नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत ! रेडिओ हे एक असं सुश्राव्य माध्यम आहे जे क्रिकेटच्या कॉमेन्ट्री पासून लहान मुलांपर्यंत सर्व स्तरावर मनोरंजनाचं काम करत असतं. १४ नोव्हेंबर ! भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. लहान मुलांमध्ये रमताना नेहरू आपलं वय आणि पंतप्रधानपद विसरून लहान मुलांचे “चाचा नेहरू” होत असत. त्यामुळे पंडीत जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिन हा बालक दिन म्हणूनही साजरा केला जातो. आज पाहू या लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारं कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं एक बालगीत जे ऐकताना लहान मोठे सर्वच त्या गाण्यामध्ये गुंग होऊन जातात. शब्द आहेत –
“सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय”
पूर्वीच्या काळी बैलाला सजवून, त्याची शिंगं रंगवून, अंगावर झूल पांघरून त्या बैलाचा मालक (बहुधा शेतकरी असावा) दारोदारी हिंडून भविष्य सांगत असे. थोडक्यात सर्व काही चांगलं होईल असा आशावाद व्यक्त करत असे. अशा सजवलेल्या बैलाला नंदीबैल म्हणतात. शंकराचं वाहन म्हणून कविने भोलानाथ हा शब्द योजला असावा. मोठे झाल्यावर चांगला पाऊस पडून पीकपाणी चांगलं येऊ दे अशी इच्छा आपण व्यक्त करतो. पण पाडगावकर मात्र “पाऊस पडल्यावर शाळेच्या पटांगणात पाणी साचून शाळेला सुट्टी मिळेल का” असा लहान मुलांच्या मनातला प्रश्न विचारतायत. कारण सकाळी लवकर उठून शाळेत जायचा कंटाळा येतो हे आपल्याला माहित आहेच.
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय
आईने केलेला लाडू तर आवडला आहे पण “जास्त गोड पदार्थ खाऊ नयेत” असं सांगून आपला हात पोचणार नाही अशा ठिकाणी आईने लाडवाचा डबा ठेवून दिला आहे. लाडू खायचा मोह तर आवरत नाहीये आणि लाडू तर हवा आहे पण त्यासाठी आईने दुपारी झोपायला हवं. नुसती आई झोपून चालणार नाही तर स्टुलावर चढून डब्यातून लाडू घेताना झाकण उघडल्याचा आवाजही होता कामा नये. बालमनाला पडणारे हेच गहन प्रश्न पाडगावकरांनी या गाण्यातून विचारले आहेत.
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा
रविवार म्हणजे सुट्टीचा वार! आनंदाचा, आरामाचा दिवस. कसलीही घाई नाही, गडबड नाही. मला वाटतं हा प्रश्न लहानपणी शाळेला सुट्टी मिळावी या बालसुलभ इच्छेनुसार निर्माण झाला असावा. म्हणूनच ती मुलं म्हणतायत “बाबा रे मोठी माणसं नुसतं हो ला हो करून मान हलवतात तसं करू नकोस…. खरंखुरं सांग” पण आठवड्यामधे तीन रविवार आले तर किती छान होईल असा विचार हे गाणं ऐकताना नकळतपणे आपल्याही मनात येऊन जातोच नाही का ? कवी हा द्रष्टा असतो असं म्हणतात. पाडगावकरांनी खरं तर आपल्याही मनातला प्रश्न भोलानाथला विचारला आहे असं मला वाटतं.
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर
मराठी, इंग्रजी हे भाषा विषय आपले आवडते असतात. पण गणित या विषयाची शाळेत असताना प्रत्येकाला धास्ती वाटते. मग गणिताचा अभ्यास झाला नसला आणि अशा वेळेस शाळेत जायचं नसेल तर हमखास आजार म्हणजे पोटात दुखायला लागतं. पण आईजवळ अशा वेळेस या कुठल्याच गमजा चालत नाहीत. म्हणून ती मुलं भोलानाथला सांगतायत कि पोटात तर कळ येऊ देच पण त्या सोबत ढोपरही दुखेल का रे, तरच आईच्या मनावर थोडाफार परीणाम होऊन ती म्हणेल, “बरं तर बाळा, मग आज नको जाऊस शाळेत गणिताचा पेपर लिहायला. मी बाईंना चिठ्ठी देते हं”
लहान मुलांच्या मनाचा अतिशय बारकाईने अभ्यास करून पाडगावकरांनी लिहिलेलं हे बालगीत मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलं असून योगेश खडीकर, रचना खडीकर आणि शमा खळे या त्यावेळच्या लहान मुलांकडून ते गाऊन घेतलं आहे त्यामुळे गाणं अधिक उठावदार झालं आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

बालगीत जरी असलं तरी आपल्याला सुद्धा आठवड्यातून तीन रविवार येतील कां असं वाटायचं. भोलानाथ गाणं खूप सुंदर रितीने उलगडून दाखविले आहे. धन्यवाद.
धन्यवाद निलाक्षी 🙏
लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात रेंगाळणार असं हे मंगेश पाडगावकर यांचं लोकप्रिय गीत. बालकांच मनोविज्ञान उलगडणार! तितकंच सुंदर मीना खडीकर यांचं संगीत ! खूप छान शब्दांत रसग्रहण केलं आहे. अभिनंदन!! 👌👌👍💐
धन्यवाद सर 🙏
सुरेख रसग्रहण. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे गाणं आवडतं. मीना खाडीलकर यांनी चालही सुंदर लावली आहे.
धन्यवाद विवेक 🙏
सूंदर
धन्यवाद विराग🙏
धन्यवाद मित्रा 🙏
फार सुंदर.
सुंदर विश्लेषण. या सदरात श्री विकास भावे (जे स्वत: एक उत्तम कवी आहेत) सातत्याने मान्यवर कवींच्या कवितांचे सुंदर विश्लेषण करून ते रसिकांपर्यंत पोहोचवतात. बऱ्याच वेळा एखादा शब्द कवीने का निवडला असावा असा प्रश्न रसिकांच्या मनात निर्माण होतो तो ओळखून त्या अनुषंगाने ते विश्लेषण करतात आणि कवितेतील भावार्थ रसिकांपर्यंत पोहोचवतात. कधीकधी तर तीच एखादी कविता भावे सरांचं विश्लेषण वाचलं की जास्त आवडू लागतात. धन्यवाद 🙏
धन्यवाद गिरीश🙏
धन्यवाद गौरव 🙏
वा.आवडत गाणं आहे माझे ही.
नेहमी प्रमाणे छान लिहले आहे.
नियमित लिखाण बद्दल अभिनंदन .
सुंदर विश्लेषण. या सदरात श्री. विकास भावे (जे स्वत:ही उत्तम कवी आहेत) मान्यवर कवींच्या कवितांचं अतिशय सुंदर विश्लेषण करतात. कवितेचा भावार्थ रसिकांपर्यंत पोहोचवतात. बऱ्याच वेळा कवीने एखाद्या शब्दाचा वापर का केला असेल असा प्रश्न रसिकांच्या मनात निर्माण होतो तो ओळखून त्या अनुषंगाने विश्लेषण करून ते रसिकांना कवितेचा निखळ आनंद देतात.
धन्यवाद गिरीश 🙏