आपल्याला सर्दी खोकला होतो तसा कोरोना होतो.त्यात दोषी वाटायचे कारण नाही.लपवण्यासारखे काही नाही. भारतात अंदाजे ५० लाख लोकांना कोरोना झाला आहे. अजून खूप लोकांना होईल.आपण काळजी घेतली नाही तर अजुन खूप मरतील. जे मेले त्यात मला काही होणार नाही म्हणणारे खूप होते. आपण ही चूक करू नका. कोरोनातुन बरे झाले तरी थकवा बरेच महिने राहू शकेल. म्हणून कोरोना जाणा. कोरोना टाळा.
आपण सर्व दारे, खिडक्या संपूर्ण उघड्या ठेवू. सूर्य किरणांनी कोरोनाचे विषाणू मारतात. घरात सूर्य प्रकाश येऊ देऊ. एगझोस्ट पंखे लावून घरात, ऑफिसमध्ये सगळीकडे खेळती हवा ठेवू. तोंड , नाक व डोळ्यातूनच कोरोनाचे व इतर आजाराचे जंतू शरीरात जातात. म्हणून घराबाहेर नेहमी मुखपट्टी लावू, सर्वांपासून २ हात दूर राहू. वारंवार हात धुवू .
कुणासोबत ही ५ मिनिटापेक्षा जास्त काळ घालवू नका. सर्व कामे फोन वर करा. पाण्याच्या वाफेने लाभ होतो. असा डॉ स्मिता चव्हाण आणि सहकारी यांचा अभ्यास आहे. गरम पाणी,पेय याने लाभ होतो. साबणाने २० सेकंड हात धुवायला हवे. दरवेळी सॅनिटायझर हाताला सगळीकडे नीट लावा. त्यात ६०% अल्कोहोल हवे.
उशीर सर्वाधिक मरणाचे कारण
आज रुग्णालयात मरणारा दर तिसरा कोरोना रोगी आल्या आल्या पहिल्या दिवशी मरतो. तो खूप उशीरा येतो.उशीर हेच सर्व आजारात मरणाचे प्रमुख कारण असते. ते टाळू या.ताप , खोकला , श्वासाला त्रास ही कोरोनाची धोक्याची घंटा आहे. ताप अंगावर काढू नका. लगेच डॉक्टरकडे जा. श्वासाला त्रास वाटला तर कोरोनाची सोय असलेल्या ठिकाणी जा. कोरोनाचे रोगी अलग अलग त्रास घेऊन येत आहेत. कुठलाही बरा न होणारा त्रास असेल तर आधी कोरोनाचा संशय घ्या. कोरोना तपासणी करा. या तपासणीला ६ मिनिटं लागतात. बरे वाटत नसेल तर घरीच ६ मिनीट सहज चाला. त्रास वाढला तर लगेच डॉक्टरकडे जा.
प्राणवायू मापकाने , पलसोक्सने आपला प्राणवायू बघा. तो ९८ ते १०० % हवा. तो चालून ३ ने कमी झाला, किंवा ९३ च्या खाली गेला तर आपल्या जीवाला धोका आहे.आपली नाडी मोजा. ६ मिनिटे चालून ती प्रति मिनिट २० ने वाढली तर डॉक्टरना भेटा. म्हातारे लोक, आजारी लोक,दमेकरी, जाडेपणा, मधुमेह, उच्च रक्त दाब, हृदय विकार, विकलांगता आदी आजारासाठी स्टिरॉइड घेणारे, यांच्या जीवाला कोरोनाने जास्त धोका आहे.कोरोनामध्ये आजाराच्या ५ ते १२ व्या दिवसात अती दक्षता घ्या. काही खराब वाटले तर डॉक्टरना सांगा.डॉक्टरचे ऐका . सर्व इमर्जन्सी शस्त्रक्रिया रोग्याला कोरोना आहे असे गृहीत धरूनच सर्व काळजी घेऊन करतात.
मला कोरोना झाला तर मी रुग्णालयाला जबाबदार धरणार नाही असे लिहून दिले तरच इमर्जन्सी शस्त्रक्रिया करतात. आजारी लोकांना अलग करणे म्हणजे विलगीकरण,म्हणजे क्वारंटाईन . आजारी माणसासाठी स्वतंत्र खोली व शौचालय असेल तर कोरोना झालेल्याला घरी राहू देतात. जेथे लहान घरात ज्यादा लोक राहतात, तेथे एकाला कोरोना झाला की सर्वाना होतो, म्हणून घराच्या इतरांना वाचवायला आजारी लोकांना कोरोना केंद्रात ठेवतात. कोरोना केंद्रात रहायला जावे लागले तर हवे तर आपली चादर, उशी, ब्रश पेस्ट,औषधे, मोबाईल फोन,पुस्तके न्या. १० दिवसात एखादे पुस्तक वाचा, लिहा. ध्यान धारणा करा. हे दिवस चांगले वापरायच्या भावनेने जा.
