“नॉर्थ बे आयलँड”
पोर्ट ब्लेअर बीच स्थित, नॉर्थ बे हे एक निर्जन बेट आहे. जरी हे बेट रमणीय समुद्रकिनारा आणि घनदाट जंगल यामुळे जास्त प्रेक्षणीय स्थळ आहे तरीही, हे बेट ‘वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी’ म्हणजे पाण्यातील क्रीडा प्रकारासाठी सर्वोत्तम आहे.
उथळ किनार्यासह स्पटिकासम स्वच्छ निळसर रंगाच्या पाण्याने हे बेट वेढलेले आहे. समुद्रकिनारा पांढऱ्या वाळूचा आहे आणि घनदाट उष्णकटिबंधीय झाडे आसपास आहेत.
लाकडांच्या बनवलेल्या टुमदार झोपड्या ज्या नारळाच्या झावळ्यांनी साकारलेल्या आहेत, ही इथली विश्राम स्थळे अप्रतिम सुंदर आहेत. उत्तर उपसागरातील जैवविविधता अतुलनीय आहे आणि काही सर्वात चांगले प्रवाळ वसाहतींमध्ये अनेक माशांच्या प्रजाती आहेत, ज्यापैकी काही अंदमानात इतर कोठेही पाहायला मिळत नाही.
नॉर्थ बेकडे स्वतःची जेट्टी नाही परंतु सरकारद्वारे बनवलेल्या तरंगत्या प्लॅटफॉर्मवरून बोटीतून जावे लागते. प्लॅटफॉर्म मजबूत आहे. तरी पण पर्यटकांना काळजी घ्यावी लागते. आपल्या 20 रुपयाच्या नोटेवर जे दृश्य आहे ते ‘नॉर्थ बे आयलँड’चे दृश्य आहे, असे म्हणतात. ते नेमके कोणत्या कोनातून कसे काढले आहे याबद्दल शंकाच आहे! ज्या टेकडीतून ते घेतले होते तिथपर्यंत जंगलातून आत जाता येत नाही. पण तरीही अनेक पर्यटकांनी तसा काहीसा कोन शोधून स्वतःचे फोटो काढलेले आपल्याला सोशल मीडियावर दिसतात.
नॉर्थ बे बेटावर करण्याच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत :
स्कूबा डायव्हिंग.
सी वॉक.
पॅरासेलिंग.
डॉल्फिन ग्लास बॉटम बोट.
कोरल सफारी सबमरीन राइड
स्नॉर्कलिंग
स्कूबा डायव्हिंग :
‘स्कूबा डायव्हिंग’ हा अंदमानमधील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. आणि नॉर्थ बे आयलँडवरचा अनुभव फारच आनंददायी आहे. अंदमनातील पाच महत्त्वाच्या स्थळांमध्ये हे स्थळ गणले गेले आहे. अतिशय स्वच्छ पाणी असल्यामुळे समुद्री जीव आणि प्रवाळ नजरेला व्यवस्थित पाहता येतात.
अनेकांनी अनेक ठिकाणी सी वॉक (sea walk) केलेले असते परंतु नॉर्थ बेचे सी वॉक हे अतिशय वेगळे आहे कारण येथून आसपासच्या मोहक परिसराचे व्यवस्थित दर्शन सी वॉक दरम्यान होते.
पॅरासेलिंग करण्यासाठी लागणारे वातावरण म्हणजे मुख्यत्वे ‘वारा’ नॉर्थवे आयलँड वर व्यवस्थित आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे पॅरासेलिंगही करतात. साधारण ४५ मिनिटांच्या या भ्रमणात तुम्हाला ‘नॉर्थ बे आयलँड’वरून प्रवास सुरू करून ‘रॉस आयलँड’वर फिरवून आणून परत नॉर्थ बे आयलँडवर आणतात.
अंदमानातील इतर सर्व समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे इथेही अतिशय उत्कृष्ट स्थितीत असलेल्या कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या आहेत. वॉशरूम्स आहेत. बाजारहाट करण्यासाठी दुकाने आहेत त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचे असंख्य स्टॉल्सही आहेत.
का कुणास ठाऊक पण नॉर्थ बे या बेटावर आल्यावर खूप पूर्वी वाचलेल्या इंदिरा संत या कवयित्रीच्या चार ओळी आठवल्या-
“निर्मल निर्भर वातावरणीं
धुकें तरंगे धूसर धूसर
झगमगते अन नक्षी त्यावर
सोनेरी किरणांची सुंदर …..”
क्रमशः
— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800