आज, दिनांक २४/०७/२०२१ रोजी सकाळी वृत्तपत्र वाचण्यासाठी हाती घेतलेल्या आणि पहिलीच बातमी कोकणातील, कोल्हापूरातील महापुराची वाचून मन विषन्न झालेल्या एका संवेदनशील कवीच्या लेखणीतून आपसूकच शब्दरूपी संवेदना तात्काळ निर्माण झाल्या. त्याला कवितेत मांडण्याचा कवीने केलेला हा प्रयत्न ……
पावसाचा कहर | परिस्थती गंभीर |
चहूकडे महापूर | कोकणात ||
निसर्गाचा प्रकोप | पाहुनिया थरकाप ||
होतोय मनस्ताप | महापुराचा ||
कोपला निसर्ग | पाहवेना दृश्य |
पाण्याचा विसर्ग | धरणातून ||
भिजला संसार | झाले अतोनात हाल |
मनी कोलाहल | पावसामुळे ||
जाहले अनेक बेघर | कुटुंब उडघड्यावर |
नयनी दाटे महापूर | अश्रूंचा ||
दरडी कोसळून | त्याखाली दबून |
गेले बरेच वाहून | महापुराने ||
वाढता पाण्याचा प्रवाह | पूरस्थिती भयावह |
येते आप्तांची सय || नातलगांना ||
असह्य वेदना | काहीही कळेना |
मोडून पडला कणा | पुरग्रस्तांचा ||
तान्हुले उराशी धरून | हात घट्ट पकडून |
होते एकमेका बिलगून | मायलेकरू ||
मनी एकच आस | आता थांबावा पाऊस |
सुटकेचा निःश्वास | पुरग्रस्तांच्या ||
– रचना : डॉ.शिवाजी शिंदे, सहायक कुलसचिव,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.