निसर्गसुंदर भरतपूर किनारा
शहीद द्वीप (पूर्वीचे नाव नील बेट) येथे नील जेट्टीवर प्रवेश केला आणि एखादा स्वर्गात आल्यासारखे जाणवले. पोर्ट ब्लेअर ते शहीदद्वीप पर्यंत नियमित सरकारी फेरी आहेत. मकरुझ, ग्रीन ओशन, नौटिका आणि आयटीटी मॅजेस्टिक सारखी खाजगी क्रूझ जहाजे आहेत. यापैकी आम्ही आयटीटी मॅजेस्टिक या क्रुझवरून इथे पोहोचलो. सामान जेट्टीवरून बाहेर नेण्यासाठी काही हातगाड्यांची सोय केलेली आहे बाकी आपण चालतही अर्धा किलोमीटर जाऊ शकता! या जेट्टीवरून जाण्याचा जो मार्ग आहे तो इतका सुंदर आहे की तिथेच आम्ही अर्धा पाऊण तास घालवला. निळाशार सुंदर समुद्र आणि आसपास असंख्य वेगवेगळ्या प्रकारची हिरवीगर्द झाडे. या अर्धा किलोमीटर अंतरावर काही शेड्सही केलेल्या आहेत ज्या आकर्षक आहेत.
रिमझिम पावसाने आमचे स्वागत केले. या जेट्टीवरून आम्ही पाच मिनिटांमध्ये आमच्या रिसॉर्ट्सला पोहोचलो, ज्याचे नाव ‘कोरल गार्डन रिसॉर्ट’ हे ४.५ स्टार रिसॉर्ट आहे. अत्यंत सुंदर अशा लाकडी रो हाउस असलेले हे रिसॉर्ट. प्रत्येक रो हाउसला बाहेर बसण्यासाठी छोटीशी गॅलरी आहे ज्यात खुर्च्या ठेवलेल्या होत्या. इथे बसून आपण संपूर्ण आवारातील फुलझाडं, फळझाडं तसेच त्यांच्यावर उडणारे असंख्य पक्षी, फुलपाखरे सहज पाहू शकत होतो. मोहात पडावे आणि कायमचे वास्तव्य इथेच असावे असे वाटणारे हे स्वप्नवत ठिकाण. अतिशय उत्तम ब्रेकफास्ट सहित सर्व जेवणाची आमची उत्तम काळजी घेतल्या गेली.
शहीद द्वीप हे अंदमान बेटांपैकी एक बेट आहे, जे रिचीच्या द्वीपसमूहात आहे. हे दक्षिण अंदमान प्रशासकीय जिल्ह्याचे ठिकाण आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा एक भाग आहे. हे बेट पोर्ट ब्लेअरपासून ३६ किमी अंतरावर आहे. १३.७ चौरस किलोमीटर एवढेच शहीद दीप छोटेसे बेट आहे त्यामुळे आपण या बेटावर आरामात सायकलने किंवा चालतही फिरू शकतो ! तशी इथे बस सेवा आणि रिक्षा सेवाही उपलब्ध आहे. या बेटावर साधारण ३५०० इतकी लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या सीतापूर, भरतपूर, नीलकेंद्र, लक्ष्मणपूर, रामनगर या भागात विभागलेली आहे.
नील बेट हे कमी लोकवस्ती असणारे आहे आणि येथे राहणारे लोक अतिशय साधे जीवन जगतात. साधारण १९.४ किलोमीटरचा किनारा या बेटाला लाभलेला आहे.
नील बेटाचे नाव ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल जेम्स नील यांच्या नावावर ठेवण्यात आले होते, ज्यांनी १८५७ च्या सिपाही बंडात ब्रिटिश ईस्ट इंडियन कंपनीच्या बाजूने लढा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०१८ नील बेटाचे नाव बदलून ‘शहीद द्विप’ ठेवण्याची घोषणा केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली म्हणून हे नामकरण करण्यात आले. बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय ध्वज फडकावला होता आणि अंदमान आणि निकोबार बेटांना ब्रिटिश राजवटीतून मुक्त केलेला प्रदेश म्हणून घोषित केले होते. त्यानंतर त्यांनी अंदमान बेटाचे शहीद आणि निकोबार बेटाचे नाव स्वराज्य ठेवले गेले होते.
येथील भूभागाचा बराचसा भाग भातशेतीसाठी योग्य म्हणून वापरला जातो. त्यामुळे या भागात वनक्षेत्र कमी आहे. शेती हा गावकऱ्यांचा प्राथमिक व्यवसाय आहे. या बेटावरून अंदमानच्या उर्वरित भागात भाजीपाला पुरवठा केला जातो. ज्यामध्ये कोणत्याही रासायनिक- आधारित खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पिकांची वाढ आणि संगोपन समाविष्ट असते. येथील माती नैसर्गिकरित्या सेंद्रिय आहे जी भाज्यांची गुणवत्ता टिकवून ठेवते आणि त्यांना रसायनमुक्त, ताजी आणि निरोगी ठेवते.
नील बेट त्यांच्या परंपरागत शेती व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. सेंद्रिय लागवड करून बेटांच्या उर्वरित भागांना बरेचसे सेंद्रिय उत्पादन पुरवण्याचे काम येथून केले जाते. म्हणूनच या भागाला ‘व्हेजिटेबल बाउल’ असेही म्हटले जाते. त्यामुळे हे बेट शाकाहारी जेवणासाठी जास्त प्रसिद्ध आहे.