कोरोना तपासणी : आरटी पीसीआर तपासणी: १०० लोकांना कोरोना असेल तर त्यातील ७० लोकांचा अहवाल आजार आहे असा येतो. याला ७०% सेन्सिटिव्हिटी आहे असे म्हणतात. १०० लोकांचा अहवाल “आजार आहे” असा आला तर त्यापैकी ९९% लोकांना आजार असतो. एखाद्याला नसतो.याला ९९% स्पेसीफिसिटी असे म्हणतात.
अँटीजेन तपासणी: १०० लोकांना कोरोना असेल तर त्यातील ५० लोकांचा अहवाल “आजार आहे ” असा येतो. याला ५०% सेन्सिटिव्हिटी आहे असे म्हणतात. १०० लोकांचा अहवाल “आजार आहे” असा आला तर त्यापैकी ९९% लोकांना आजार असतो. एखाद्याला नसतो.याला ९९% स्पेसीफिसिटी असे म्हणतात. या तपासणीचा अहवाल आजार नाही असा आला तर आरटी पीसीआर ही तपासणी करतात.
अँटीबॉडी तपासणी: ही आजाराच्या दुसऱ्या आठवड्यात करतात. अँटीबॉडी म्हणजे करून विषाणूंना मारणारी आपली प्रतिकार शक्ती. अँटीबॉडी ज्याच्या रक्तात असतात. रक्तातील पाण्याला प्लाझ्मा म्हणतात. तो आपण देऊन आपण रोग्यांचा जीव वाचवू शकतो. हे सर्वानी करावे कारण कोरोनाचे जिवाणू मारायला दुसरे औषध नाही. अँटीबॉडी तपासणी ने कोरोना होऊन गेला आहे हे कळते.
सिटी स्कॅनने पण कोरोनाचे रोग निदान होते. १०० लोकांना कोरोना आजार असेल तर त्यापैकी ८५ मध्ये सिटी स्कॅनने बरोबर निदान होते. याला ८५% सेन्सेटीव्हिटी म्हणतात. सिटी स्कॅन मधे फुफ्फुसे पांढऱ्या काचेसारखी दिसतात.
औषधे : डेक्सामिथासोन औषधाने आजाराची तीव्रता कमी होते. व्हिटॅमिन सी , झिंक व ड जीवनसत्वाने प्रतिकार शक्ती वाढते. कोरोनाने अति गंभीर जीवघेणा आजार झाला तरच रेम डेस वीर आदी अति महाग औषधे वापरली जातात. ड जीवनसत्वाने मरण घटते व रोगी लवकर बरे होतात असा स्पेनचा अभ्यास आहे.अर्धे अंग उघडे राहील असे सभ्य कपडे घालून दुपारच्या उन्हात रोज तासभर काम केले तर शरीरात मोफत ड जीवनसत्व बनते. यासाठी पुरुषांनी अर्धी चड्डी व अर्ध्या बाहीचा सदरा व स्त्रियांनी सभ्य, फ्रॉक, परकर , पोलके, असे कपडे वापरावे. उष्ण भारतात हाच आदर्श पोशाख आहे.
पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रोग्यांना कोरोनातून बऱ्या झालेल्या रोग्याचा प्रतिकार शक्ती असलेला प्लाझ्मा देतात. हा जगातील सर्वात मोठा अभ्यास आहे. दिल्लीत १००० कोरोना रोग्याना प्लाझ्मा देऊन लाभ झाला आहे. ते आता आजारात लवकर प्लाझमा देतात.
मुंबईची गोष्ट : प्राणवायू मापक यंत्र, पलसोक्सने मुंबईला वाचवले. धारावीत खूप कोरोना वाढला होता . तेथे पोलिओचे काम करणारे घरोघरी गेले. प्रत्येकाचे प्राणवायू मापक यंत्राने प्राणवायू प्रमाण बघितले.ज्यांचे कमी होते त्यांना इलाज केले. वाचवले. साथ आटोक्यात आणली. स्वयंसेवी संस्थानी मदत केली. हे मोठी क्रांतिकारी गोष्ट झाली.
