Homeलेखइराण इस्रायल युद्ध : आपण सावध राहू या !

इराण इस्रायल युद्ध : आपण सावध राहू या !

तिसरे महायुद्ध सुरू झाल्यात जमा आहे. नेमके महायुद्ध सुरू झाले केव्हा म्हणायचे, त्याची शास्त्रोक्त व्याख्या काय या भानगडीत पडण्याची गरज नाही. जे समोर दिसते ते स्फटिकासारखे स्वच्छ आहे.

हे युद्ध काही देशांपुरते मर्यादित राहिले नाही आता. सगळ्या जगाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे त्याच्या झळा पोहोचत आहेत. या युद्धाचे दूरगामी परिणाम अख्ख्या जगाला पुढे कितीतरी वर्ष भोगावे लागणार आहेत. समस्या सध्या वरवर दिसते तितकी साधी सोपी नाही. ती अतिशय गंभीर आहे. अधिक गंभीर होत जाणार आहे. हा काही मोजक्या देशांचा प्रश्न राहिलेला नाही आता.या युद्धाचे परिणाम सर्व खंडातील सर्व देशांना, लहान मोठ्या नागरिकांना भोगावे लागणार आहेत. कितीतरी काळ भरून न येणाऱ्या या जखमा आहेत.

या आपत्कालीन परिस्थिती मागचे गांभीर्य आपण समजून घेतले पाहिजे. त्या दृष्टीने सावधगिरीचा पावले उचलली पाहिजेत. हे वेळच्यावेळी प्रत्येक देशाला,येथील शासनाला, मुख्य म्हणजे नागरिकांना समजले पाहिजे.
युद्ध का सुरू झाले, कुणी सुरू केले,त्यात चूक कुणाची, सत्य कुणाच्या बाजूने ही चर्चा हे सगळे सुरू झाल्यावर वायफळ ठरते. व्हायचे ते घडून गेले आहे.परिणाम स्वरूप जे होणार आहे ते टाळणे अशक्य आहे. हातातून बाण सुटल्यावर मग कितीही पश्चात्ताप केला तरी फायदा नसतो. मूठभर शासन कर्त्याची मस्ती, अहंकार, सत्ता, वर्चस्व गाजविण्याचा अट्टाहास यातून ही सगळे घडते आहे.एकीकडे आपण शांती, विकास, सहयोग,सहृदयता, करुणा.. अशा मोठमोठ्या गप्पा मारतो अन् दुसरीकडे आपल्या यत्किंचित स्वार्थासाठी, सत्ता लालसेसाठी दुसऱ्याचा गळा कापतो. निरपराध स्त्रिया, बालके, सामान्य नागरिक यांचे निर्घृणतेने जीव घेतो. आपल्याला धड शेजारधर्म देखील पाळता येत नाही मानवतेच्या भूमिकेतून.

हे सर्व पाहून असा प्रश्न पडतो की काय उपयोग आहे शिक्षणाचा, तांत्रिक प्रगतीचा, मानवी कृत्रिम बुद्धिमत्तेचा, धार्मिक शिकवणीचा, पारंपरिक संस्कृतीचा ? काय शिकवले जाते जगातील नामवंत विद्यापीठातून ? कसली संस्कृती, कसला अभिमान, कसला इतिहास, कसली संगणक क्रांती,अन् कसले काय ? एकीकडे महात्मा गांधी, गौतम बुद्ध, मदर तेरेसा, लिंकन,वगैरे महान व्यक्तीचे गोडवे गायचे, त्यांचे पुतळे उभारायचे अन् दुसरीकडे रक्ताच्या चिरकांड्या उडवत निरपराध सामान्य नागरिकांचे, बायका मुलांचे प्राण घ्यायचे ? कुठे आहे जागतिक सहकाराची भावना, एकमेकांना समजून घेण्याची करुणा, सहानुभूती, दया माया?

हे असेच चालणार आहे. सगळ्यांनी मुखवटे घातले आहेत आपले असली चेहरे लपविण्यासाठी. हे नाटक आपण समजून घेतले पाहिजे.त्यापासून वेळीच सावध व्हायला पाहिजे.

या युद्धाचे परिणाम प्रत्येकाच्या आरोग्यावर होतील. शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक असे सर्व प्रकारचे आरोग्य धोक्यात येईल. आपण आता पर्यंत जो विकास केला, तांत्रिक प्रगतीच्या गप्पा मारल्या त्या प्रक्रियेला आता खीळ बसेल. ब्रेक डॉउन होईल इण्डस्ट्रीत, उद्योगात होतो तसा. आपली शिक्षण व्यवस्था,आर्थिक ताळेबंद सारे एका वादळात कोलमडून पडणाऱ्या वृक्षासारखे भुई सपाट होईल. जगण्याचे अर्थ बदलतील. नव्या पाटीवर नवे अध्याय लिहावे लागतील. नवी मुळाक्षरे गिरवावी लागतील. सगळेच आरपार बदलेल येत्या काही वर्षात.. तेही आपण कल्पना करू शकणार नाही इतक्या झपाट्याने, वेगाने बदलेल. इंधन तुटवडा प्रचंड वाढेल. गॅस, विद्युत पुरवठा,पेट्रोल हे आपल्या जगण्याचे श्वास झाले आहेत आता. त्याचा प्रचंड तुडवडा भासेल. त्याचे परिणाम सर्व उद्योग, वाहतूक, बाजारपेठ,खरेदी विक्री..अशा सर्व क्षेत्रात दिसून येतील. त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे. या गंभीर परिस्थितीचा सामना करणे एकट्या सरकारला शक्य होणार नाही. आपणही सरकारचा एक भाग आहोतच की ! आपल्याला घरचे इंधन, वीज, राशन सगळे काही जपून वापरावे लागेल. काटकसर करावी लागेल प्रत्येकाला. आपल्याला चैनीची सवय झालीय गेल्या काही काळात. आता या चंगळवादाला लगाम घालावा लागेल. फक्त काहींनी ही शिस्त पाळायची अन् इतरांनी मौजमजा करायची हे चालणार नाही. परिस्थितीचे भोग भोगायचे तर सर्वांनाच एका पातळीवर यावे लागेल.

