निष्पर्ण झालेल्या झाडावरती
चैत्र महिन्याची पालवी जन्म घेते
येता सरी पावसाची
शुष्क नदी भरुनी वाहू लागते
विळख्यात काट्यांच्या
नाजुकशी एक कळी उमलते
रात्र काळोखाची
तेज किरणात भरते
असेल बळ पंखात तर
झेप उंच होते
मनी विश्वास असेल तर
युद्ध मैदानाचे जिंकले जाते
निराशेच्या मेघा मधूनी
आशेची रिमझिम होते
नवचैतन्याची चौफेर मग
नवी हिरवळ येते
विस्कळीत विचारांच्या गुंत्यातून
नवविचारांची सुरुवात होते
जीवनातील प्रत्येक अनुभवातून
जगण्याची मग एक नवी उभारी येते
– रचना : पुनम सुलाने