मुलांमध्ये कोरोना: सहसा मुलांमध्ये कोरोना कमी तीव्र होतो.पण १-२ % मुलांना तो जीवघेणा होतो.मुलांचा एक कावासाकी नावाचा गंभीर आजार आहे. त्याच्यासारखा आजार होतो. पण मुले कोरोना पसरवितात.
लसीकरण : सर्व लसींचे सर्व डोज सर्व मुलांनी व मोठ्यानी जरूर घ्यावे. बीसीजी,पोलिओ,एम एम आर या लसींनी थोडे संरक्षण कोरोना विरुद्ध मिळते. कोरोना लस यायला अजून काही काळ लागेल.
डॉक्टरांचे, आरोग्य सेवकांचे हाल : कोरोनाने देशात शेकडो डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पोलीस, सफाई कामगार मेले, आजारी पडले. तरी ते त्यांचे काम करतात. त्यांना धन्यवाद म्हणू या. “डॉक्टरांच्या लोक पाया पण पडतात. नावे पण ठेवतात. दोघांना तयार राहा.” ज्यांना वाटते की कोरोनात पैसे आहे, त्यांनी जीवाला धोका पत्करून कोरोना रोग्यांची सेवा करावी. एका ऍनेस्थेटिस्ट डॉक्टरला दोनदा कोरोना झाला . तरीही त्या बरे झाल्यावर परत कोरोना रोग्यांची सेवा करणार आहेत.
——————-
https://youtu.be/7V5byUfW6rA वरील लिंक डाऊनलोड करून कोरोना वेबिनार ऐका .हा नालासोपारा व विरार च्या मेडिकल असोसिएशनने लोकांसाठी घडवला. याचा सारांश या लेखात आहे. —
घराबाहेर तोंड झाकले नसेल तर 500 रु दंड . ९.९.२० ला बुधवारी मुंबईत कोरोना चे नवे 2,227 रोगी+ 43 मृत्यू.मे मध्ये 1200 होते! कोरोनाची दुसरी लाट तर नाही ? कोरोनाच्या बाबतीत , परिस्थिती खूप गंभीर आहे .हे वर्ष भटकंतीसाठी विसरा.अमेरिकेत कोविड मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या 2.7 % तरुण रुग्णांचा मृत्यू झाला. जे मेले त्यातील 44% जाड होते. जाड असाल तर बारीक व्हा. त्यासाठी दर पाऊण घास भाजी कोशिंबीरचा करा.2 जेवणे सोडून मधले नाश्ता सोडा. चहा बिन साखर घ्या. उभ्याने कामे करा. बसणे कमी करा.
मुंबईत दादरला फुलांची बाजारपेठ आहे.तेथे गणपती उत्सवात खूप गर्दी होती. तेथे धारावी एवढे कोरोना रोगी आहेत. दादरची लोकसंख्या धारावीच्या 25 % आहे.
महत्वाच्या बाबी –
१) “6-मिनिट चाला” तपासणी जाणा. आत्ता करून बघा. सर्वाना सांगा. आपण कोरोनाने खराब आहोत का ? जाणा.मी घरात सहज 6 मिनिटे चालेल. मला खराब वाटले, श्वास घ्यायला त्रास वाटला,किंवा छातीत धड्धडले,तर मी आजारी आहे.मला तातडीची मदत हवी आहे.मी डॉक्टरकडे जायलाच हवे.लगेच.जर मी 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर मी फक्त 3 मिनिटे चालेल.
२) मी माझी नाडी बघेल. चालण्या आधी व नंतर. ती 20 ने वाढली तर मला मदतीची गरज आहे.लगेच. नाडी अशी बघा- मनगटावर हाताची बोटं ठेवा.अंगठ्याच्या बाजूला.बोटांना नाडीचे ठोके लागतील.गळ्यात एका बाजूला बोटे ठेवा.बोटांना नाडीचे ठोके लागतील. ठोके 1 मिनिट मोजा. ते 60 ते 100 दरम्यान असतात. जर ते 60 किंवा 100 च्या जवळ असेल तर डॉक्टरांना भेटा. प्राणवायू यंत्र उर्फ प्लस ओक्स यंत्र असेल तर मी ते वापरतो. ते प्राणवायू किती आहे हे दाखविते. आणि नाडी दर पण. आपला प्राणवायू / ऑक्सिजन नेहमी 98 ते 100% असतो. जर तो 93 पेक्षा कमी असेल तर ते वाईट. डॉक्टरकडे जा. लगेच चाचणी दरम्यान प्राणवायू कमी होऊ नये.चालत असताना तो 3 ने खाली आला किंवा 93 च्या खाली गेला तर ते वाईट.लगेच डॉक्टरकडे जायलाच हवे.कोरोना किंवा इतर आजारामुळे आपण खराब आहोत की नाही हे यात कळते. ही चाचणी केव्हाही करता येते. जर मी व्यवस्थित चालू शकलो आणि प्राणवायू कमी होत नसेल तर रुग्णालयात धावण्याची गरज नाही. आपण डॉक्टरांशी फोनवर बोलू शकता.
