भारतीय लोक लोककलांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावं म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कल्पनेतून, भारत सरकारने १९८८ साली “अपना उत्सव” देश विदेशात भरवण्याचे ठरविले होते. या “अपना उत्सव” पथदर्शी कार्यक्रम/माहितीपट बनवून तो दिल्ली ला पाठविण्याची जबाबदारी मुंबई दूरदर्शन केंद्रावर आली. केंद्र संचालकांनी हा कार्यक्रम बनविण्याची जबाबदारी निर्माते सुधीर पाटणकर यांच्या वर सोपविली. त्यांच्या सोबत तेव्हा निर्मिती सहायक म्हणून मी होतो.
चित्रीकरण पथकाचे प्रमुख निर्माते सुधीर पाटणकर, निर्मिती सहायक म्हणून मी, कॅमेरामन अजित नाईक, ध्वनी मुद्रक पगारे,त्यांचे सहायक म्हस्के असे आमचे पथक, दूरदर्शन च्या १० आसनी मेटाडॉर ने मजल दर मजल करीत १९८६ च्या डिसेंबर महिन्यात पणजी येथे पोहोचले.
पणजीतील गोवा कला अकादमीचे प्रमुख आणि गोव्याच्या लोक कलेचे अभ्यासक विनायक खेडेकर यांनी आमच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्था कला अकादमीच्या विश्रामगृहातच केली होती. तसेच गोव्यातील लोककला मंडळांशी संपर्क साधून सर्व चित्रीकरणाचा समन्वय वगैरे सर्व बाबी त्यांनीच सांभाळल्या होत्या.
आम्ही अक्षरशः अहोरात्र तीन दिवस गोव्याच्या विविध भागात जाऊन त्या त्या भागातील लोक कलांचे चित्रीकरण केले. आजच्या सारखी चित्रीकरणासाठी अनेक कॅमेरे वापरण्याची त्यावेळी दूरदर्शन ची ऐपत नव्हती. त्यावर उपाय म्हणून अजित स्वतःची कल्पकता वापरून एकच नृत्य, अन्य कला प्रकार त्या त्या कलाकारांना तीनदा करायला लावीत असे. काही वेळा तर नृत्यांगनांच्या थिरकणाऱ्या पावलांचे क्लोज अप घेण्यासाठी तो अक्षरशः जमिनीवर आडवा पडून, कपडे खराब होतील वगैरे अशा क्षुद्र बाबींची चिंता न करता, चित्रीकरण करीत असे. अजूनही ती दृश्ये माझ्या डोळ्यासमोर येतात तेव्हा तेव्हा मला त्या नृत्यांगणा, त्यांचे नृत्य, सौंदर्य, वेशभूषा, केशभुषा असे काहीही आठवत नाही पण आठवते ते अजित ने जमिनीवर आडवे पडून केलेले चित्रीकरण. अजित आपल्या कामाला कसा वाहून घेत असे, हे या सर्व चित्रीकारणातून दिसून आले.
पुढे आम्ही मुंबईत परतल्यावर “गोवा की लोककला” या नावाचा अर्ध्या तासाचा हिंदी माहितीपट बनवून दिल्ली ला पाठविला. तेथील स्क्रिनिंग कमिटीने तो पाहून मंजूर केल्यावर राजीव गांधी यांनाही दाखविण्यात आला. त्यांची ही पसंतीची मोहोर उमटल्यावर तो माहितीपट राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झाला. त्यावेळी एखाद्या दूरदर्शन केंद्राचा कार्यक्रम/ माहिती पट/ नाटक असे काहीही राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झाले की तो त्या त्या केंद्राचा, निर्मात्याचा आणि पर्यायाने सर्व टीमचा मोठाच गौरव समजला जात असे.
या माहितीपताची उत्कृष्ट निर्मिती होण्यात अजितचा सिंहाचा वाटा होता. केवळ निर्मात्याने सांगितल्या प्रमाणेच चित्रीकरण न करता, किंवा पठडीतील चित्रीकरण न करता स्वतःची कल्पकता अधिकाधिक कशी वापरता येईल याचा तो सतत विचार करीत आला आहे. प्रसंगी दिग्दर्शकाला तसे सांगून तो शॉट्स घेत असतो. त्यामुळे दूरदर्शनच्या बऱ्याचशा चाकोरीबध्द कामात, चित्रीकरणात तो रमू शकला नाही.
अजित च्या अजातशत्रू स्वभावामुळे त्याचे ज्यांच्याशी एकदा मैत्र जुळले ते कायम राहिले. स्मिता पाटील ही त्याची दूरदर्शनवरील अत्यंत आवडती निवेदिका होती. पुढे वृत निवेदिका म्हणून काम करताना तिच्या जिद्दीचे आणि अभिनयातील पॅशनचे किस्से सांगताना “आज ती असायला हवी होती” ही हळहळ त्याला आजही वाटत राहते.
अजित च्या गुण वैशिष्ट्यामुळे त्याला एक सुसंधी चालून आली, ती म्हणजे रामानंद सागर निर्माण करीत असलेल्या रामायण या दूरदर्शन मालिकेच्या चित्रीकरणाची.

