संघ लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच घोषित झालेल्या निकालानुसार ऋषिकेश विजय ठाकरे, अकोला यांचा 224 वा क्रमांक तर क्षितिज संजय गुरभेले, अमरावती यांचा 441 वा क्रमांक आल्याबद्दल त्यांचा अकोला येथील बाबूजी देशमुख वाचनालय आणि मिशन आयएएस तर्फे नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना श्री ऋषिकेश ठाकरे म्हणाले, की स्पर्धा परीक्षेमध्ये धडपड करत असताना कुठेतरी धोका पत्करावा लागतो आणि सातत्याने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे, तरच यश मिळू शकते.
श्री क्षितिज संजय गुरभेले यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, स्वयंअभ्यास फार महत्त्वाचा आहे. मात्र या सोबतच सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्ष्य ठेवतानाच योजना ब, क सुद्धा सोबत असू द्यावी म्हणजे जीवनात नैराश्य येत नाही, तर काही ना काही नक्कीच हाती लागते.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना, बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार म्हणाले की, स्पर्धा परीक्षेमध्ये विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. तो करत असताना एक प्रकारचा संयम आणि शांत मनाने विविध प्रकारच्या प्रश्नांना, परिस्थितीला सामोरे जावे लागते. म्हणजे त्या परीक्षेत आणि नंतर प्रत्यक्ष नोकरीवर लागल्यानंतर समाजातील विविध प्रश्नांना तोंड देण्याची क्षमता नक्कीच प्राप्त होते.
प्रारंभी सर्व पाहुण्यांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केल्यानंतर सोहळ्याचे प्रास्ताविक सचिव अनुराग मिश्र यांनी केले.
सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचवेळी अतिथी म्हणून उपस्थित असलेले उद्योजक श्री रमाकांतजी खेतान म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या व्यवस्थेत सरकारी अधिकारी कार्यक्रमाचे, धोरणाचे नियोजनात सहकार् करतात आणि ते यशस्वीपणे पार पाडण्याचे काम करतात. त्यांच्याकडूनही समाजाला अनेक अपेक्षा असतात ज्या पूर्ण करण्याची क्षमता या अधिकाऱ्यांमध्ये असते.
सोहळ्याचे संचालन कार्यकारिणीचे सदस्य प्रा. डॉ. मोहन खडसे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव अनुराग मिश्र यांनी केले.
या सोहळ्याला शेगाव येथील प्रशासकीय अधिकारी श्रीमती बोरकर मॅडम, दोनही यशस्वी अधिकाऱ्यांचे आई-वडील, नातेवाईक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
या अभिनंदन सोहळ्याच्या आयोजनासाठी ग्रंथपाल सतीश डगवाले, सुरेश टेके, जुगलकिशोर शिरसाट, नितीन कदम, स्वप्निल ताथोड, सुनील मिश्रा यांनी विशेष परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800