प्लाझ्मा दान जागृती अभियान
प्लाझ्मा म्हणजे काय? रक्त प्लाझ्मा, पातळ द्रव किंवा ब्लड प्लाझ्मा हा रक्ताचा एक पिवळसर द्रव घटक आहे .हा रक्ताचा द्रव भाग आहे ज्यामध्ये माणसाच्या जीवनासाठी आवश्यक घटकद्रव्ये,पेशी आणि प्रथिने असतात. हे शरीरात रक्ताच्या प्रमाणात सुमारे ५५% असते .
प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? कोरोनातून व्याधीमुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा किंवा रक्तद्रव कोरोनाबाधित गंभीर रुग्णाला देण्याच्या प्रकियेला प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात .
कोण करू शकते प्लाझ्मा दान? कोरोना व्याधीतून पूर्णतः बरी झालेली व्यक्ती , डिस्चार्ज किंवा होम क्वारंन्टाईननंतर २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकते. वय १८ ते ६० असावे. वजन ५० किलो पेक्षा जास्त असावे.
कोरोनातून बरी झालेली व्यक्ती एकूण किती दिवस प्लाझ्मा डोनेट करू शकते? संसर्ग झाल्यापासून चार महिन्यापर्यंत प्लाझ्मा दान करू शकते. ( पहिले १४+२८ दिवस सोडून )
कोरोना संक्रमण होऊन बरी झालेली झालेली व्यक्ती किती वेळा प्लाझ्मा डोनेट करू शकते? दर १५ दिवसांनी कोरोनातून बरी झालेली व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करू शकते.
प्लाझ्मादानामुळे शरीरावर कुठले दुष्परिणाम होतात का?अज्जिबात नाही. दान केलेला ४०० ते ५०० मिली प्लाझ्मा , शरीर काही तासात पुन्हा बनवते. शरीर स्वास्थ्यावर काहीही परिणाम होत नाही .
पूर्वीचे काही आजार असतील तर प्लाझ्मादान करु शकतो काय ? थायरॉईड मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीदेखील रक्तपेढीतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मादान करू शकतात .
प्लाझ्मा दानासाठी काय पूर्वयारी काय करावी? भरपूर प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे. योग्य आहार योग्य निद्रा
साधारणपणे प्रोसीजर काय असते? पात्र व्यक्ती कडून माहितीवजा फॉर्म भरून घेतला जातो. काही तपासण्या केल्या जातात . प्लाझ्मा डोनर डोनेशनसाठी योग्य असल्याची खात्री केली जाते.
रक्त काढून झाल्यावर काय करतात ? केवळ प्लाझ्मा वेगळा काढून घेतला जातो . लाल रक्त पेशी पुन्हा शरीरात सोडल्या जातात .
किती प्रमाणात प्लाझ्मा काढून घेतला जातो ? साधारणपणे ४०० मिली प्लाझ्मा काढून घेतला जातो . एका पेशंटला एका वेळी २०० मिली या प्रमाणे वापरला जातो. म्हणजेच एका प्लाझ्मा दानातून दन रुग्णांचे जीव वाचवले जाऊ शकतात .
प्लाझ्मा डोनेशनसाठी किती वेळ लागतो ? प्लाझ्मा डोनेशनपूर्वी काही तपासण्या कराव्या लागतात त्यासाठी एक ते दीड तास लागतो .
या समाजात अनेक डोनर आहेत .मी एकट्याने प्लाझ्मा डोनेशन नाही केलं तर काय फरक पडतो ? सध्याच्या काळात अनेक ठिकाणी प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे. कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणू विरुध्द प्रतिकारशक्ती तयार झालेली असते. ही प्रतिकारशक्ती गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी फार उपयुक्त आहे.
रक्त दान श्रेष्ठ दान !
आपण सर्व मिळून कोरोनाला हरवू या .
By -डॉ गिरीश चरडे व डॉ हेमंत जोशी.