माझ्या लहानपणी टीव्ही वर सतत कारगिल युद्धाच्या बातम्या दाखवायचे. तेव्हा आताच्या सारखे फार चॅनल नव्हते फक्त सह्याद्री वहिनी होती. पण जिथे तिथे तोच विषय असायचा.
माझे बाबा अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये फरनेस डिपार्टमेंटला कार्यरत होते. युद्ध काळात त्यांना बॉम्बचे कव्हर बनवण्यासाठी जास्तीचा साठा (माल) तयार करण्याचे काम होते. डबल ड्युटी होती त्यांची. सकाळी 7 ते 4 ही ड्युटी करून पुन्हा 4 ते रात्री 12 ही ड्युटी ही केलीय.
दिवसभर तेच कव्हर बनवण्यासाठी आगीजवळ काम करून खूप दमायचे बाबा. पण एक जिद्द होती. देशाप्रती उत्साह जोश होता. त्यांच्यासह सर्व कामगारांच्यात एक एक दिवस असा जात होता.
रोज सकाळी लवकर उठून आधी देवपूजा, मग कारगिल युद्ध जिंकायच्या भावनेने पळत पळत फॅक्टरी गाठायची, सोबतचे सहकारी ह्यांना घेऊन सुरू असलेल्या फरनेसवर काम सुरू करायचं. फरनेस म्हणजे तांब पितळ वितळवण्याची भट्टी ज्यात एकाच वेळी शेकडो टन तांब पितळ वितळवता येते, त्याचा भट्टीत रस होतो, पुढे हाच रस बॉम्बचे कव्हर बनवण्यासाठी वापरला जातो.
फरनेसवर काम करणं फार जोखमीचं आणि जवाबदारीच असत. एखादा तांब्याचा किंवा पितळेचा भाग नीट मेल्ट झाला नाही तर पुन्हा करावा लागतो. ऐप्रन्स, हॅन्ड ग्लोज, फारच वजनी असे गम बूट, गॉगल अशी काळजी घेऊनही अनेकदा भट्टीवर वर्कर्सचे कधी हात भाजतात, पाय भाजतात तर कधी चुकून डोळा लागला तर वर्करचा तोल जाऊन फरनेसचा भाग लागून त्याचा जीवही जाऊ शकतो इतकं हे जोखिमचं काम, रोज अनेक वर्कर्स हे काम करत असतात .
रोज शेकडो टन तांब पितळ क्रेनच्या सहाय्याने फरनेस मध्ये मेल्ट करायला पाठवलं जातं. त्यावेळी मी लहान होती आणि गंमत म्हणून बाबांच्या बुटामधून तांब्या पितळेचे तुकडे काढलेले मला आठवतंय, मला तेव्हा कल्पनाच नव्हती की एवढे कष्ट असतात.
दादांच्या बरोबर काम करणारा मित्र परिवार आणि सहकारी मंडळी ही सगळ्या जाती धर्माची हे विशेष.
कोण तामिळ, तेलगू बोलणारे कोणी ख्रिश्चन, कोणी मुस्लिम कोणी आदिवासी भागातून आलेले होते. नोकरीसाठी शहरात स्थायिक झालेले असे अनेक जण होते. त्यांच्या गप्पा म्हणजे कारगिल युद्ध, सध्याची परिस्थिती आत्ताचं सरकार याविषयीच्या असायच्या.
आताच्या होणाऱ्या सर्रास पार्ट्या किंवा बेत आखणारी ते पिढी नव्हतीच, साधा एक कटिंग चहा आपुलकीने दिला तरी त्यांना उत्साह यायचा. दादा स्वतः ब्राम्हण जातीचे पण त्यांची मित्र मंडळी ही अनेक जाती धर्माचे त्याच्या मैत्रीत कधीच कोणतीच बंधन नाही आली आणि त्याच श्रेय हे फक्त ते कंपनीला आणि देशसेवेला देतात. कारण सगळेजण जरी वेगवेगळ्या ठिकाणाहून नोकरी साठी आलेले असले तरी सर्वांच्या मनात भारतच युद्ध जिंकणार ही भावना होती.
सर्वांची अफाट मेहनत आणि इच्छाशक्ती होती, आणि अस म्हणतात की जिथे मेहनत आणि इच्छाशक्ती प्रबळ असते तिथे सर्व काही सिद्ध होते.
आणि एक दिवस बातमी आली.
कारगिल युद्धात भारत विजयी !
अहा हा, संपूर्ण फॅक्टरी मध्ये जल्लोष, पेढे वाटले सर्वांना, बाबांबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू आले.
इतके दिवस सर्वांनी जी मेहनत घेतली ती फळाला आली.आपण या कंपनीत कामाला लागलो आणि ऐन युद्धाच्या काळात अहोरात्र मेहनत करून छोटासा का होईना पण एक भाग बनून कामी आलो हे आपलं भाग्य आहे या भावनेने अक्षरशः बाबा मनापासून आनंदाने रडले . आजही त्यांना तो क्षण शब्दात सांगता येत नाही.
पुढे काही दिवसांनी ऑर्डनस फॅक्टरीच्या भारतातल्या सर्व शाखांमार्फत मार्फत ज्या कर्मचाऱ्यांनी या युद्ध काळात बॉम्बचे कव्हर, बुलेटचे कव्हर बनवले पुढे ते अन्य फॅक्टरी च्या शाखा मध्ये पाठवले गेले, पुढे त्याच्यावर पुढची प्रक्रिया झाली आणि ते सर्व कारगिल युद्धात उपयोगी झाले अश्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्या भारतातल्या शेकडो कर्मचाऱ्यांमध्ये माझे बाबाही होते.
श्री. विजय रामकृष्ण लव्हाटे !
माझ्या आईनी मला हे सगळं सांगितलं. मी चौथी मध्ये होती बहुतेक. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा या बातमीने आनंद, अभिमान कसा असतो, वाटतो ते कळलं.
आज दादा, तुम्ही नक्कीच थकला आहात. पण या थकलेल्या हातांनी एकेकाळी खूप कष्ट उपसलेत. देशासाठी, घरासाठी, अनेकांसाठी. दादा मला तुमचा अभिमान आहे .
तेव्हा हीच ती तारीख 26 जुलै 1999 आणि आज कारगिल विजय दिवस🙏🏻
– लेखन : सौ. यामिनी लव्हाटे करंदीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.