मुंबई मराठी साहित्य संघाने, आत्तापर्यंत ठाणे, डोंबिवली, वसई इत्यादी मुंबई लगतच्या ठिकाणी ‘महानगर साहित्य संमेलने घडवून आणली आहेत. पण यावर्षीचे हे अठ्ठेचाळीसावे संमेलन महानगरी मुंबई तसेच मुंबईची जीवनरेखा असलेल्या लोकलला समर्पित असल्याने व्यासपीठावर लोकलच्या डब्याचे नेपथ्य होते.संपूर्ण संमेलन या डब्यात घडवून आणले गेले. यानिमित्ताने आशिया खंडातील पहिली रेल्वेचालक सुरेखा यादव यांचा सत्कार करण्यात आला.
संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले की साहीत्यिकांमधील रिजिडीटी कमी झाली तर साहित्य जास्त निकोप निर्माण होईल ! अशा समारंभांच्या निमित्ताने सर्वव्यापी होणं हे धोरण जेव्हा साहित्य स्वीकारते तेव्हा एकूणच समाज सुधारण्याला पोषक वातावरण तयार होतं. साहित्याला तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळे पर्याय काही शोधू शकतो का? यावर चिंतन होणे अशा संमेलनांमधून आवश्यक आहे.
संमेलनाचे उद्घाटक राष्ट्रपती शौर्यपदक विजेते वरीष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, युवा पिढीसाठी केवळ बुद्ध्यांक वाढवणारी प्रणाली न ठेवता सामाजिक, भावनिक आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढा देण्याची क्षमता या मुलांमध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा पुस्तकांतून मिळते पण आताच्या पिढीमध्ये पुस्तके वाचण्याची सवय कमी होत असून माहिती तंत्रज्ञानामुळे सतत वेगवेगळे विषय हाताळत असते. त्यामुळे क्षणोक्षणी त्यांच्या भावना बदलत असतात. त्यामुळे त्यांना भावनिक संतुलन राखणं कठीण होत असून त्यांच्या मध्ये अनेक मानसिक समस्या वाढल्या आहेत.
कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष जेष्ठ लेखिका उषा तांबे म्हणाल्या की, यंदा हे संमेलन साहित्य संघाच्या वास्तूत केले जात आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, माननीय सी. डी. देशमुख, मा. यशवंतराव चव्हाण यांचे आशीर्वाद लाभलेल्या या वास्तूमध्ये हे संमेलन होत आहे.अनेक प्रसिद्ध कलावंतांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात याच वास्तूतून केली. म्हणून ही वास्तू या समारंभातला एक महत्त्वाचा घटक आहे.
साहित्य संघाच्या प्रमुख कार्यवाह डाॅ. अश्विनी भालेराव गांधी यांनी संघाला लाभले ल्या परंपररेविषयी भाष्य केले.

साहित्य संघाच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी ‘झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया’ म्हणत बालपणापासून रेल्वेने केलेल्या आनंददायी प्रवासाचे वर्णन करत आता मात्र रेल्वे डब्याच्या बाहेर पाहताना पळणारी झाडे काळाच्या ओघात गडप होऊन फक्त पळणारी माणसे दिसतायेत याविषयी खंत व्यक्त केली.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष आणि उद्घाटक यांची ओळख प्रा. प्रतिभा विश्वास यांनी करून दिली. तर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन श्री. गणेश आचवल यांनी केले.
शाहीर निलेश जाधव यांच्या मुंबईच्या पोवाड्याने सकाळी ९ वाजता संमेलनास प्रारंभ झाला.
संकेत तांडेल लिखित आणि प्रशांत माधव जोशी दिग्दर्शित एम मल्टिमिडीया या संस्थेने अतिशय रंजक अशी ‘लोकल’ ही एकांकिका सादर केली.

‘आपली मुंबई खरेच बदलली आहे का?’ या विषयावरील परिसंवादात महापालिका पुरातत्व खात्याचे माजी अधिकारी संजय सावंत आणि ज्येष्ठ अभ्यासक अरुण पुराणिक सहभागी झाले या दोघांनी एकंदरीतच सिनेमा थिएटर पासून मुंबईचे रूपरंग कसे बदलले याविषयी रंजक माहिती दिली.
गोविंद नारायण माडगावकर यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ आणि नितीन साळुंखे यांच्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकातील उताऱ्यांचे अभिवाचन अभिनेता दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी उत्तम प्रकारे केले.
मुंबईतील खाद्य संस्कृती यावर ज्येष्ठ संपादक संजीव साबडे आणि मुंबईतील वाचन संस्कृती यावर संपादक मुकेश माचकर यांचे गप्पाष्टक खासच रंगले. वक्त्यांना प्रश्न विचारून रसिकांनी सहभाग नोंदवला.
संमेलनाचा समारोप लोकलमधील रीळ स्टार सानिका कणसे हिच्या रेल्वे भजनाने झाले.
या संमेलनाला नेपथ्यकार भालचंद्र म्हात्रे यांनी विषयानुरूप उभा केलेला लोकलचा हुबेहूब डबा आणि मुंबईचे वैशिष्ट दाखवणारे नेपथ्य यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस छोटे मोठे बदल करून ते अधिक आकर्षक केले गेले. सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात श्री. चंद्रशेखर गोखले, मीनाक्षी जयकर, धनश्री धारप, संगीता अरबुने, डॉ. मनोज वराडे, शैला सामंत इ. सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार संघाच्या उपाध्यक्ष रेखा नार्वेकर यांनी मानले.
याप्रसंगी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. संमेलनाला सर्वांना मुक्त प्रवेश असल्यामुळे मुंबई आणि नजीकच्या शहरातील सर्व साहित्य प्रेमींनी उपस्थिती दर्शवली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
