Saturday, October 18, 2025
Homeसाहित्यओठावरचं गाणं...

ओठावरचं गाणं…

नमस्कार 🙏
“ओठावरचं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. काही काही गाणी ही आपल्या मनातल्या भावना अगदी सहजपणे व्यक्त करतात. आज पाहू या आरती प्रभू यांच्या या गाण्याचं रसग्रहण.

आरती प्रभु

गाण्याचे शब्द आहेत.

नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
परी का रे हलक्या ने आड येते रीत

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोन प्रेमी जीव आहेत. त्यांना एकमेकांसाठी बरंच काही करायचं आहे. माझ्या मनात खूप काही आहे कि आपण एकमेकांच्या बाहुपाशात असावं, तुला जसं वाटतं आहे ना तसंच मलाही तुझ्यासाठी गाणं म्हणावसं वाटतंय. आपलं नवीन लग्न झालं असलं तरी आम्हा स्त्रियांना काही सामाजिक रीतीरिवाज पाळायला लागतात, उच्छृंखल पणे वागून चालत नाही. त्यामुळे मनात खूप काही असलं तरी आम्हा स्त्रियांना ते उघडपणे बोलता येत नाही.

नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचेच लांब

तू थोडासा धीर धर ना राजा ! आपण दोघेही हातात हात घालून, रमतगमत, गप्पा मारत फिरायला जाऊ. नक्की जाऊयात …. पण मी सांगेन तिथे आणि फिरायला म्हणजे भटकायला आवडतं मला. आपण कुठे तळ्याच्या काठावर हातात हात घेऊन अजिबात बसायचं नाही तर आपल्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आहेत आणि नागमोडी वळणं घेत जाणा-या रस्त्याने आपण दोघेही भटकंती करायला निघालो आहोत असं माझंही एक स्वप्न आहे, जे मला तुझ्यासोबत पूर्ण करायचं आहे.

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट, ओघळेल, हासतील कोणी

मला ठाऊक आहे तुला कधीची माझ्या लांबसडक केसात वेणी माळायची आहे…..ते ही तुझ्या मनातलं स्वप्न आज मी पूर्ण करणार आहे. फक्त तुझा धसमुसळेपणा जरा बाजूला ठेव आणि नाजूक हातांनी जर तू माझ्या केसात वेणी माळलीस तरच ती टिकेल…. नाहीतर कशीतरी घिसाडघाईने जर वेळ मारून नेलीस तर आपण थोडंसं अंतर चालून जात नाही तोवर ती केसांवरून उतरून रस्त्यात कुठेतरी ओघळून जाईल आणि लोक तर तुलाच हसतील

नाही कशी म्हणू तुला जरा लपूछपू
परी पायातच काटे लागतात खुपू

तू म्हणशील त्या प्रत्येक गोष्टीला माझा होकार आहे, माझी पूर्ण संमती आहे. आपण फिरायला जाऊ या, गप्पा मारू या, लपाछपी सुद्धा खेळू पण खेळताना माझ्या पायाला जर दगड बोचले किंवा धावताना पायात काटा रूतला आणि तो जर खुपायला लागला तर हळुवार हाताने तू तो काढायला पाहिजेस.

नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी

आता तुला गुपीत सांगू ? तुझ्यासाठीच तर मी गोविंद विडा बनवून ठेवला आहे. थोड्या वेळाने माजघरात हळूच कुणाला कळू न देता मागच्या दाराशी ये….. तिथे मी तुला तो देईन. पण आत्ता शहाण्यासारखा वाग आणि सासूबाई आणि सासरे म्हणजे तुझे आई बाबा समोर बसले आहेत याचं भान ठेव आणि ही सुपारी घेऊन गप्प रहा.

नवीन लग्न झालेल्या तरुणीच्या मनातले हे विचार आरती प्रभूंनी किती सहजतेने व्यक्त केले आहेत आणि ह्रदयनाश मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं लता मंगेशकर यांनीही तितक्याच समंजस आवाजात गायलं आहे.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

22 COMMENTS

  1. विकासजी..
    लहानपणी रेडीओवर ऐकलेल्या गाण्यांपैकी
    हे एक गाणे आरती प्रभू यांचे..
    नवीन नवरीच्या मनातले विचार खूप सुंदर गुंफलेत.
    आपले रसग्रहणही खूप सुंदर🌹👌👍🙏

  2. गाण्याचे रसग्रहण उत्तम आहे तरीही गाण्यातील नायकाच्या प्रणयाच्या आतुरतेचा उल्लेख करायलाच हवा असे मला वाटते

  3. खूप छान रसग्रहण करतोस तू विकास. खूप प्रेम आणि शुभेच्छा

  4. भावे सर, खूप छान. नव विवाहित स्त्री च्या मनाचे अंतरंग छान उलगडले आहे.

  5. खूप सुंदर रितीने नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत उलगडून दाखवले आहे. धन्यवाद व शुभेच्छा.

  6. नवविवाहित तरूणीची घालमेल आणि तिचच्या वागण्यावर आलेल्या मर्यादांचं छान स्पष्टीकरण रसग्रहणात आलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप