भारतातील निसर्गरम्य, सर्वाधिक साक्षर, एक प्रगत राज्य म्हणून केरळ राज्य ओळखल्या जाते. अशा या केरळ राज्याची अभ्यासपूर्ण सफर आपल्याला घडवणार आहेत, खुद्द केरळच्या रहिवासी असलेल्या सौ मनिषा दिपक पाटील.
कवियत्री असलेल्या सौ.मनिषा दिपक पाटील या केरळ मधील पालकाड येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण बीएस्सी पर्यंत झाले असून त्यांना वाचन, लेखन, पाक कला, पर्यटन या गोष्टींची आवड आहे.
सरकार मान्य अष्टपैलू संस्कृती कला अकादमी आयोजित राज्यस्तरीय मासिक स्पर्धेमध्ये कविता लेखनाबद्दल त्यांना उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट असे पुरस्कार मिळाले आहेत.
विविध काव्य स्पर्धेतूनही त्यांना उत्तेजनार्थ ते सर्वोत्कृष्ट, भावस्पर्शी मानांकन मिळाले आहे.
चारोळी समूहासाठी फुलांवर रोज एक चारोळी लिहिते.
आतापर्यंत १२० फुलांवर त्यांच्या चारोळी लिहून झाल्या आहेत.
त्या आपल्याला घडविणार असलेली केरळची सफर आपल्याला नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे.
तर मंडळी आजच्या पहिल्या भागात पाहू या
“केरळचा इतिहास”…..
केरळ – केरळ म्हणजे केरा + आलम. केरा म्हणजे नारळाची झाडे. आलम म्हणजे परिसर.
नारळाच्या झाडांचा परिसर.
दक्षिणेकडील एक निसर्गाने नटलेले सुंदर राज्य.
पुराणातील कथेनुसार परशुरामांनी आपला परशु समुद्रात फेकून केरळची निर्मिती केली असे म्हणतात. केरळची भाषा मलयाळम आणि राजधानी त्रिवेंद्रम आहे.
केरळ हे १४ जिल्ह्यानी मिळून बनलेले भारतातील तेरावे मोठे राज्य आहे .
साधारण आठव्या शतकात चेरा राज्याचे साम्राज्य इथे होते. त्यावरून पुर्वी याला चेरलम असेही म्हणले जायचे. यांना केरळ पुत्र ही म्हणले जाते.
सुरुवातीला इथे हिंदूंची वस्ती होती. नंतर मसाल्याच्या व्यापाऱ्यामुळे साधारण पहिल्या शतकाच्यावेळी ख्रिस्तीयन्स समुद्रामार्गे केरळमध्ये आले. आठव्या शतकानंतर इस्लाम धर्म इथे आला. त्यामुळे केरळ मध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिस्तियन तिन्ही धर्माचे ठसे दिसतात. समुद्रामार्गे अजून येणारे इतर विदेशी म्हणजे पर्शीयन, अरब, ग्रीक, रोम यांच्याशीही व्यापार चालू होता.
पंधराव्या शतकानंतर पोर्तुगीजही व्यापारासाठी केरळमध्ये येऊ लागले. परदेशातून आलेल्या व्यापारी, पर्यटकांनी केरळला मलबार म्हणूनही संबोधिले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छोटे छोटे राजे एकत्र येऊन त्रावणकोर आणि कोची या राज्यांना मिळाले.
१ जुलै १९४९ मध्ये त्रावणकोर – कोचीन झाले.
पण त्यावेळी केरळचा मलबार प्रांत मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईच्याच अधीन होता.
१ नोव्हेंबर १९५६ साली पुन्हा कोचीन, मलबार, त्रावणकोर मिळून केरळ राज्याची निर्मिती झाली. तेव्हा पासून १ नोव्हेंबरला केरळ दिवस किंवा मलयाळम दिवस किंवा केरळ पिरवी दिन म्हणून साजरा केला जातो.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील
पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.