थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ उषा मेहता यांचा आज २१ वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने त्यांचा सहवास लाभलेल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आशा कुलकर्णी यांना त्यांनी
सांगितलेल्या आठवणी त्या तरुण पिढीसाठी सांगत आहेत….
आज उषाबेनचा स्मृतिदिन. आजही त्यांची खादीच्या सफेद साडीतली कृश मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या मृत्यू पूर्वी दहा वर्षे (१९९० – २००० ) गांधी स्मारक निधी मुंबईच्या म्हणजेच “मणिभवन” या ऐतिहासिक वास्तूच्या अध्यक्षा होत्या. वि.स.पागे यांच्या नंतर त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
उषाबेननी मणिभवन मध्ये विविध उपक्रम राबवले. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी होते. त्यामुळे त्यांच्या बरोबर मणिभवनमध्ये माझे पण जाणे होई. आणि त्यामुळे मला उषाबेनच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रमांत सहभागी होता आले. त्यांचा सहवास, त्यांचा डोक्यावर हात ठेऊन दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचा आहे.
डॉ. उषा मेहतांचे नांव “भारत छोडो” आंदोलनापासून क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानींमध्ये प्रसिद्ध झाले होते. एका सधन कुटुंबात २० मार्च १९२० रोजी जन्म झालेल्या उषाबेन यांनी १९४१ च्या सुमारास मुंबई विद्यापिठातून एल.एल. बी. पूर्ण करुन एम.ए. साठी प्रवेश घेतला होता. परंतु उषाबेननी अभ्यास – शिक्षण सोडून भारत छोडो आंदोलनात उडी घेतली. विदेशी कपड्यांवर बहिष्कार, होळी, दारूबंदी, प्रभातफेऱ्या अशा प्रकारे ब्रिटिश सरकारच्या कुरापती काढणे त्यांचे सुरु होतेच, परंतु त्यांची काहीतरी क्रांतिकारी करण्याची मनीषा होती.
त्या वेळी सर्व मोठमोठे नेते मंडळींना महात्मा गांधींबरोबर अटक झाली होती, त्यांना कुठे कोणत्या तुरुंगात ठेवले आहे हे माहीत नव्हते. प्रेस वर सेन्सॉर होता. स्वातंत्र्य प्रेमींचे आवाज दाबून टाकण्यात आले होते. अश्या परिस्थितीत देशवासियांपर्यंत पोचण्याची एक नामी युक्ती उषाबेननी शोधली आणि ती म्हणजे “गुप्त रेडिओ”
काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी गुप्त प्रसारण सुरु केले. तेही दक्षिण मुंबईमध्ये. त्यांनी स्वतःचा ट्रान्समीटर आणि रेकॉर्डिंग स्टेशन तसेच ट्रान्समीटिंग स्टेशन सुद्धा स्थापित केले होते. त्याच बरोबर त्यांची गुप्त संदेश वेव्ह लाईन होती.
९ ऑगस्ट १९४२ रोजी आंदोलन सुरु झाले आणि उषाबेननी १४ ऑगस्ट रोजी रेडिओ सुरु केला. लपून छपून असा रेडिओ सुरु करून बातम्या देणे हे अत्यंत जोखमीचे काम होते.
“अंग्रेजो, भारत छोडो” अशा घोषणा, डॉ. लोहियांची भाषणे, अरुणा असफलींचे संदेश, वंदेमातरम चे प्रसारण, जमशेटपूर संप, इंग्रजांकडून महिलांवर होणारे अत्याचार अशा सगळ्या बातम्या पोचवण्याचे आणि स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग सतत प्रज्वलीत ठेवण्याचे महान कार्य उषाबेननी केले.
अनेक संकटांचा सामना करत करत जवळ जवळ तीन महिने हा रेडिओ स्वातंत्र्य लढ्याच्या सनसनाटी बातम्या सातत्याने प्रसारित करत राहिला. कधी या इमारतीच्या गच्चीवरून तर कधी त्या फ्लॅट मधून पंधरा पंधरा दिवसांनी जागा बदलत इंग्रजांच्या नजरेतून लपत छपत !परंतु शेवटी १२ नोव्हेंबर १९४२ रोजी या रेडिओ स्टेशनवर इंग्रजांनी छापा मारून ट्रान्समीटर जप्त केला व
उषाबेन सह त्यांच्या सहकाऱ्याना अटक केली. सहा महिने चौकशी झाली. चौकशी दरम्यान त्यांचा अनन्वित छळ झाला, कोणीच तोंड उघडले नाही. इंग्रजाना काहीच हाती लागले नाही, कोर्टात केसचा निकाल लागला आणि उषाबेनना चार वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. एप्रिल १९४६ मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
२००० च्या ऑगस्ट क्रांती दिनाला गोवालीया टॅन्क च्या ऑगस्ट क्रांती मैदानात अंगात ताप असतांनाही उषाबेन ध्वजवंदनाला आवर्जून हजर होत्या, आणि केवळ दोन दिवसांतच म्हणजे ११ ऑगस्ट २००० रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
उषाबेनच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन !

– लेखन : आशा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800