घर आतिथ्याचे दार
गृहस्थाचे ते संस्कार
वाट पाहतं अंगण
कुणी येवो तो सज्जन
पदतळाची ती धूळ
पडे अंगणास भूल
किती क्षेत्र तुडवून
ईशकृपेची चाहूल
परसुखासी झटती
सारे सुख सांडुनिया
त्याग अपार चालतो
खेळ सेवा मांडुनिया
नाही कशाचाच मोह
लोभक्रोधादी सोडीती
काम मद मत्सराला
जीवनातून काढीती
असो वेश कोणताही
मनं साधू संत व्हावी
अशा जनांची पाऊले
मजघराला लाभावी
त्यांचे आशीष केवढे
सहजीच लाभतात
मूर्त पुण्याईच्या रूपे
साधुसंत वागतात
उजळती दिशा साऱ्या
विजयाचे हो चौघडे
दीप उजळून येती
अमावस्यी चांदण पडे
नको कोणतेच लाभ
मुखचंद्रमा हसरा
साधुसंत येती घरा
तोचि दिवाळी दसरा

– रचना : डॉ.मंजूषा कुलकर्णी
भक्ती , शक्ती इच्छाशक्ती आणि मनास शक्ती देणारी कविता .