14 एप्रिल 1944 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये एस एस फोर्ट स्तिकिंन या जहाजाला लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलाच्या 66 जवानांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन आग विझविण्याचे कार्य केले. त्यांच्या स्मरणार्थ 14 एप्रिल हा राष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने जाणून घेऊ या, अग्नी सुरक्षेचे महत्व आणि मुळातच आग लागू नये म्हणून, आपण काय केले पाहिजे ? याची तोंड ओळख…
– संपादक
अग्नि सुरक्षा संदर्भात जनसामान्यात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अग्नी सुरक्षा दिवसाकडे पाहिले जाते. ह्या दिवशी कारखान्यांमध्ये, अग्निशमन केंद्र तसेच विविध आस्थापनामध्ये अग्नि सुरक्षा विषयावर जागरूकतेविषयक काम केले जाते.
खरंतर आग आणि त्यामुळे होणारे नुकसान हा देशासाठी चिंतेचा विषय आहे. रोज वर्तमानपत्र उघडलं तर आगी संदर्भात एक तरी बातमी असते.
प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मागील सात वर्षात मुंबई आणि नवी मुंबईमध्ये 33,000 आगीच्या घटना घडलेल्या आहेत. प्रत्यक्ष नवी मुंबईत मागील सहा महिन्यात 673 तर मुंबईतली संख्या हजाराच्या वर आहे.
ह्या महिन्यात उष्णतेच्या लाटे बरोबरच आगीच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ह्या सर्व घटनांवर दृष्टीक्षेप टाकल्यास अग्नि सुरक्षेसंदर्भात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे हे समजते.
आगीमुळे होणारी मनुष्यहानी व वित्तहानी ह्याची जाणीव सगळ्यांनाच आहे, परंतु आग लागू नये यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले जाते.
आगीचा विचार केला तर बहुतांश आगी शॉर्टसर्किट व किचन मधील गॅस गळती मुळे झाल्याचे आढळून येते. तसेच जुन्या वायरिंग, घरातील वाढणारा लाइटिंगचा भार, शॉर्टसर्किट साठी कारणीभूत ठरतात. सर्किट ब्रेकर लावलेले आहे परंतु ते कार्यरत आहेत का ? याबाबतीत अज्ञानच पाहायला मिळते.
घरगुती गॅसचा वापर व धोक्यांची कल्पना जवळ-जवळ सगळ्यांनाच असते परंतु बऱ्याचशा आगी मध्ये गॅस सुरक्षेच्या बाबतीत दाखवलेला निष्काळजीपणा हेच कारण पुढे आले आहे.
इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की एखाद्या व्यक्तीच्या या चुकीची झळ, आजूबाजूच्या इतर कुटुंबियांना सुद्धा मोठ्या प्रमाणात सोसावी लागते.
भारतात इमारत सुरक्षेसाठी राष्ट्रीय बिल्डिंग कोड, इमारत रेगुलेशन ॲक्ट, नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन – ॲक्ट अस्तित्वात आहेत, ज्यामध्ये इमारतींसाठी आवश्यक असलेल्या विविध सुरक्षा प्रणालींची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. परंतु असे आढळून येते की बहुतेक सोसायट्यांमध्ये अग्नि सुरक्षा कार्यरत नसतात किंवा कार्यरत जरी असल्या तरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिचा वापर कसा करायचा याची माहिती बऱ्याचदा सोसायटीमधील लोकांना नसते आणि मग या परिस्थितीमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्रणेचा काहीच उपयोग होत नाही. अशा आगींवर वेळीच नियंत्रण न मिळवल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीला सामोरे जावे लागल्याचे नेहमीच पाहण्यात येत आहे.
मुंबईतील वाढत जाणाऱ्या उंच इमारतीं तसेच घनदाट झोपडपट्टी यामध्ये अग्निशमन दलाला नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सदर परिस्थितीचा विचार करून व मुंबई अग्निशमन दलाला बळकटी आणण्याचे हेतूने 235 कोटी रुपयांची भरघोस तरतूद ह्यावर्षीच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दोन फायर रोबोट आणि सहा बुडवणाऱ्यांना वाचवण्यासाठी रोबोटिक लाइफ सेविंग यंत्रणा फ्रान्सकडून मागविण्यात येणार आहे.
आगींपासून होणारे नुकसान कमी करायचे झाल्यास सर्वप्रथम आग लागू नये यासाठी चे प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक सोसायटीने तसेच विविध आस्थापनांनी फायर सेफ्टी ऑडिट आणि एनर्जी ऑडिट करून त्यामधील त्रुटी वेळोवेळी दूर करणे आवश्यक आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे इमारतीच्या स्ट्रक्चरनुसार अग्नी सुरक्षा यंत्रणेची पूर्तता, ती कार्यरत राहण्याची खबरदारी व ही यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण संबंधितांना मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून आगीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन होणारी जीवित आणि वित्त हानी नियंत्रणात आणण्यासाठी हातभार लागेल.
— लेखन : सुधीर थोरवे.
पर्यावरण तज्ज्ञ. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800