खरं म्हणजे, त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की रामायण मालिका जगभर लोकप्रिय होईल, लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडील, प्रसारणाच्या त्या तासात सर्व व्यवहार, वाहतूक ठप्प करेल, एखाद्या वस्तीत असणाऱ्या एकाच टिव्ही भोवती सर्व जण गर्दी करून रामायण बघत बसतील वगैरे… पण आपल्या आवडीच्या कामात अजित जरी रंगून गेला तरी सरकारी कायदे, नियम याचा झटका त्याला बसलाच. दूरदर्शन मधील नोकरीतील त्याची गैर हजेरी काही सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांना खुपायला लागली. शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली की, एक तर त्याने मुकाटपणे दूरदर्शन ची नोकरी करावी किंवा दूरदर्शन ची नोकरी सोडून पूर्ण वेळ “रामायण” चे चित्रीकरण करावे. अजित ने अत्यंत कठीण असा निर्णय घेतला, तो म्हणजे दूरदर्शनची नोकरी सोडण्याचा. खरं म्हणजे तो पर्यंत अजित ची दूरदर्शन मधील नोकरी १९ वर्षांची झाली होती. शहाण्या, सूरत्या व्यावहारिक सरकारी नोकराप्रमाणे तो असा विचार करू शकत होता की, आणखी १ वर्षे नोकरी केली की, २० वर्षे सेवा होईल आणि मग स्वेच्छा निवृत्ती घेऊन नंतर आपण मनाप्रमाणे काम करीत राहू. पण त्याने असा विचार न करता दूरदर्शन ची नोकरी तडकाफडकी सोडली आणि पुढे रामायण पूर्ण होईपर्यंत, त्याने स्वतःला रामायण साठी वाहून घेतले.

त्यावेळी आजच्या सारखे मोबाईल नव्हते. रामायण मालिकेचे चित्रीकरण गुजरात मधील उंबरगाव येथे होत असे.
मुंबई – उंबरगाव हे अंतर रोज जा ये करण्याइतपत जवळ नव्हते. त्यामुळे बऱ्याच कलाकारांसह चित्रीकरण, संकलन, मेकप, स्टुडीओ कर्मचारी अशा शेकडो लोकांना सलग सहा सहा महिने उंबरगाव येथे राहावे लागत असे. कितीतरी लोकांच्या घरी फोन सुध्दा नव्हते. त्यामुळे एकदा फोन वर बोलणे झाले की, पुढचा फोन कधी करणार, याची वेळ आधीच ठरवून घ्यावी लागत असे. उंबरगाव येथे केलेली निवास, भोजन व्यवस्था सर्वांना मान्य करावी लागत असे. दुसरा काही पर्याय नसे. अशा या सर्व परिस्थितीत “रामायण” घडत होते.