शहीद द्वीप जंगलाच्या कमतरतेमुळे हॅवलॉकपेक्षा एक अंश किंवा दोन अंश जास्त उबदार असते. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, बनाना बोट राइड, जेट स्की राइड आणि ग्लास बॉटम बोट राईड अशा अनेक जलक्रीडा उपक्रम भरतपूर किनाऱ्यावर उपलब्ध आहेत. नील बेटाच्या भरतपूर बीचवर पाण्याशी संबंधित सर्व काही करता येते.
आम्ही सर्वांनी एकत्रितपणे ‘ग्लास बॉटम बोट राईड’ चा आनंद घेतला. अतिशय नितळ, स्वच्छ पाणी असल्यामुळे आम्हाला विविध रंग आणि आकारांचे प्रवाळ तसेच खूप सारे मासे पाहायला मिळाले. एक पानसर्प सुद्धा बराच वेळ पाहता आला.
नील बेटावरील भरतपूर किनाऱ्यामधील आणखी एक लोकप्रिय जलक्रीडा म्हणजे कयाकिंग किंवा पॅडलबोर्डिंग. पॅडल बोर्ड आणि कयाक भाड्याने घेऊन समुद्र किनाऱ्यावर सुरक्षितपणे वापरता येते. एक कयाक पॅडल उचलणे आणि समुद्राच्या पलीकडे सरकण्यासाठी सज्ज करण्यासाठी तिथे मदतनीस उपलब्ध आहेत. आम्ही या सर्व जलक्रीडांचा स्वतः आनंद जरी घेतला नाही तरी इतर पर्यटकांना या झलक क्रीडांचा आनंद घेताना पाहण्याचा आनंदही अनुभवला. अंदमानातील इतर
किनांऱ्याच्या मानाने भरतपूर किनाऱ्यावर सगळ्या जलक्रीडा स्वस्त आहेत.
भरतपूर किनाऱ्यावर अत्यंत सुंदर मुलायम पांढरीशुभ्र वाळू आहे .त्यात खेळण्याचा आनंद आहेच परंतु येथे लाभलेल्या किनाऱ्यावर पाणी थोडेसे उथळ आहे .त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोहण्याचा आनंद पर्यटक घेतात जो आनंद आम्हीसुद्धा घेतला. तासनतास शांतपणे पाण्यात बसून राहण्याचासुद्धा वेगळाच आनंद होता. समोरच सुरक्षा व्यवस्था दिसून आली जिथे चार-पाच मुले संपूर्ण किनाऱ्यावर लक्ष ठेवून होती. त्यांच्याकडे मदतीसाठी छोट्या बोटी उपलब्ध होत्या हे पाहून आम्ही अजूनच निश्चितपणे पाण्यात खेळण्याची मजा घेतली.
इथे आंघोळीसाठी तसेच कपडे बदलण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. एका पूर्ण कुटुंबाला शांतपणे झोपता येईल एवढ्या मोठ्या आकाराचे चटया भाड्याने घेता येतात ज्या घेऊन त्यावर झोपून आम्ही समुद्राची गाज अनुभवली.
या किनाऱ्याच्या बाहेर फार मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक विक्रेते आम्हाला शंख -शिंपले इत्यादींच्या वस्तू विकताना आढळले. आपल्या आवश्यकतेनुसार या आपल्याला ताबडतोब बनवून देतात.
शहीद द्वीप या बेटावरील प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे ‘सुभाष मेला’ असून हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो. हा उत्सव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला जातो. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पारंपारिक वेष परिधान करून स्थानिक लोक पारंपारिक अन्न शिजवतात आणि पर्यटकांसोबत आनंद साजरा करतात.
नील बेटाच्या अस्पर्शित सौंदर्यामुळे ते सागरी कासवांसाठी एक परिपूर्ण राहण्याचे ठिकाण आहे. जर असे अनेक हे आश्चर्यकारक प्राणी पाहायचे असतील तर ‘सर ह्यू रोज’ या बेटाकडे आपण जाऊ शकतो. नील बेटाच्या टोकावर असलेले हे छोटे बेट ज्याला स्थानिक भाषेत ‘स्मॉल नील’ म्हणून ओळखले जाते. परंतु तिथे जाण्यासाठी तुम्हाला वेगळी परवानगी घ्यावी लागते कारण तो भाग संरक्षित प्रदेश आहे.
भरतपूर किनाऱ्यावर निसर्ग सौंदर्य न्याहाळत आम्ही खूप सारे फोटो काढले. फोटो काढण्यासाठी आमची एक मैत्रीण झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होती इतक्यात मला झाडाच्या डोलीतून एक साप आपली जीभ बाहेर काढत, आतबाहेर जाताना दिसला आणि आम्ही त्या उत्साही मैत्रिणीला झाडावर न चढण्याचा सल्ला दिला.
भरतपूर किनाऱ्यावर भल्या पहाटे गेल्यावर आम्हाला तिथे छोटी छोटी बेटं असल्यासारखी दिसली. म्हणजे वाळूच्या गोलाकार भागाच्या भोवती पाणी साठलेले होते ते दृश्य नयनरम्य होते. त्या भागावर जाऊन नाचण्याचा, गाण्याचा आनंद आम्ही उपभोगला !
या बेटावर मला एक पाटी दिसली त्यावर लिहिले होते…
The Beach is not a Bin !
मला असे वाटते की अशी पाटी जगात कोणालाही कोणत्याही ठिकाणी लावायला लागू नये, याची काळजी पर्यटकांनीच घ्यायला हवी !
असा हा सुंदर भरतपूर किनारा आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
क्रमशः
— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800