिकवलेलं शिष्य किती शिकला आहे हे पाहिलं जात असे. यंदाही गुरूपोर्णिमेचं निमित्त साधून निरनिराळ्या क्षेत्रात आपापल्या गुरूविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी होईल.
आज मी गुरूप्रती आदरभाव व्यक्त करणा-या एका गाण्याचं रसग्रहण करणार आहे. जगदीश खेबुडकर यांनी “कैवारी” या चित्रपटासाठी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत-
“गुरूने दिला ज्ञानरूपी वसा |
आम्ही चालवू हा पुढे वारसा”
गुरूजी, तुम्ही घेतलेल्या ज्ञानदानाच्या या व्रतामुळे आम्ही साक्षर झालो, सज्ञान झालो, सुजाण नागरिक बनलो. आता तुमच्या व्रताचा हा वारसा इथून पुढे आम्ही चालवू आणि तीच आमची गुरूदक्षिणा असेल असं आश्वासन आम्ही शिष्यगण गुरूपौर्णिमेच्या शुभ दिनी तुम्हाला देतो.
पिता, बंधू, स्नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षापरी माऊली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा
गुरूमाऊली, तुमच्या सेवेत आम्ही निरंतर असतो तेंव्हा कधी माता, पिता म्हणून तुम्ही आम्हाला वंदनीय ठरता कधी स्नेही आणि जवळचा सखा होऊनही आमच्या अनंत अडचणी दूर करता, तर कधी कधी मातेच्या रूपातून हवे ते देणारा कल्पवृक्ष भासता. “अनेक रूपे .... तुझी स्वरूपे” असं म्हणावं अशी तुमची अनंत रूपं आम्ही अनुभवत असतो. तुमच्या ज्ञानरवीचं तेज इतकं अफाट आहे कि त्या ज्ञानाचा छोटासा कवडसा जरी आमच्यापर्यंत पोचला तरीदेखील त्या तेजोमयी ज्ञानाच्या किरण शलाकेमुळे कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.
जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा
गुरूजी, तुमच्याकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे संस्कारांचं बीज आमच्या हृदयात अंकुरत गेलं तसतसे आम्ही शिस्त, बाणेदार, स्वाभिमान या पाकळ्यांनी श्रीमंत होत गेलो. एखादं झाड जसं फळाफुलांनी बहरून येतं, तसाच सर्व गुणांचा समुच्चय तुमच्या शिकवणुकीतून आमच्या अंगी बाणू दे हीच कामना.
शिकू धीरता, शूरता, वीरता
शिकू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा
“विद्या विनयेन शोभते” हा पाठ तर गुरूजी, तुम्हीच शिकवलात आम्हाला. कितीही शिकून मोठे झालो तरी अंगचा विनम्रपणा सोडू नका हा वस्तुपाठ आम्ही नेहमीच घोकत राहू. त्याचबरोबर धैर्य, शौर्य याही गुणांचा सदैव ध्यास धरून ते गुण अंगी बाणवायचा प्रयत्न करत राहू. देशाचा चा़ंगला नागरिक बनण्यासाठी या गुणांची देखील निकड आहे.
जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करु पालन
मनी मानसी हाच आहे ठसा
गुरूजी, आजकाल ख-याची दुनिया राहिलेली नाही पण तुमची शिकवण आचरणात आणताना आम्ही या दुष्ट शक्तींचं निर्दालन करून पुन्हा एकदा सत्याचं आचरण करणा-या सज्जनांना प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ. जे जे उत्तम उदात्त उन्नत असेल ते ते सर्व जगापुढे येण्यासाठी आम्ही निकराचे प्रयत्न करत राहू. हे कठिण व्रत आमच्याकडून आचरणात आणलं जावं म्हणून तुमचे शुभाशिर्वाद मिळावेत ज्यामुळे या व्रतासाठी लागणारा प्रेरणास्रोत आमच्या हृदयात सतत वाहता राहील.
“कैवारी” चित्रपटातील या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी आणि अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात या गीताचे शब्द आपल्या मनात रुंजी घालतात.
येत्या आठवड्यात येणाऱ्या गुरूपौर्णिमेचं औचित्य साधून या गाण्याचं रसग्रहण केलं आहे. माझ्या सर्व गुरूंच्या चरणाशी विनम्र भावनेने हे रसग्रहण मी अर्पण करतो.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
खूप छान रसग्रहण
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून.निवडलेल्या गाण्याचे रसग्रहण
उत्तम.
सूंदर रसग्रहण
धन्यवाद विराग🙏
सुंदर गाणे व तितकेच सुंदर रसग्रहण. अभिनंदन विकास.
धन्यवाद विवेक 🙏
सुंदर व सुयोग्य शब्दात केलेले रसग्रहण
धन्यवाद अरूण🙏
खूप सुरेख.. गुरुशिष्य यांचे नाते सांगणारे सहज सुंदर गाणे आणि त्याची चाल देखील सुमधुर…भावे सरांनी गाण्याचे सुंदर रसग्रहण केले आहे.
धन्यवाद सर 🙏