रामायण मालिका संपली. या मालिकेत राम झालेले अरुण गोविल आणि अन्य प्रमुख कलाकार जात तिथे लोक त्यांच्या पाया पडत असत. इतका रामायण मालिकेने महिमा निर्माण केला होता. त्याचा बऱ्याच वेळा अजित ने देखील अनुभव घेतला. रामायण मालिकेनंतर अजित ने अनेक मालिका केल्या. अनेक माहिती पट बनविले. बीबीसी, ए एन आय आणि अन्य काही आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांसाठी विविध प्रकारचे चित्रीकरण केले आणि वयाची शहात्तरी ओलांडली, तरी तो अजूनही पूर्वीच्याच धडाडीने काम करत असतो.
तसे पाहिले तर अजित ला छायाचित्रण कला, त्याचे वडील, चित्रपट सृष्टीतील नामवंत, कल्पक कॅमेरामन पांडुरंग नाईक यांच्या कडू च मिळाले. वडिलांचे काम बघतच त्याने छायाचित्रणाचे धडे गिरवले. जाहिरात क्षेत्रातील गौतम राजाध्यक्ष आणि विलास भेंडे हे त्यांचे गुरू. छायाचित्रणासाठी लागणाऱ्या प्रकाश योजनेपासून ते मेकअप किंवा कपड्यांच्या रंगसंगतीचा मेळ कसा साधावा याचे मूलभूत शिक्षण या दोघांकडून त्याने आत्मसात केले. पण नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे फिल्म चा वापर हळूहळू कमी होत जाईल याचा अंदाज आल्याने अजित ने वेळीच इलेक्ट्रॉनिक कॅमेऱ्याचे तंत्र अवगत करून तो फिल्म इंडस्ट्री सोडून दूरदर्शन मध्ये आला. तेव्हा दूरदर्शन हे कृष्णधवल माध्यम असल्याने आतासारखी रंगांची उधळण करणारे चित्रीकरण करणे ही अत्यंत जिकिरीची आणि बुद्धिमत्तेचा कस लावणारी बाब ठरत असे.

मृदू स्वभाव व कोणत्याही जबाबदारीस सदैव तत्पर असणारा अजित क्रिकेटच्या मॅचचेही उत्कृष्ट चित्रीकरण करणारा कॅमेरामन म्हणून ओळखला जातो. आता एक मॅच चित्रित करायची झाल्यास चाळीस कॅमेरांचा ताफा स्टेडियम व्यापून टाकतो; परंतु तेव्हा इनमिन चार-पाच कॅमेऱ्याने लाईव्ह चित्रणाची किमया साधणे अत्यंत अवघड काम होते. अजितचा कॅमेरा सीमापार वेगाने जाणाऱ्या चेंडूला फॉलो करताना प्रेक्षक घरी बसूनच स्टेडियममध्ये मॅच बघितल्याचा आनंद लुटत असत.
अजित चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तो नेहमी कुणाच्याही मदतीसाठी धावून जातो. वेळ प्रसंगी आपल्या ओळखी पाळखींचा उपयोग करतो. यामुळे नवोदित कलाकारांना, तंत्रज्ञ यांना अजित चा मोठाच आधार वाटतो.
विशेष म्हणजे अजित ची पत्नी, मीनल देखील प्रदीर्घ काळ माहिती पट, दूरदर्शन कार्यक्रम यासाठी निवेदन लिहिणे -करणे,
मराठीतून इंग्रजीत अनुवाद करणे अशा प्रकारे माध्यमातच कार्यरत राहिली आहे. मुलगा शौमित (ह्या नावाचा इतिहास म्हणजे हे बंगाली नाव असून ते सुहासिनी मुळगावकर यांनी ठेवले आहे!) आजोबा, वडील यांच्याच पावलावर पाऊल टाकत कॅमेरा कामातील कसब दाखवित असतो. मुलगी, ऋत्ता ने ग्राफिक डिझाईनर म्हणूनच करिअर निवडले आहे. अशा प्रकारे हे सर्व कुटुंबच माध्यमात रंगले आहे.

असा हा अजित आजपर्यंत आपल्याला जे ज्ञानभंडार मिळाले, ते केवळ स्वतःकडेच न ठेवता ते तो चित्रपट अभ्यासक्रमांसाठी सुरू झालेल्या संस्थांना देत असतो. वयाची शहात्तरी ओलांडूनही कामावरील नितांत प्रेम, सतत ची सक्रियता त्याच्या शंभरी पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही. अजित च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Evergreen TV Serial .. remarkable cinematography…..
. by my dear friend AJIT
God bless him …
Ajit”s contribution is remarkable in Television industry. He is hard working & always smiling technician. God gifted person & always helping friend.