एका अर्थी हे चांगले लक्षण मानायला हरकत नाही. या निमित्ताने का होईना आपल्यातला सर्वधर्म समभाव जागेल. कारण आता आपण सगळे एकाच बोटीचे प्रवासी आहोत. या बोटीला छिद्रे पडली आहेत.प्रचंड वेगाने पाणी आत शिरायला लागले आहे. त्यामुळे सगळे प्रवासी धोक्यात आहेत. यात लहान मोठा, गरीब श्रीमंत, या जाती धर्माचा त्या वर्गाचा असे भेदभाव नाहीत.सगळेच बुडणार किंवा तरणार एकत्र !!
आपल्याजवळ कितीही पैसा असला तरी तो उपयोगाचा नसतो,संकटकाळी कुणीच कुणाचे नसते हे आपण चार पाच वर्षांपूर्वीच करोना काळात चांगले अनुभवले आहे. (पण त्यातून जे शिकायचे ते आपण शिकलो नाही हेही तितकेच खरे.. आता हा हलगर्जीपणा चालणार नाही.) येणारी आपदा करोना काळापेक्षाही भयानक असणार आहे. एक विषाणू, त्याचा काहींना संसर्ग एवढ्या पुरते ते संकट मर्यादित होते. काही पथ्ये पाळली, विशिष्ट काळजी घेतली तर त्यातून आपण स्वतःचा बचाव करू शकत होतो. हे महायुद्धाचे संकट तसे नाही. हे चहू बाजूंनी येणाऱ्या त्सुनामी वादळासारखे आहे. एकाच वेळी अनेकाना कवेत घेणारे, सामूहिक निर्दयी विनाश करणारे..लवकर बऱ्या न होणाऱ्या खोल विषारी जखमा करणारे. त्यापासून बचाव करणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी सर्वांना हातात हात घालून सामूहिक प्रयत्न करावे लागतील. आपल्याला यातून अलग करता येणार नाही कुणालाच. ती व्यक्ती असो, प्रांत असो, देश असो सगळेच पोळून निघतील या ज्वालामुखीमुळे.त्यामुळे जे काही प्रयत्न करायचे ते मिळून, संघिकरीत्या करावे लागतील. यासाठी आपल्या सगळ्यांना शहाणे व्हावे लागेल. पदवी घेऊन माणसे शहाणे होत नाहीत हे आता सिध्द झाले आहे. या युद्धानेच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शहाणे, समंजस, दयाळू होणे ही येत्या काळाची प्राथमिक गरज आहे. समाजात गुण्यागोविंदाने राहायचे तर परस्परांविषयी दया, करून सहानुभूती हवीच. फक्त स्वतःचा विचार करून जगता येणार नाही यापुढे. अवतीभवतीच्या समाजाचा, देशाचा,जागतिक परिस्थितीचा विचार करावाच लागेल प्रत्येकाला.कारण आपल्या जीवनाचे दोर बांधले गेले आहेत इतरांच्या जीवनाला. हे जीवनाचे जाळे दूरवर पसरले आहे. प्रत्येक जण आता एक दुसऱ्यावर अवलंबून आहे.

काही प्रमाणात हे परावलंबित्व मान्य केले तर ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या बाबतीत तरी आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेलच. अडचणी दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याने निर्माण होतात.पेट्रोल, गॅस मिळाले नाही तर काय होईल,वीज बंद झाली तर काय होईल, धान्य उत्पादन खंडित झाले तर काय होईल, असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत. अन्न, वस्त्र,निवारा,आरोग्य,या बाबतीतल्या मूलभूत गरजा आपण आपल्याच पद्धतीने भागवल्या पाहिजेत. त्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये. चैन, चंगळ, मज्जा हा नंतरचा भाग झाला. जगण्यासाठी ते तितके महत्त्वाचे नाही. मृगजळा पाठीमागे धावण्यापेक्षा आपला आनंद कशात आहे हे आता आपण समजून घेतले पाहिजे. यश त्यासाठी लागणारा पैसा, करावी लागणारी धावपळ यातून ज्याला आपण सात्विक आनंद म्हणतो तो मिळेलच असे नाही.

वर शहाणे होण्याचा उल्लेख आहे तो याच संदर्भात. आपले सुख,आपला आनंद नेमका कशात आहे याचा शोध घेत, येणाऱ्या युद्धाच्या सावल्याचा वेध घेत केवळ स्वतःचा विचार न करता, इतरांना बरोबर घेत वाटचाल करणे म्हणजेच जागे होणे, शहाणे होणे, माणूस होणे होय.

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. इराण इस्त्रायल युद्धाच्या भयानक परिस्थितीत भारतीयांनी सावध भूमिका घेण्याचे शब्दांकन विचारप्रवर्तक आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments